Best Time For Exercise: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी एक उत्तम जीवनशैली बाळगण्याची गरज आहे. काहींच्याबाबत कितीही ठरवलं तरी रोजच्या आयुष्यात रुटीन फॉलो करणं शक्य होत नाही. अशावेळी आपल्या सोयीप्रमाणे अनेकांनी व्यायामाचे- आहाराचे वेगवेगळे रुटीन बनवले आहेत. यापैकी एक म्हणजे ३० मिनिट वर्कआउट. तुम्ही गूगल किंवा युट्युबवर ३० मिनिट वर्कआउट असं शोधलं तर तुम्हाला शेकडो व्हिडीओ मिळतील पण या व्हिडीओमधून केले जाणारे दावे खरे असतातच असे नाही. तुमच्या शरीराला व्यायामाची सवय लावण्यासाठी हे व्हिडीओ उपयुक्त असूही शकतील पण जर तुम्ही सुदृढतेचे मिशन घेऊन व्यायाम करत असाल तर तुम्हाला या ३० मिनिटांचा वर्कआउट कधीच पुरेसा ठरू शकत नाही.
फिनलंडमधील एका अभ्यासात याबाबत माहिती देण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी ३७०० व्यक्तींचे निरीक्षण केले गेले. या ३७०० जणांना तीन गटात विभागण्यात आले होते. ज्यातील एक गट ३० मिनिट व्यायाम करून दिवसभर शरीर किमान सक्रिय ठेवणारा होता, दुसरा गट हा केवळ ३० मिनिट व्यायाम करून दिवसभर एका जागी बसून काम करणारा होता तर तिसरा गट हा व्यायाम किंवा अन्य मार्गाने काहीच क्रिया न करणारा होता.
निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार पहिल्या गटातील व्यक्तींच्या शरीरात कोलेस्ट्रॉल, बॉडी फॅट व रक्तातील साखर योग्य प्रमाणात होती. तर दुसऱ्या गटामध्ये संतुलित आरोग्य दिसून आले होते मात्र तरीही पहिल्या गटाच्या तुलनेत या व्यक्तींना आजाराचा धोका अधिक होता. यावरून हे सिद्ध होते की तुम्हाला सुदृढ शरीर हवे असल्यास केवळ ३० मिनिट वर्कआउट करून फायदा नाही तर दिवसभरही शरीराची किमान हालचाल करणे आवश्यक आहे.
शरीराला नेमका किती वेळ व्यायाम आवश्यक आहे?
ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून 2.5 ते 5 तास व्यायाम करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे हे तास तुम्ही कसेही विभागून घेऊ शकता. यात एक दिवस व्यायाम एक दिवस आराम ही पद्धत उत्तम करत असल्याचा दावा अनेक तज्ज्ञांकडून केला जातो. तसेच या व्यायामाच्या कालावधीत तुम्ही रोजच अगदी क्लिष्ट किंवा वेगवान व्यायामाच करायला हवा असे नाही. आपण रुटीनमध्ये पॉवर वॉक, हलके जॉगिंग, योगा व स्ट्रेचिंग असेही प्रकार समाविष्ट करू शकता.
मात्र आठवड्यातून निदान एक ते दोन तास अधिक हालचाल होईल असे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. ज्या व्यक्ती ऑफिसमध्ये किंवा एकूणच बसून काम करण्यात अधिक वेळ घालवतात त्यांनी साधारण व्यायाम म्हणजे पायऱ्या चढणे, मीटिंग आणि कॉन्फरन्स रूममध्ये चालणे आणि फोन घेताना चालत संभाषण करणे असे पर्याय वापरून पाहावेत. शक्य असल्यास आपण निदान महिन्यातून एकदा लांब पल्ल्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्याचा विचार करावा.
दरम्यान, आपण व्यायाम का करता हे उद्दिष्ट प्रत्येकाने स्पष्ट ठेवावे, जेणेकरून त्याच दिशेने तुम्हाला वाटचाल करता येईल. बहुतांश व्यक्ती वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात अशा व्यक्तींना अधिक कॅलरीज बर्न करण्यासाठी अधिक हालचाल करण्याची गरज आहे. शरीरातील फॅट्स म्हणजेच चरबी वितळण्याची संयुगे तुटण्याची गरज असते, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण हालचाल करतो तेव्हा फॅट्सची झीज होऊन वितळण्यास मदत होते परिणामी अतिरिक्त वजन आटोक्यात येऊ शकते. व्यायामासह आहाराकडे लक्ष देणेही गरजेचे आहे.