हृषिकेश देशपांडे
राज श्रीकांत ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश ही आता औपचारिकता आहे. दिल्लीत राज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यापूर्वी भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी संवाद साधला. तावडे यांना भाजप संघटनेत महत्त्वाचे स्थान आहे. यामुळे राज यांच्या दिल्ली दौऱ्यात मनसेचे इंजिन अधिक उजवीकडे वळणार म्हणजेच हिंदुत्वाकडे वळणार हे स्पष्टच झाले. राज यांनी मराठी माणूस याबरोबरच हिंदुत्वावर भर दिला आहे. आता या नव्या आघाडीत भाजपचा लाभ अधिक की मनसेचा याचा वेध घेतला पाहिजे.

मनसेची ताकद नेमकी कोठे? 

मनसेचा लोकसभेपेक्षा विधानसभेत अधिक जागा लढवून स्थान भक्कम करण्यावर भर राहील. राज्यात विधानसभेचे २८८ मतदारसंघ आहेत. मतदारसंघ फेररचनेनंतर लोकसंख्येच्या आधारे शहरी भागात मतदारसंघ जास्त आहेत. मुंबई-ठाणे-पुणे-नाशिक या मनसेचे बऱ्यापैकी अस्तित्व व कार्यकर्त्यांची फळी असलेल्या भागात विधानसभेचे ९० ते १०० मतदारसंघ येतात. यामुळेच भाजपच्या सहकार्याने येथे काही जागा लढवून आमदार निवडून आणण्यावर त्यांचा भर राहील. मनसेने हिंदुत्वावर भर दिलाय. त्यामुळे भाजपला त्यांना घेण्यात काही अडचण नाही. मात्र परप्रांतीयांच्या विरोधाच्या मुद्द्यावर भाजप काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे ठरते. राज यांच्या वक्तृत्वाचा भाजपला लाभ उठवायचा आहे. 

Raigad, Dilip Bhoir expelled from BJP, Dilip Bhoir,
रायगड : दिलीप भोईर यांची भाजपातून हकालपट्टी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
BJP Manifesto for Jharkhand Assembly Elections 2024
समान नागरी कायदा, ओबीसी आरक्षण; झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा
Jitendra Awad criticism of BJP regarding the murders print politics news
हत्या करणे भाजपच्या डाव्या हाताचा खेळ; जितेंद्र आव्हाड यांची टीका
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
BJPs efforts to stop the Rebellion therefore aim for victory
विजयाचे लक्ष्य, म्हणून बंडखोरी थंड करण्याचे भाजपचे प्रयत्न
BJP succeeded in pacifying Samrat Mahadiks rebellion in Shirala Constituency
शिराळ्यातील बंडोबाना थंड करण्यात भाजपला यश
Vidhan Sabha election 2024, Arvi Constituency,
बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर, आर्वीत विद्यमान आमदार घेणार माघार

हेही वाचा >>>आइन्स्टाईनच्या मेंदूची चोरी आणि २४० तुकडे; जाणून घ्या महान वैज्ञानिकाच्या मृत्यूनंतरचे गूढ

युतीत अडचणीही…

वरिष्ठ पातळीवर नेते जरी एकत्र आले असले, तरी कार्यकर्ते कसे जमवून घेणार? भाजपने इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणले आहेत. जागावाटपात आणखी एक वाटेकरी वाढल्यावर आताच तिढा मग तो आणखी वाढणार. राज ठाकरे वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच त्यांच्या भूमिकेवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करतात. आता अजित पवार आणि राज एकत्र कसे येतील? भाजपमध्ये विशेषत: मुंबई पट्ट्यात परप्रांतीय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना राज यांना नव्या आघाडीत सामावून घेणे कितपत रुचेल? याखेरीज मुंबईत हिंदी भाषिकांची मते मोठ्या प्रमाणात भाजपकडे आहेत. काँग्रेसने जर मनसे-भाजप युतीचा मुद्दा प्रचारात पुढे आणल्यास या मतदारांमध्ये चलबिचल होईल. मुंबईत एका अनुमानानुसार जवळपास ३५ ते ४० टक्के मराठी मते आहेत. हिंदी भाषिक १८ ते २२ टक्के मतदार तर उर्वरित टक्का अन्य प्रांतामधील नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्यांची आहे. मराठी मते प्रामुख्याने उद्धव ठाकरे गट व मनसेत जातात. भाजप, काँग्रेस तसेच इतर पक्षांनाही मराठी मते मिळतात. पण भुमिपुत्रांच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंना मराठी मतदारांची जास्त सहानुभूती आहे. 

मते वळणार काय? 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ११० जागा लढवून केवळ कल्याणमधील एक जागा जिंकली होती. त्यांचे दहा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. तर २.४ टक्के मते त्यांना मिळाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दीड टक्के मते मिळाली. गेल्या वेळी त्यांनी भाजपविरोधात प्रचार केला होता. थोडक्यात मनसेचा असा दीड ते अडीच टक्के निष्ठावंत मतदार मानला तर राज्यात दोन आघाड्यांच्या संघर्षात ही मतेही निर्णायक ठरतील असा भाजपचा होरा आहे. मात्र ही मते वळणे महत्त्वाचे आहे. शिवसेना विरुद्ध भाजप किंवा अजित पवार गटाकडे ही मते वळणार काय, हा मुद्दा आहे. तरीही भाजपसाठी मनसेचा मतदार आणि राज यांची वक्तृत्वशैली आघाडीसाठी महत्त्वाची ठरते.

हेही वाचा >>>निवडणूक आयोग मतदानाचे वेळापत्रक कसे तयार करते? सभागृहाच्या अटी ठरवण्यासाठी नियम काय?

फायदा-तोट्याचे गणित

युतीत प्रत्येक पक्ष फायदा-तोट्याचे गणित बघतो. भाजपसाठी लोकसभेला महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागांचे उद्दिष्ट ठेवताना राज यांना आघाडीत घेणे म्हणजे शहरी-निमशहरी भागातील मनसेची मते मिळणे याची तजवीज करून ठेवणे. राज यांची आक्रमक भाषणे प्रचारात उपयोगी पडतील. मनसेला या आघाडीचा लाभ किती? त्यांना लोकसभेला एखादी जागा लढवण्यासाठी मिळेल. त्या बदल्यात पक्षाच्या विश्वासार्हतेचे काय? गेल्या निवडणुकीत राज यांनी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला होता. आता यंदा नेमकी उलटी भूमिका ते कार्यकर्त्यांना कशी समजून सांगणार? मनसेचे कार्यकर्तेही भूमिकेने गोंधळून जातील.

विधानसभेसाठी रणनीती? 

लोकसभेनंतर चार ते पाच महिन्यांत विधानसभा तसेच महापालिका निवडणुका आहेत. विधानसभा निवडणुकीत जर राज यांच्याशी आघाडी केली तर, फायदा होईल असे भाजपच्या धुरिणांचे गणित दिसते. विशेषत: मुंबई, कोकण पट्ट्यात उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राज यांच्याशी आघाडीतून ठाकरे गटाला शह देता येईल. भाजपशी आघाडी करून राज यांना लाभ मिळतोय असे चित्र निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या गटातून काही कार्यकर्ते बाहेर पडू शकतात. प्रमुख विरोधकांना कमकुवत करणे हे भाजपचे धोरण आहे. आधीच भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पाडली, आता राज यांच्याशी आघाडीतून मुंबई-कोकणात ठाकरे गटाला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ५० हजार कोटींवर आहे. एकूणच या महानगराचे देशातील स्थान, जगातील महत्त्व या गोष्टी विचारात घेता पालिकेवर ताबा मिळवण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा आहे. शिवसेनामधील फुटीमुळे भाजपला यशाची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शहरात पाच ते सहा आमदार आहेत. महायुतीत हे पक्ष जोडून पालिका स्वबळावर जिंकण्याचा भाजपचा मनसुबा आहे. अर्थात जागावाटप हा त्यातील तिढा आहे. शहरातील प्रभाग मोठे आहेत. एका पक्षातच पालिकेला तीन ते चार जण इच्छुक आहेत. मग चार पक्षांमध्ये जागा कशा वाटणार, याचा तिढा सोडवावा लागेल. भाजपने विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊनच राज यांच्याशी जवळीक केली आहे.राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने भाजपलाही राज यांच्याशी आघाडी करणे सोयीचे झाले. मात्र आता महायुतीतील इतर पक्ष कसा प्रतिसाद देतात, यावर पुढील भवितव्य ठरेल.

hrishikesh.deshpande@expressindia.com