नाताळ सण २५ डिसेंबरला जगभर साजरा होणार आहे. मात्र त्याच्या आगमन काळाला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ख्रिस्त राजाचा सण साजरा केल्यानंतर आगमन काळ सुरू होतो. त्यानिमित्ताने दर रविवारी चर्चमध्ये जांभळी, गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची मेणबत्ती पेटवली जाते. हा आगमन काळ म्हणजे काय, मेणबत्ती प्रज्वलित करण्याची प्रथा काय आहे, रंगांचे महत्त्व काय आहे, याचा आढावा.
ख्रिस्ती धर्माचे एकूण काळ किती?
ख्रिस्ती धर्मात उपासनेचे एकूण चार काळ असतात. पहिला आगमनकाळ (चार आठवडे, नाताळ (दोन आठवडे), दुसरा प्रायश्चित्तकाळ/उपवासकाळ, (सहा आठवडे) तिसरा पुनरुत्थान काळ, (सात आठवडे, ५० व्या दिवशी पेंटकास्ट हा सण साजरा केला जातो), चौथा सामान्य काळ (३४ आठवडे).
‘ख्रिस्त राजा’चा सण कधी साजरा होतो?
सामान्य काळाच्या ३४व्या आठवड्यानंतरच्या रविवारी ‘ख्रिस्त राजा’चा सण सुरू होतो. पूर्वी हा सण कॉर्पस ख्रिस्ती नावाने साजरा केला जायचा. हा सण म्हणजे ख्रिस्ताच्या शरीर रक्ताचा सोहळा साजरा करणे. या सणात ख्रिस्ताच्या शरीराचा सन्मान केला जातो. संपूर्ण दिवस आराधना केली जाते. संध्याकाळी मिरवणूक काढली जाते. हा वर्षाचा शेवटचा रविवार मानला जातो. १९२५ साली पोप पायस अकरावे ह्यांनी पहिल्या महायुद्धापश्चात विस्कटलेल्या समाजाला पुन्हा देवधर्माकडे, शांतीच्या मार्गाकडे वळविण्यासाठी या सणाला ‘विश्वाचा राजा’ असे नाव देऊन सण अधिकृतरीत्या सुरू केला. तेव्हापासून हा सण ‘ख्राईस्ट द किंग’ या नावाने साजरा करतात.
हेही वाचा : विश्लेषण : फसवणुकीविरोधात तक्रार करूनही विख्यात बुद्धिबळपटू कार्लसनलाच दंड का झाला? काय होते प्रकरण?
आगमन काळ म्हणजे काय?
कॅथलिक चर्चचे उपासना वर्ष हे आगमन काळाच्या पहिल्या रविवारी सुरू होते. २५ डिसेंबरला होणाऱ्या नाताळ सणाच्या महिनाभर आधी आगमन काळ सुरू होतो. नाताळ सणाच्या म्हणजे २५ डिसेंबरपूर्वी येणारे चार रविवार हे आगमन काळातील पहिला, दुसरा, तिसरा व चौथा रविवार अशा नावाने ओळखले जातात. त्यासाठी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी जांभळ्या रंगाची मेणबत्ती तर तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित केली जाते. या वेळी येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश चर्चमधून दिला जातो. जगभरातील विविध चर्चेमध्ये रविवार ३ डिसेंबर रोजी जांभळ्या रंगाची पहिली मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली.
आगमन काळाचे किती भाग असतात?
आगमन काळाचे दोन भाग असतात. ‘पहिला रविवार ते १६ डिसेंबर’ या पहिल्या भागात येशूच्या दुसऱ्या आगमनाची तयारी केली जाते. या काळात पश्चात्ताप, प्रायश्चित्त व्यक्त केले जाते. १७ डिसेंबर, २४ डिसेंबर हे दिवस ख्रिस्ताची पहिल्यांदा येण्याची तयारी म्हणून साजरे केले जातात. म्हणजेच नाताळची तयारी केली जाते. जागोजागी ‘कॅरल सिंगिंग’चे आयोजन केले जाते, नाताळ गोठ्यांची तयारी केली जाते. घरांची रंगरंगोटी केली जाते. ख्रिसमस ट्री उभारले जातात.
हेही वाचा : विश्लेषण: आदिवासी जिल्ह्यंतील बालमृत्यूंचे प्रमाण घटत का नाही?
आगमन काळात मेणबत्तीचे महत्त्व काय?
नाताळनिमित्त चर्चमध्ये मेणबत्ती प्रज्वलनाचा संबंध पुरातन काळी साजरा केल्या जाणाऱ्या सूर्याच्या सणाशी आहे. मेणबत्ती स्वत: जळून इतरांना प्रकाश देते तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यातून बोध घेऊन इतरांसाठी जगण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. ही मेणबत्ती म्हणजे प्रभू येशूचा प्रकाश, नकारात्मक विचारांनी व्यापलेल्या भवतालात सकारात्मक प्रकाशाची दिशा आहे असे या मेणबत्तीचे महत्त्व सांगितले जाते. त्या मेणबत्त्या अनुक्रमे विश्वास, आशा, पश्चात्ताप आणि आज्ञाधारकपणा यांच्या जीवनाची प्रतीके मानली जातात.
पहिली, दुसरी आणि चौथी मेणबत्ती जांभळी का?
आगमन काळातील पहिली, दुसरी आणि चौथी मेणबत्ती ही जांभळ्या रंगाची असते. ख्रिस्ती श्रद्धेनुसार जांभळा रंग हा आशेचा रंग आहे. प्रभू येशू ख्रिस्त मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर येत आहे, ही आशा या मेणबत्तीच्या प्रज्वलनाने जागवली जाते. येशूजन्माच्या सातशे वर्षे आधी एका संदेशवाहकाने येशूच्या जन्माचे भाकीत करून तत्कालीन लोकांना पापमुक्ती आणि तारणाची आशा दिली होती. त्याचेही प्रतीक म्हणून जांभळ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित केली जाते. जांभळा रंग आशेचा प्रतीक आहे. या काळात भाविक येशूची वाट बघत आशेवर असतो. त्या आशेला दु:खाची झालर असते. या काळात चर्चमध्ये प्रार्थनेत प्रभू येथूची स्तुतिगीते गायली जात नाहीत.
तिसरी मेणबत्ती गुलाबी का?
आगमन काळातील तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची तिसरी मेणबत्ती प्रज्वलित करण्यात येते. येशूच्या जन्माची पहिली बातमी मेंढपाळाला देण्यात आली होती. गुलाबी मेणबत्ती ही त्याचे प्रतीक मानली जाते. तुम्ही जरी कुठलेही दु:ख सहन करत असाल तरी शेवट आनंदी असेल. शेवटी परमेश्वराचा विजय होणार आहे, हे सांगण्यासाठी तिसरी मेणबत्ती गुलाबी रंगाचे पेटवली जाते.
हेही वाचा : “पोस्टाला कोणतंही पार्सल उघडून पाहण्याचा अधिकार”; वाचा वादग्रस्त पोस्ट ऑफिस विधेयक काय?
चौथ्या मेणबत्तीचं महत्त्व काय?
प्रभू येशूचे आगमन जवळ आले आहे. तयारीत राहा. हे सांगण्यासाठी जांभळ्या रंगाची चौथी मेणबत्ती पेटवली जाते. या काळात चर्चमध्ये धर्मगुरूंकडून चुकांबद्दल क्षमा मागितली जाते.
पाचवी मेणबत्ती पांढरी का?
नाताळच्या आदल्या दिवशी म्हणाजे २४ डिसेंबरच्या रात्री तीन जांभळ्या आणि एक गुलाबी अशा सर्व मेणबत्त्या एकत्र प्रज्वलित केल्या जातात. त्यामध्ये पाचवी पांढऱ्या रंगाची मेणबत्ती पेटवली जाते. ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. प्रकाशाचे आगमन होत आहे. हे दर्शविण्यासाठी पांढऱ्या रंगाची मेणबत्ती पेटवली जाते. त्यानंतर मध्यरात्रीच्या मिस्सा करून (मिडनाइट मास) नाताळ सणाच्या आनंदाच्या पर्वाला सुरुवात होते.
हेही वाचा : विश्लेषण: धोनीची ७ क्रमांकाची जर्सी बीसीसीआयकडून ‘निवृत्त’! म्हणजे काय? यापूर्वी असा मान कोणाला?
नाताळ सणाचा काळ कधीपर्यंत असतो?
नाताळ सण अर्थात ख्रिसमस सोहळा दोन आठवडे सुरू राहतो. या मध्ये ‘पवित्र कुटुंब’, ‘तीन राजांचा सण’ आणि ६ जानेवारी रोजी ‘येशूच्या बाप्तीस्मा’चा सण साजरा होतो.