राज्य वित्त आयोग स्थापण्यामागची भूमिका ?

केंद्राच्या पातळीवर वित्त आयोग स्थापण्याची घटनेत तरतूद करण्यात आली होती, राज्यांमध्ये ती नव्हती. पंचायतींना जादा अधिकार देणाऱ्या ७३व्या घटना दुरुस्तीत ही तरतूद करून यानुसार वित्त आयोग स्थापन करण्यात आले. अनेक राज्यांनी विलंबाने ते स्थापन केले. महाराष्ट्रात सहावा वित्त आयोग आहे, तर अरुणाचल प्रदेशने अद्यापही तो स्थापन केलेला नाही. काही राज्यांमध्ये अजूनही दुसरा किंवा तिसरा आयोगच अजून कार्यरत आहेत. यामुळेच १५व्या वित्त आयोगाने राज्यांनी वित्त आयोग स्थापन न केल्यास केंद्राचा निधी रोखण्याचा इशारा दिला होता. केंद्राकडे कर रूपाने जमणाऱ्या निधीतून राज्यांना किती निधी द्यायचा याची केंद्रीय वित्त आयोग केंद्र सरकारला शिफारस करते. राज्य वित्त आयोगाकडून नगरपालिका, जिल्हा परिषदा वा पंचायतींना किती प्रमाणात राज्य निधीतून निधीचे वाटप करायचे याची शिफारस केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य वित्त आयोगाची मुख्य जबाबदारी काय असते ?

राज्याला कर, शुल्क, पथकर व फी यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे राज्य, पंचायती व नगरपालिका यांच्यात वाटप करणे व अशा उत्पन्नाची पंचायती व नगरपालिका यांच्या सर्व स्तरांवरील त्यांच्या त्यांच्या हिश्श्यांचे वाटप करण्याची शिफारस करणे. पंचायती किंवा नगरपालिका यांना राज्याच्या एकत्रित निधीमधून देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदानाचे नियमन करणारी तत्त्वे ठरविणे. पंचायती व नगरपालिका यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविणे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निधी व्यवस्थापनासाठी कार्यपद्धती ठरविणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या शिफारसी करणे. याशिवाय नगरपालिका, जिल्हा परिषदा वा पंचायती या आर्थिकदृष्ट्या सक्षम कशा होतील याचाही आढावा आयोगाकडून घेतला जातो.

वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी होते का ?

केंद्रीय किंवा राज्य वित्त आयोगाची जबाबदारी सल्ला देणे किंवा शिफारस करणे एवढीच असते. केंद्राकडून जमा होणाऱ्या एकूण महसुलापैकी ४१ टक्के रक्कम राज्यांकडे हस्तांतरित करावी, ही महत्त्वपूर्ण शिफारस केंद्राने स्वीकारली होती. पण तेवढी रक्कम मिळत नाही, असा राज्यांचा आक्षेप असतो. तमिळनाडूला ३३ टक्केच रक्कम मिळाले या मुद्द्याकडे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी लक्ष वेधले होते. महाराष्ट्रातही वित्त आयोगाच्या शिफारसींची पूर्तता झालेली नाही. चौथ्या वित्त आयोगाने राज्य सरकारकडे जमा होणाऱ्या एकूण महसुली रक्कमैपैकी ४५ टक्के रक्कम ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हस्तांतरित करावी, अशी शिफारस केली होती. पण राज्य सरकारला ती अमलात आणणे शक्य झालेले नाही. पाचव्या वित्त आयोगाच्या अहवालात राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण जमा होणाऱ्या महसुलातून फक्त २२ टक्के रक्कमच वितरित करण्यात आल्याची आकडेवारी सादर केली होती. महाराष्ट्रात झपाट्याने झालेले नागरीकरण लक्षात घेता नगरपालिकांना अधिकचा निधी देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती. पण नागरीकरणाचा वेग आणि त्यासाठी दिली जाणारी रक्कम यात विषमता अधिक असल्याचे निरीक्षणही पाचव्या वित्त आयोगाने नोंदविले आहे.

वित्त आयोगाच्या शिफारसी सरकारवर बंधनकारक असतात का ?

वित्त आयोग हा शिफारसी वा सल्ला देण्यासाठी नेमलेला असतो. त्याच्या शिफारसी केंद्र व राज्य सरकारांवर बंधनकारक नसतात. राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरतील अशा शिफारसी सरकारकडून स्वीकारल्या जातात. अनेक शिफारसी या कागदावरच राहतात.

सहाव्या वित्त आयोगाचा नगरपालिका वा पंचायतींना फायदा होईल का ?

जकात कर, स्थानिक स्वराज्य कर हे रद्द झाल्यापासून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या पूर्णपणे सरकारकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून असतात. मुंबईसारख्या देशातील श्रीमंत महानगपालिकेला राज्य शासनाकडून मिळणारी सुमारे १५ हजार कोटींची नुकसानभरपाईची रक्कम महत्त्वाची असते. लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा लोकप्रिय व सवंग योजनांमुळे राज्य शासनाची आर्थिक बाजू लंगडी झाली आहे. वित्तीय तूट वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका वा पंचायती सक्षम करण्याची आवश्यकता मंत्रिमंडळाने व्यक्त केली असली तरी अधिकचा निधी पालिकांच्या वाट्याला येण्याबाबत साशंकताच आहे.