गुजरातच्या मोरबी शहरात रविवारी (३० ऑक्टोबर) संध्याकाळी मच्छू नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १३० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. ‘झुलता पूल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी पर्यटकांनी एकाचवेळी मोठी गर्दी केल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर लष्कर, वायू दल, नौदलासह एनडीआरएफकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्यही करण्यात आले. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. या व्हिडिओत हा पूल हलताना दिसतो आहे. यावरून आता अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. मात्र, हा झुलता पूल म्हणजे नेमका काय असतो? तो खरंच सुरक्षित असतो का? आणि महत्त्वाचे म्हणजे मोरबी घटनेत नेमकी काय चूक झाली? जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण : ट्विटरच्या अधिग्रहणात इलॉन मस्क यांना महत्त्वपूर्ण मदत करणारे श्रीराम कृष्णन आहेत तरी कोण?
झुलता पूल म्हणजे नेमकं काय?
झुलता पूल एखाद्या नदीवर किंवा तलावावर बांधला जातो. याठिकाणी सामान्य पूल बांधायचा झाल्यास पुलाचे खांब बांधताना अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच नदी किंवा तलावातील जलवाहतूकही प्रभावित होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ठिकाणी ओवरहेड केबलचा वापर करून झुलता पूल बांधण्याला प्राधान्य दिले जाते. झुलत्या पुलाची रचना वैशिष्यपूर्ण असते. हा पूल बांधण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला मोठे खांब बांधले जातात. या खांबांवर केबल टाकले जातात. पुलाचा संपूर्ण भार हा केबलवर असतो.
हेही वाचा – विश्लेषण: मोरबीमध्ये १४३ वर्षं जुना पूल कोसळला, हा पूल कोणी बांधला? जाणून घ्या इतिहास…
झुलते पूल सुरक्षित नाहीत?
सामान्य पुलांप्रमाणेच झुलते पूलही तितकेच मजबूत असतात. मात्र, झुलत्या पुलाचा सर्व भार ओव्हरडेड केबलवर असतो. तसेच सामान्य पूल बांधण्यात जेवढा खर्च येतो. त्यापेक्षा कमी खर्च झुलता पूल बांधण्यात येतो. मात्र, कोणत्याही पुलाची भार सहन करण्याची एक क्षमता असते. क्षमतेपेक्षा जास्त भार झाला तर त्याचा ताण केबलवर पडतो आणि पूल तुटण्याची शक्यता असते. मोरबी दुर्घटनेबाबत बोलायचं झाल्यास, . येथे मोठ्या प्रमाणात लोक एकाच ठिकाणी जमा झाले होते. तर अनेक जण हा पूल हलवण्याचा आणि त्यावर उड्या मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे केबलवरील ताण वाढल्याने ही दुर्घटना घडली असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा – GST Collection: ॲाक्टोबरमध्ये महाराष्ट्रात २३ हजार कोटींचं जीएसटी संकलन, सप्टेंबरच्या तुलनेत झाली ‘इतकी’ वाढ
दुरुस्तीसाठी सात महिने बंद होता पूल
दुरुस्तीसाठी हा पूल यावर्षी मार्चपासून सात महिने बंद होता. रविवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पाच दिवसांआधी २६ ऑक्टोबरला हा पूल पुन्हा सुरू करण्यात आला होता. या पुलाच्या दुरुस्तीचं आणि व्यवस्थापनाचं कंत्राट ‘ओरेवा’ कंपनीला १५ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आलं होतं. हे कंत्राट दोन कोटींचे होते.
ऐतिहासिक झुलता पूल
२० फेब्रुवारी १८७९ रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या झुलत्या पुलाचे पहिल्यांदा उद्घाटन करण्यात आले होते. या पुलाच्या बांधकामातील साहित्य इंग्लंडमधून आयात करण्यात आले होते. तेव्हा हा पूल बांधण्यासाठी साडेतीन लाखांचा खर्च आला होता. २००१ मध्ये झालेल्या भूकंपात या पुलाचंही नुकसान झालं होतं.