२१ जून हा दिवस सामान्यत: वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. सामान्यपणे दिवसातील २४ तासांपैकी १३ तासांहून अधिक काळ दिवसाचा प्रहर असतो; म्हणूनच हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी सामान्यत: १३ तास १३ मिनिट कालावधी हा दिवसाचा असतो, तर १० तास ४७ मिनिटांची रात्र असते. याच दिवसापासून उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र अगदी लहान असते. खासकरून, विषुववृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशात राहणाऱ्यांसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस २१ जून हा असतो. या दिवसाला समर सोलस्टिस (Summer Solstice) असे म्हणतात. ही एक खगोलशास्त्रीय प्रक्रिया आहे. २१ जून या दिवशी सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असतो. या दिवशी सूर्य कर्कवृत्तात थेट डोक्यावर येतो आणि त्यामुळे पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो. या दिवशी उत्तर गोलार्धात असणाऱ्या सर्वच देशांमध्ये दिवस सर्वात मोठा असतो तर रात्र सर्वात लहान असते.
हेही वाचा : बायडेन आणि ट्रम्प यांच्यातील पहिल्या डिबेटमध्ये या ५ गोष्टींकडे असेल जगाचे लक्ष
हे असे नेमके का घडते?
पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरत असते. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंश कोनामध्ये कललेला आहे. त्यामुळे, उत्तर गोलार्धात मार्च ते सप्टेंबर या काळात अधिक प्रखर सूर्यप्रकाश मिळतो. याच काळात उत्तर गोलार्धातील उन्हाळा अनुभवायला मिळतो; तर वर्षाच्या उर्वरित काळात, दक्षिण गोलार्धात सूर्यप्रकाश जास्त असतो. सोलस्टिसच्या काळात पृथ्वीचा अक्ष अशाप्रकारे कललेला असतो की, उत्तर ध्रुव सूर्याच्या बाजूने अधिक तर दक्षिण ध्रुव त्यापासून लांब असतो. पृथ्वीच्या केंद्रातून वरपासून खालपर्यंत एक सरळ जाणारी रेषा म्हणजे तिचा अक्ष होय. अर्थात, ही काल्पनिक संकल्पना आहे. मात्र, पृथ्वी अशाप्रकारे कललेली आहे की ती सूर्याच्या सापेक्ष २३.५ अंशाच्या एका निश्चित कोनात कललेली आहे. जेव्हा उत्तर ध्रुव सूर्याच्या अधिक जवळ कललेले असते, तेव्हा सोलस्टिसची भौगोलिक प्रक्रिया उद्भवते. ‘सोलस्टिस’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘स्थिर सूर्य’ असा होतो. संपूर्ण जगभरात सोलस्टिसची खगोलशास्त्रीय प्रक्रिया एकाच वेळी घडत असली तरीही पृथ्वीवरील वेगवेगळे देश वेगवेगळ्या वेळेला त्याचा अनुभव घेतात.
सोलस्टिसदरम्यान काय घडते?
सोलस्टिसच्या दिवशी पृथ्वीला सूर्याकडून सर्वांत जास्त ऊर्जा मिळते. या काळात उत्तर गोलार्धात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळण्याची शक्यता साधारणपणे २०, २१ किंवा २२ जूनला असते. याउलट हीच प्रक्रिया दक्षिण गोलार्धातही घडते, जेव्हा पृथ्वीचे दक्षिण ध्रुव सूर्याच्या बाजूने अधिक कललेले असते आणि उत्तर ध्रुव सूर्यापासून लांब गेलेले असते. हा काळ म्हणजे २१, २२ किंवा २३ डिसेंबरचा असतो. या काळात दक्षिण ध्रुवाला सर्वात जास्त सूर्यप्रकाश मिळतो; तर उत्तर गोलार्धात सर्वात मोठ्या कालावधीच्या रात्री अनुभवायला मिळतात. समर सोलस्टिसच्या काळात उत्तर गोलार्धात प्राप्त होणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण हे त्यातील अक्षांशानुसार बदलत जाते. थोडक्यात, उत्तर ध्रुवाच्या सर्वांत जवळच्या ठिकाणी या वेळी सर्वांत जास्त काळ सूर्यप्रकाश मिळतो. आर्क्टिक सर्कलमध्ये, संक्रांतीदरम्यान दिवस आणि रात्र सूर्य दिसतो. आर्क्टिक सर्कलमध्ये तर या काळात दिवस आणि रात्र अशा दोन्ही प्रहरांमध्ये सूर्य लख्खपणे दिसत असतो.
हेही वाचा : कबड्डी, खोखोचे सामने ऑलिम्पिकमध्ये रंगणार? नवे खेळ कसे सामील केले जातात?
लोक हा दिवस कसा साजरा करतात?
बऱ्याच देशांमध्ये २१ जून हा दिवस एखाद्या सणासारखादेखील साजरा केला जातो. आपल्या इथे जरी तीन ऋतू असले तरी अनेक देशांमध्ये हिवाळा आणि उन्हाळा असे दोनच ऋतू असतात. तेव्हा या दिवशी नाचगाणी आणि मेजवानीवर ताव मारून अत्यंत उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. जगातील काही देशांमधील लोक शेकोटी पेटवून त्याभोवती गोलाकार बसून या खगोलीय घटनेचा आनंद घेतात. इतर काही लोक इंग्लंडमधील स्टोनहेंज किंवा पेरुमधील टेंपल ऑफ द सनसारख्या प्राचीन स्थळांना भेट देतात. प्राचीन काळातील लोक ज्या प्रकारे या स्थळांना भेटी देऊन या खगोलीय घटनेचे निरीक्षण करायचे, अगदी तसेच काही जण करतात, अशी माहिती द न्यूयॉर्क टाइम्सने दिली आहे.