निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, भटकणे कुणाला आवडत नाही. विरंगुळ्यासाठी अनेक लोक उद्यान, जंगलात किंवा दुर्गम भागात फिरण्यासाठी जातात. अमेरिकेत हिरवाई असलेल्या जागेवर फिरणे अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण- झाडे, गवतात दबा धरून बसलेला आणि एका इंचाहूनही अतिशय लहान असलेला लोन स्टार नावाचा किडा अमेरिकेतील नागरिकांसाठी एक भयंकर आजार घेऊन आला आहे. या आजाराने आतापर्यंत एकही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही; पण या किड्याचा दंश झाल्यानंतर लाल मांस किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ले, तर भयंकर अशा ॲलर्जीचा सामना करावा लागत आहे. या आजाराला अल्फा-गॅल नावाने ओळखले जाते. २०१० पासून अनेक अमेरिकन नागरिक ॲलर्जीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. लोन स्टारचा दंश आणि त्यानंतर लाल मांस किंवा सस्तन प्राण्यांपासून बनलेले पदार्थ खाल्ल्यामुळे अनेक लोकांना ॲलर्जीचा त्रास सुरू झाला असल्याचे ‘मायो क्लिनिक’च्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध (CDC) च्या वेबसाइटवर या किटकाबाबत माहिती देण्यात आली असून, या आजारावरील माहितीचे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
हा किडा मुख्यत्वे अमेरिकेच्या पूर्व आणि दक्षिण प्रदेशात आढळून येतो. त्याच्या पाठीवर एक छोटासा पांढरा ठिपका पाहायला मिळतो. राईच्या आकाराएवढा असलेला हा किडा चावल्यानंतर मनुष्याच्या शरीरात एक प्रकारचे रसायन सोडतो; ज्याला अल्फा-गॅल असे म्हणतात. हे रसायन शरीरात गेल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती त्यासोबत लढण्यासाठी सज्ज होते; मात्र लाल मांस किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर ॲलर्जी होण्यास सुरुवात होते. लाल मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्येही अल्फा-गॅल नावाचे रसायन असते. त्यामुळे आधीच लोन स्टार किड्याने शरीरात सोडलेले रसायन आणि त्यानंतर हे पदार्थ खाल्ल्यानंतर शरीराला मिळालेले आणखी अल्फा-गॅल रसायन यांचे मिश्रण होऊन भयानक ॲलर्जी निर्माण होते.
नक्की प्रकार काय आहे?
गुरुवारी (२७ जुलै) आलेल्या एका सरकारी अहवालानुसार मागच्या दशकभरात अमेरिकेतील एक लाख लोकांना लोन स्टार किटकाचा चावा आणि त्यानंतर लाल मांस खाल्ल्यानंतर ॲलर्जीच्या आजाराचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या एका अहवालात सांगण्यात आले की, रुग्णांचा हा आकडा ४,५०,००० एवढा असू शकतो. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील संशोधक डॉ. स्कॉट कमिन्स यांनी सांगितले की, अन्नपदार्थापासून होणाऱ्या ॲलर्जीच्या यादीतील हा दहाव्या क्रमांकाचा सर्वांत मोठा आजार आहे.
हेल्थलाईन या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार लाल मांसामुळे होणाऱ्या ॲलर्जीची सुरुवात २००९ साली झाली. त्या वर्षी फक्त २४ रुग्णांची नोंद झाली होती; पण त्यानंतर रुग्णांच्या संख्येत वर्षागणिक वाढ होत गेली. २०२१ साली तर हा आकडा ३४ हजारांवर पोहोचला. शास्त्रज्ञांना सुरुवातीला ॲलर्जीच्या आजाराचे निदान करता आले नव्हते. कर्करोगावरील औषधे घेतल्यामुळे ॲलर्जी होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, त्यानंतर २०११ साली संशोधकांनी या आजाराला लोन स्टार किटकाचा चावा कारणीभूत असल्याचे सांगितले.
‘मायो क्लिनिक’च्या माहितीनुसार, दक्षिण, पूर्व व मध्य अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. लोन स्टार कीटक संपूर्ण अमेरिकेत वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. न्यूयॉर्कमधील लाँग आइसलँड (Long Island) येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. एरिन मॅकगिंटी यांनी सांगितले की, मागच्या दशकभरात या ॲलर्जीच्या आजाराचे ९०० रुग्ण त्यांना आढळून आले आहेत. हॅम्पटन्समध्ये तर अनेक लोकांना या आजाराने ग्रासले असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. एरिन म्हणाल्या की, या किटकाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. दुसरी एक बाब म्हणजे करोना महामारीदरम्यान लोकांना नाइलाजाने घरातच थांबावे लागले होते. आता लोक बाहेर पडत आहेत. गिर्यारोहण करणे, राष्ट्रीय उद्यानात जाणे, निसर्गात भटकायला जाण्यासारखे मार्ग लोक निवडत आहेत. अशा वेळी या लोकांना कीटकदंश होण्याचा प्रकार वाढत आहे.
ॲलर्जीमुळे रुग्ण आले मेटाकुटीला
आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार- या आजारामुळे आतापर्यंत मृत्यूची नोंद झालेली नाही; पण लोक ॲलर्जीच्या त्रासाने अतिशय मेटाकुटीला आले असून हे खूपच भीतीदायक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ज्या लोकांना या ॲलर्जीचा त्रास होत आहे; त्यांच्यामध्ये अंगावर पित्ताच्या गाठी उठणे, मळमळ, उलट्या, अतिसार, तीव्र पोटदुखी, श्वास घेण्यात अडचण, चक्कर येणे, ओठ-घसा-जीभ व पापण्यांना सूज येणे अशा प्रकारची लक्षणे दिसत आहेत.
डॉ. कमिन्स यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’शी बोलताना सांगितले की, लाल मांस खाणाऱ्यांमध्ये या प्रकारची ॲलर्जी दिसून येत आहे. त्यातही जाड लाल मांस खाणाऱ्यामध्ये ॲलर्जीची प्रतिक्रिया लवकर दिसत आहे. रात्रीच्या जेवणात हॅमबर्गर किंवा मार्बल्ड स्टिक खाऊन लोक निवांतपणे झोपायला जातात. काही वेळ कोणतीही लक्षणे दिसत नाहीत; पण मध्यरात्री त्यांना अंगावर खाज सुटणे, पित्ताच्या गाठी दिसणे किंवा जठर व आतड्यांमध्ये तीव्र वेदना जाणवायला लागतात.
तरीही अनेक लोकांना लोन स्टार किटकाच्या चाव्यानंतर अल्फा-गॅल सिंड्रोमचा सामना करावा लागलेला नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी यावर अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे सांगितले. सध्या तरी दुर्दैवाने या आजारावर कोणताही उपचार उपलब्ध नाही.
‘मायो क्लिनिक’ने सांगितले की, सध्या तरी रुग्णांना लोन स्टार किटकाचा चावा टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. झाडी असलेले ठिकाण किंवा गवताळ मैदानात फिरत असताना फूल पँट आणि पूर्ण बाह्यांचे शर्ट घालावेत. सोबत बग स्प्रे ठेवावा आणि मधे मधे लोन स्टार किडा आपल्या शरीरावर तर नाही ना, याची खातरजमा करावी.अशा प्रकारच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत.
अमेरिकेतील एका खासगी प्रयोगशाळेने अल्फा-गॅलवरील अँटीबॉडिजचा शोध घेत असताना २०१७ ते २०२२ दरम्यान झालेल्या चाचण्यांची आकडेवारी गोळा केली. त्यात आढळले की, २०१७ साली १३,००० लोक अल्फा-गॅल पॉझिटिव्ह होते. २०२२ साली हीच संख्या १९,००० एवढी झाली. तज्ज्ञांच्या मते, रुग्णांची संख्या वाढण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. जसे की, लोन स्टार किटकाचा विस्तार वाढत चालला आहे. अनेक लोक या किड्यांच्या संपर्कात येत आहेत किंवा डॉक्टर अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना चाचणी करण्यास सांगत आहेत.
डॉक्टरही आजाराबाबत अनभिज्ञ
अमेरिकेत एक दशकभर या ॲलर्जीने लाखो लोक त्रस्त झाले आहेत. मात्र, डॉक्टरांना अद्याप या आजारावर फारशी माहिती गोळा करता आलेली नाही. अमेरिकेमध्ये अल्फा-गॅल सिंड्रोम आजार झालेल्यांची संख्या अधिक जास्त असू शकते. कारण- अतिशय कमी किंवा विसंगत लक्षणे, आरोग्य सेवेमधील आव्हाने आणि आजाराच्या चिकित्सेबद्दल जागरूकता नसल्यामुळे अनेक रुग्ण समोर आलेले नाहीत, अशी माहिती ‘सीडीसी’च्या डॉ. जोहाना सल्झर यांनी दिली.
‘सीडीसी’ने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये सहलेखक असलेल्या डॉ. ॲन कारपेंटर यांनी सांगितले की, अल्फा-गॅल सिंड्रोम ही अमेरिकेतील एक सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून पुढे येत आहे. या आजारामुळे रुग्णाच्या आरोग्यावर आयुष्यभर राहतील असे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
सीडीसी यांच्यासह अमेरिकेतील १,५०० प्राथमिक उपचार करणारे डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिकांनीही एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये आढळले की, अर्ध्याहून अधिक नागरिकांना अल्फा-गॅल सिंड्रोमबद्दल काहीही माहिती नाही; तर पाच टक्के लोकांनी या आजारावर निश्चितपणे उपचार मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. संशोधकांनी ही माहिती वापरून ॲलर्जी झालेल्या रुग्णांची संख्या ४,५०,००० असल्याचे सांगितले.
डॉ. कमिन्स यांनी सांगितले की, ही ॲलर्जी काही रुग्णांमधून कायमची जाऊ शकते. कमिन्स यांनी १५ ते २० टक्के रुग्णांमध्ये अशा प्रकारचे बदल पाहिले आहेत. मात्र, लोन स्टार किड्याने पुन्हा चावा घेतला तर ॲलर्जीचा त्रास पुन्हा उद्भवू शकतो. किड्याचा दंश या आजाराचे मूळ असल्याचे त्यांनी सांगितले.