पुढील वर्षी मार्च ते मे या कालावधीत जगाला ‘सुपर एल निनो’चा फटका बसणार आहे. विशेषत: उत्तर गोलार्धातील देशांवर याचा परिणाम होणार आहे. जागतिक हवामान व ऋतुचक्रावर याचा विपरीत परिणाम होणार असून अन्नधान्य उत्पादन, जल उपलब्धता, पर्यावरण यांनाही दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. भारतालाही ‘सुपर एल निनो’चा फटका बसण्याची शक्यता असून देशात पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या ‘सुपर एल निनो’विषयी…
‘एल निनो’ म्हणजे काय?
‘एल निनो’ ही प्रशांत महासागरात तयार झालेली हवामान स्थिती आहे, जी बाष्पाने भरलेल्या मान्सूनच्या वाऱ्यांवर परिणाम करते. ‘एल निनो’चा परिणाम विविध देशांच्या हवामानावर होतो. दक्षिण अमेरिकेतील पेरू व आसपासचे देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि प्रशांत महासागराला जोडलेले अनेक देश यांना एल निनोचा फटका बसतो. एल निनो असताना प्रशांत महासागराच्या पश्चिमेला हवेचा दाब नेहमीपेक्षा उच्च आणि पूर्वेस अतिशय कमी असतो. त्यामुळे प्रशांत महासागरातील उष्ण कटिबंधीय भागातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे कमकुवत होत उलट्या दिशेने वाहू लागतात. या परिस्थितीत पेरू व इक्वेडोर या देशांच्या समुद्रकिनाऱ्यालगतचे पाणी अतिशय उष्ण होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून पेरूकडे वाहणाऱ्या वाऱ्याच्या चक्रावर परिणाम होतो. एल निनोच्या समान्य स्थितीत हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, तर उष्ण हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. एल निनो स्थिती असेल तर पूर्व प्रशांत महासागरात अधिक उष्ण पाण्यावर ढग तयार होऊन तिथे जोरदार पाऊस होतो. मात्र त्यामुळे दक्षिण अमेरिकेचा पश्चिम समुद्रकिनारा नेहमीपेक्षा अधिक आर्द्र होतो. इंडोनेशिया, आग्नेय आशियातील इतर देश, ऑस्ट्रेलिया येथील हवामान शुष्क होऊन दुष्काळी स्थिती निर्माण होते.
हेही वाचा – गाझामध्ये रुग्णवाहिका, शवागृहे अपुरी, सध्या गाझामध्ये काय परिस्थिती आहे? जाणून घ्या…
अमेरिकेच्या हवामानतज्ज्ञांनी काय इशारा दिला आहे?
अमेरिकेतील ‘राष्ट्रीय महासागरीय व पर्यावरण प्रशासन’ संस्थेने २०२४ मध्ये ‘सुपर एल निनो’चा फटका बसण्याचा इशारा दिला आहे. इतर ‘एल निनो’पेक्षा याचे परिणाम अधिक तीव्र स्वरुपात जाणवतील, असा भीतीदायक इशाराही देण्यात आला आहे. विशेषत: मार्च ते मे या महिन्यांच्या कालावधीत ‘सुपर एल निनो’चे परिणाम जाणवतील. १९९७-९८ आणि २०१५-१६ या वर्षांत तीव्र स्वरुपात ‘एल निनो’चे दुष्परिणाम जाणवले होते. मात्र त्यापेक्षाही पुढील वर्षीच्या ‘सुपर एल निनो’चे परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवतील, असा इशारा अमेरिकेच्या या संस्थेने दिला आहे. जागतिक हवामानावर ‘सुपर एल निनो’चा विपरीत परिणाम होणार असून काही भागांत दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अन्नधान्य उत्पादन, पाण्याची उपलब्धता, पर्यावरण यांवरही दुष्परिणाम होणार असल्याचे अमेरिकेच्या हवामानतज्ज्ञांनी सांगितले.
‘सुपर एल निनो’चा जागतिक हवामानावर काय परिणाम होऊ शकतो?
पुढील वर्षी ‘सुपर एल निनो’चा फटका बसण्याची शक्यता ७० ते ८० टक्के असल्याचे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात आले. या कालावधीत विषुववृत्तीय सागरी पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. जागतिक तापमानातही दोन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता ३० टक्के अधिक आहे. १९९७-९८ आणि २०१५-१६ मध्ये अशाच प्रकारे तापमान वाढल्याने जगभरातील अनेक देशांना दुष्काळ आणि पूरस्थितीचा सामना करावा लागला. २०२४ मध्ये अशाच प्रकारची स्थिती होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर अमेरिकेतील देशांमध्ये ‘सुपर एल निनो’चा परिणाम होणार आहे. या देशांमध्ये सरासरीपेक्षा तापमान वाढ होऊन दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिका या देशातील दक्षिण भागाला थंड हवामानाचा सामना करावा लागणार आहे. हिवाळ्यात या परिसरात तापमान सरासरीपेक्षा अधिक कमी होणार आहे.
हेही वाचा – विश्लेषण: कापसाचे भाव यंदा वाढतील का?
‘सुपर एल निनो’चा भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
‘सुपर एल निनो’चा भारतातील ऋतुचक्रावर परिणाम होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘सुपर एल निनो’मुळे मोसमी वारे कमकुवत होऊन दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या पावसाळ्यात कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘सुपर एल निनो’ भारतातील नेहमीच्या वातावरणीय स्थितीवर परिणाम करू शकतो. काही भागांत दुष्काळी स्थिती असेल तर काही भागांत प्रमाणापेक्षा अधिक मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे काही भागांत नद्यांना पूर येऊन पूरस्थितीचा फटका बसू शकतो. उत्तर भागापेक्षा दक्षिण भारतात वातावरणीय बदलाचा कमी परिणाम होऊ शकतो, असेही हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात आले. संपूर्ण भारतातील पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी असेल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे भारतातील शेतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतातील शेती अजूनही मोसमी पावसावर अवलंबून असते. ‘सुपर एल निनो’मुळे कमी पाऊस पडणार असल्याने शेतीवर विपरीत परिणाम होऊन कमी उत्पादन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
sandeep.nalawade@expressindia.com