पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यासाठी गुरुवारी (दि. १३ जुलै) फ्रान्समध्ये पोहोचले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात विविध विषयांवर व्यापक चर्चा होणार असून त्यानंतर ते फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या सोहळ्यामध्ये भारताचे २६९ सदस्यांचे पथक सहभागी होणार आहे. फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस दरवर्षी १४ जुलै रोजी साजरा केला जातो. याला बॅस्टिल डे (Bastille Day) किंवा फ्रेंच राष्ट्रीय दिन असेही म्हणतात. या दिवशी लष्करी कवायत (military parade) संपन्न होते. तसेच देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१४ जुलै १७८९ रोजी फ्रान्समधील बॅस्टिल किल्ल्यावर हजारो नागरिक धडकले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. या दिवसामुळेच फ्रेंच क्रांतीची बिजे रोवली गेली, असे फ्रान्समधील लोक मानतात. त्यामुळे या दिवसाचे फ्रेंच नागरिकांसाठी अनन्य साधारण महत्त्व आहे. तसेच याच दिवशी १७९० साली फ्रेंच जनतेने एकत्र येत एकात्मतेचे प्रदर्शन केले होते, त्याला फ्रेंच भाषेत Fête de la Fédération म्हणतात. बॅस्टिल दिवस हा राजेशाहीचा अंत करणारा दिवस मानला जातो. बॅस्टिल दिवसानंतरही काही वर्ष फ्रान्समध्ये राजेशाही अस्तित्त्वात होती. बॅस्टिल दिवसाला राष्ट्रीय दिन म्हणून का साजरे केले जाते? तसेच १४ जुलै १७८९ साली नेमके काय झाले होते? या इतिहासाचा घेतलेला हा मागोवा….
Landed in Paris. Looking forward to boosting India-France cooperation during this visit. My various programmes today include an interaction with the Indian community later in the evening. pic.twitter.com/2rBClUL0zJ
— Narendra Modi (@narendramodi) July 13, 2023
बॅस्टिल डे (Bastille Day) कसा घडला
फ्रान्समध्ये अठराव्या शतकात दशकभरापासून चाललेल्या फ्रेंच क्रांतीची चुणूक बॅस्टिल दिवसाच्या निमित्ताने पाहायला मिळाली. या दिवसाने फ्रान्सच्या राजकीय आणि सामजिक जीवनावर मूलभूत असा प्रभाव टाकला आणि संपूर्ण जगाला लोकशाहीचा मूलभूत विचार दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता (Liberty, Equality, Fraternity) या लोकप्रिय संज्ञेचा जन्म फ्रेंच क्रांतीमध्येच झाला. फ्रान्समध्ये १४ व्या शतकापासून पॅरिसमधील बॅस्टिल किल्ला उभा होता. या ठिकाणी राजकीय कैद्यांना बंदिवासात टाकण्याची परंपरा होती. एकप्रकारे हे तुरुंगच होते. (प्रसिद्ध लेखक, तत्ववेत्ता व्हॉल्टेअर आणि कुप्रसिद्ध मार्क्विस डे साडे यांना बॅस्टिल तुरुंगात अनेकदा बंद करण्यात आले होते)
हे वाचा >> विकसनशील देशांच्या भक्कमपणे पाठीशी – मोदी; फ्रान्स दौऱ्यात द्वीपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी भेटीगाठी
बॅस्टिल किल्ल्यावर लोक धडकण्याआधी पॅरिसमध्ये आर्थिक आणि सामाजिक आघाड्यांवर तणाव निर्माण झाला होता. १७८० च्या दशकात फ्रान्सची अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचली होती आणि राजा लुईस सोळावे आणि राणी मेरी अँटोनेट यांची प्रतिमा अतिशय बेजबाबदार, बेशिस्त, उधळपट्टी करणारे आणि जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे अशी बनली होती. नापिकी आणि दुष्काळाने फ्रान्सच्या समस्यांमध्ये आणखी भर टाकली. १७८८ साली फ्रान्समधील जनतेच्या मोठ्या संख्येला खाण्यासाठी ब्रेड मिळवणेही कठीण होऊन बसले होते.
देशात अभूतपूर्व तणाव निर्माण झाला असताना सोळाव्या लुईसने इस्टेट जनरलची सभा बोलावली. त्या वेळेपर्यंत इस्टेट जनरल या संस्थेला ४०० वर्ष पूर्ण झाली होती. पण, राज्याच्या आज्ञेकडे या संस्थेला दुर्लक्ष करता येत नव्हते. या संस्थेमध्ये पाद्री (प्रथम इस्टेट), उमराव किंवा खानदानी लोक (द्वितीय इस्टेट) आणि सामान्य लोक (तृतीय इस्टेट) अशा तीन स्तरावरील लोकांचा समावेश होता. यापैकी तिसऱ्या गटाचे म्हणजेच सामान्य लोकांची संस्थेमधील संख्या जास्त होती; मात्र त्यांचा त्या तुलनेत प्रभाव नव्हता. सोळाव्या लुईसने जेव्हा इस्टेट जनरलची सभा बोलावली, तेव्हा यापैकी सामान्यांचा गट फुटला आणि त्यांनी वेगळी संस्था स्थापन केली. ज्याला राष्ट्रीय सभा (National Assembly) म्हटले गेले.
२० जून १९८९ रोजी सामान्य लोकांच्या गटाने पॅरिसमधील प्रसिद्ध टेनिस कोर्टवर ‘फ्रान्सचे नवे संविधान लिहिले जाईपर्यंत एकत्र राहण्याची’ शपथ घेतली. या शपथेला फ्रेंच इतिहासात टेनिस कोर्ट शपथ असे संबोधले गेले आहे. दरम्यान, राजा लुईसने पॅरिस शहरात अधिकाधिक सैनिकांना तैनात करायला सुरुवात केली. यामुळे परिस्थिती आणखी चिघळून तणाव निर्माण झाला. ११ जुलै रोजी राजाने जॅक्स नेकर या मंत्र्याची हकालपट्टी केली. हा एकमेव मंत्री असा होता, ज्याचा जन्म कुलीन घरात झाला नव्हता. लोकप्रिय जॅक्स नेकरची हकालपट्टी होताच, मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू होऊन त्याचे हिंसाचारात रुपांतर झाले.
त्यानंतर १४ जुलै रोजी सामान्य लोकांच्या एका मोठ्या गटाने शस्त्र, हत्यारांसह बॅस्टिल किल्ल्यावर धडक दिली.
बॅस्टिल किल्ल्याचा ताबा
फ्रेंच नागरिकांनी हल्ल्यासाठी बॅस्टिल किल्लाच का निवडला यालाही इतिहास आहे. या किल्ल्यात राजा लुईसच्या आदेशावरून लोकांना अटक करून डांबले जायचे. अटक केलेल्या कैद्यांवर न्यायिक खटला चालविला जायचा नाही, त्यांची बाजूही ऐकून घेतली जात नसे. १४ जुलै १७८९ साली जेव्हा जमावाने बॅस्टिल किल्ल्यावर चाल केली, तेव्हा तिथे असलेल्या सात कैद्यांची सुटका करण्यात आली.
बॅस्टिलचे राज्यपाल बर्नार्ड-रेने डे लुनाय यांनी जमावासोबत संवाद साधून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलकांच्या जमावावर गोळीबार करणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र, वाटाघाटी सुरू असताना राजाकडे संपर्क साधण्यात आला नाही. त्यामुळे जमाव आणखी अस्वस्थ झाला. दरम्यान, काही आंदोलकांनी बॅस्टिल किल्ल्याची संरक्षक भिंत पाडली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आंदोलक आत शिरू लागले. लोकांचा जमाव पाहून सैरभैर झालेल्या राज्यपाल डे लुनाय यांनी गोळीबाराचे आदेश दिले. सुरुवातीला सैनिकांनी गोळीबार करून आंदोलकांना रोखण्यात यश मिळवले. पण, त्यानंतर काही वेळात फ्रेंचच्या सशस्त्र दलाने जमावाच्या साथीने पुन्हा हल्ला केला आणि बॅस्टिलचा पाडाव केला. राज्यपाल डे लुनाय आणि पॅरिसच्या महापौरांची संतप्त जमावाने हत्या केली. फ्रेंच लोकांच्या हाताला पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांचे रक्त लागले.
वरती नमूद केल्याप्रमाणे बॅस्टिलच्या उठावानंतरही काही वर्ष फ्रान्समध्ये राजेशाहीने टिकाव धरला, पण बॅस्टिलच्या संग्रामामुळे सामान्य लोकांचा राग अनावर झाला तर काय होऊ शकते, याची चुणूक पाहायला मिळाली.
बॅस्टिलच्या उठावामुळे युरोपिय देशही हलले होते. बॅस्टिलच्या उठावाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडमधील दैनिक द गार्डियनने यावर लेख लिहिला होता, त्यातील उतारा या उठावाचे सार सांगतो. “ज्यावेळी राज्यातील सामान्य जनता आपल्या न्याय मागण्यांसाठी एकत्र जमली, तेव्हाच तिसऱ्या इस्टेटचा विजय झाला. त्यात त्यांनी टेनिस कोर्टवर घेतलेली शपथ ही एक लक्षणीय बाब ठरली. हा लोकांसाठी लोकांद्वारे केलेला विजय होता. पण, जेव्हा सामान्य लोकांनी शस्त्र हातात घेऊन हजारोंच्या संख्येने चाल केली आणि अन्याय-अत्याचाराचे प्रतीक असलेला किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा लोकांना आपल्या अफाट शक्तीची पहिल्यांदा प्रचिती आली. सरंजामशाहीने ग्रासलेल्या समाजाचे लोकांनी अक्षरशः कंबरडे मोडले.”
एक वर्षानंतर सोळावा लुईस सत्तेवर असताना फ्रेंच फेडरेशनने लोकांमधील एकतेचा उत्सव साजरा केला. लोकांमधील या एकतेने पुढे चालून फ्रेंच राज्यक्रांती घडवली. ज्यामध्ये गिलोटिनखाली राजेशाहीचा बळी देण्यात आला.
अनेक शतकांपासून १४ जुलै साजरा केला जातो
फ्रेंच राज्यक्रांती पश्चात राजकीय मंथन केल्यानंतर १४ जुलै हा बॅस्टिल डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. तथापि, १८७० साली फ्रान्ससाठी राष्ट्रीय दिवस साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. १४ जुलै १८८९ साली बॅस्टिलच्या उठावाला १०० वर्ष पूर्ण होणार होती. यादिवशी फ्रान्सने हिंसाचार आणि खून पाहिले होते, त्यामुळे १४ जुलै १८९० साली बॅस्टिल दिनाला राष्ट्रीय दिवस म्हणून जाहीर करण्यात आले. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय दिवस साजरा करण्यासाठी जो कायदा करण्यात आला, त्यात कोणत्या १४ जुलैसाठी हा दिवस साजरा केला जाणार हे मुद्दाम अस्पष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज प्रत्येकालाच हा बॅस्टिल डे असल्याचे वाटते.
Sharing highlights from the first day of the Paris visit. pic.twitter.com/OpGVkpqu9I
— Narendra Modi (@narendramodi) July 14, 2023
भारत आणि बॅस्टिल दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी २००९ साली बॅस्टिल डे सोहळ्याला उपस्थिती लावली होती. फ्रेंच सरकारच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, २००९ साली भारतीय सैन्य दलालाही बॅस्टिल डेच्या कवायतीमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. भारताच्या नौदल, हवाई दल आणि सैन्य दलातील ४०० जवान या सोहळ्यात सहभागी झाले होते. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सर्कोझी यांनी ही कवायत एकत्र पाहिली.