संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी केली. त्यांनी एनडीएच्या पाठिंब्यावर नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्या निर्णयानंतर विरोधकांनी त्यांची ‘पलटू कुमार’ म्हणत निर्भत्सना केली. तर काहींनी नितीश कुमार यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आपल्या देशात असे अनेक आयाराम गयाराम आहेत, म्हणत नितीश कुमार यांना लक्ष्य केले. याच पार्श्वभूमीवर आयाराम गयाराम म्हणजे काय? हा शब्द राजकारणात कसा रुढ झाला? त्यामागची कथा काय? हे जाणून घेऊ या….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?

नितीश कुमार यांच्या राजकीय निर्णयावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना नितीश कुमार यांच्या या योजनेची काही दिवसांपूर्वीच कल्पना होती. आपल्या देशात अनेक आयाराम आणि गयाराम आहेत. नितीश कुमार यांना जेथे राहायचे आहे तेथे त्यांनी राहावे, असे खरगे म्हणाले.

आयाराम, गयाराम शब्द का वापरला जातो?

आयाराम आणि गयाराम हा शब्द मुख्यत: राजकारणात वापरला जातो. कमी कालावधीत आपला राजकीय पक्ष सतत बदलणाऱ्या राजकारण्यासाठी या शब्दाचा वापर करण्यात येतो. १९६० च्या दशकात हरियाणातील एका नेत्याने वारंवार आपला राजकीय पक्ष बदलल्यामुळे आयाराम आणि गयाराम हा शब्द रुढ झाला.

या शब्दाचा उगम समजून घ्यायचा असेल तर १९६७ साली हरियाणातील नेते गया लाल यांनी आपला पक्ष वारंवार बदलला होता. मात्र, त्यांनी हा निर्णय का घेतला होता, हे जाणून घेण्यासाठी हरियाणाच्या तसेच देशातील राजकारणात नेमके काय घडत होते, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

पंडित नेहरूंच्या निधनानंतर काँग्रेसला उतरती कळा

१९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत देशभरातील जनता काँग्रेसच्या पाठीमागे होती. मात्र, १९६४ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. ते १९४७ पासून देशाचे पंतप्रधान होते. नेहरूंच्या निधनानंतर मात्र काँग्रेसचा जनाधार कमी होऊ लागला. त्याचाच परिणाम म्हणून १९६७ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची संख्या २८३ पर्यंत खाली आली. याआधीच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकूण ३६१ जागांवर विजय झाला होता.

१९६६ साली पंजाब राज्याचे विभाजन करून हरियाणा राज्याची निर्मिती करण्यात आली. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १९६७ साली हरियाणात विधानसभेची निवडणूक घेण्यात आली.

गया लाल कोण होते?

गया लाल यांनी हरियाणाची १९६७ सालची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. हसनपूर हा मतदारसंघ तेव्हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला होता. याच जागेवरून गया लाल यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा ३६० मतांच्या फरकाने पराभव केला होता. गया लाल यांना १० हजार ४५८, तर काँग्रेसचे उमेदवार एम. सिंह यांना १० हजार ९८ मते मिळाली होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी गया लाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसचा ४८ जागांवर विजय

हरियाणाच्या ८१ सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे एकूण ४८ आमदार होते. त्या निवडणुकीत भारतीय जनता संघाचा १२, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा २, समाजवादी पार्टीचा ३ जागांवर विजय झाला होता. या निवडणुकीत १६ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. सर्वांत मोठा पक्ष या नात्याने काँग्रेसने येथे सत्तास्थापनेचा दावा केला आणि भगवत दयाल शर्मा यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

काँग्रेसच्या १२ आमदारांचे बंड

मात्र, काही आठवड्यांनंतर काँग्रेसच्या १२ आमदारांनी बंड केले. या बंडामुळे काँग्रेसचे सरकार अल्पमतात गेले. याच काळात अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत संयुक्त विधायक दल (एसव्हीडी) नावाचा नवा पक्ष स्थापन केला. या पक्षाचे नेतृत्व राव बिरेंदर यांच्याकडे देण्यात आले. दरम्यानच्या काळात अनेक आमदारांनी एसव्हीडी पक्षात प्रवेश केला. बघता बघता एसव्हीडीकडे तब्बल ४८ आमदार झाले. त्यानंतर २४ मार्च १९६७ रोजी राव बिरेंदर यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

…आणि गयाराम, आयाराम शब्द रुढ झाला

गया लाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याचाच परिणाम म्हणून राव बिरेंदर मुख्यमंत्री झाल्यामुळे गया लाल यांना विरोधी बाकावर बसावे लागणार होते. राव यांना मात्र सत्तेत जायचे होते. परिणामी, राव यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या काही तास अगोदर त्यांनी एसव्हीडीमध्ये प्रवेश केला. अवघ्या नऊ तासांत गया लाल यांनी तब्बल तीन वेळा पक्षबदल केला. त्यांनी एसव्हीडी, पुन्हा काँग्रेस आणि पुन्हा एसव्हीडी असा तीन वेळा पक्ष बदलला. शेवटी गया लाल जेव्हा एसव्हीडीमध्ये आले, तेव्हा राव बिरेंदर यांनी त्यांना पत्रकार परिषदेदरम्यान बोलावले आणि ‘गयाराम आता आयाराम’ झाले आहेत, असा शब्दप्रयोग केला.

गया लाल यांचा वेगवेगळ्या पक्षांत प्रवेश

पुढे राव यांनी आपले सरकार वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन अवघ्या काही महिन्यांनी त्यांनी २ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १९६८ मध्ये हरियाणात पुन्हा एकदा निवडणूक झाली. दरम्यान, आपल्या राजकीय कारकिर्दीत गया लाल यांनी अनेक वेळा पक्षबदल केला. त्यांनी राजकीय परिस्थिती पाहून युनायटेड फ्रंट, आर्य सबा, भारतीय लोकदल, जनता पार्टी अशा वेगवेगळ्या पक्षांत प्रवेश केला होता.

प्रादेशिक पक्षांना महत्त्व

हरियाणातील या राजकीय घडामोडीनंतर आयाराम आणि गयाराम हा शब्दप्रयोग राजकारणात रुढ झाला. एखादा नेता कमी काळात वारंवार पक्षबदल करत असेल तर अशा नेत्यावर टीका करण्यासाठी हा शब्द वापरला जाऊ लागला. देशाच्या राजकारणात काँग्रेसचा प्रभाव जसजसा कमी होऊ लागला, तसतसे राजकीय नेत्यांचे पक्षांतर करण्याचे प्रमाण वाढू लागले. सध्या पाहायचे झाल्यास राजकारणात प्रादेशिक पक्षांना फार महत्त्व आले आहे. एखाद्या राज्यात सत्ता स्थापन करायची असेल, तर तेथील प्रादेशिक पक्ष यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच अपक्ष आमदारांनाही तेवढेच महत्त्व आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is story behind aaya ram gaya ram word know what is connection with haryana politics prd
Show comments