सलग तीन-चार दिवसांच्या चर्चेनंतर अखेर मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्याला पुन्हा मिळवलेच. गेल्या दोन हंगामांत गुजरात टायटन्सचे यशस्वीपणे नेतृत्व केल्यानंतर हार्दिक इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील आपला पहिला संघ मुंबईकडे परतला आहे. त्याच वेळी १९ डिसेंबरला होणाऱ्या लिलावात आणखी खेळाडू खरेदी करण्यासाठी काही रक्कम उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरुन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडे पाठवले आहे. ही नक्की प्रक्रिया काय आहे, याचा आढावा.
हार्दिक मुंबईकडे परतल्याची अधिकृत घोषणा करण्यात का वेळ लागला?
तीन-चार दिवसांपूर्वी हार्दिक मुंबईकडे परतण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने गेल्या दोन हंगामांत अनुक्रमे जेतेपद आणि उपविजेतेपद मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यामुळे गुजरातचा संघ हार्दिकला दुसऱ्या संघाकडे पाठवेल याची शक्यता फार कमी वाटत होती. त्यानंतर गुजरात आणि मुंबई या संघांमध्ये सातत्याने संवाद झाला. असे असले तरी आगामी हंगामाकरिता खेळाडूंना कायम ठेवणे आणि करारमुक्त करणे यासाठी दहाही संघांकडे २६ नोव्हेंबरच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंतचा वेळ होता. त्यानंतर सर्व संघांनी आपली खेळाडूंची यादी जाहीर केली. यात गुजरातने हार्दिकला संघात कायम ठेवले होते; परंतु पडद्यामागे हार्दिकला मुंबईकडे पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, ५ वाजेपूर्वी करारावर स्वाक्षऱ्या न झाल्याने हार्दिक मुंबईकडे परतल्याची अधिकृत घोषणा रविवारी करण्यात आली नाही. सोमवारी (२७ नोव्हेंबर) मात्र दोन्ही संघ, तसेच ‘आयपीएल’ने याबाबत घोषणा केली.
हेही वाचा : विश्लेषण: यंदाच्या साखर हंगामापुढील आव्हाने कोणती?
२०२२च्या हंगामापूर्वी मुंबईने हार्दिकला करारमुक्त का केले होते?
२०२२च्या हंगामापूर्वी गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवे संघ अस्तित्वात आले. त्यांच्याकडेही तारांकित खेळाडू असावेत यासाठी ‘बीसीसीआय’ने मोठा खेळाडू लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आधीपासून ‘आयपीएल’चा भाग असलेल्या आठ संघांना केवळ चार खेळाडू संघात ठेवण्याची मुभा देण्यात आली. तर दोन नव्या संघांना प्रत्येकी तीन खेळाडू लिलावाच्या आधीच खरेदी करता येणार होते. त्या वेळी मुंबईने कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्ड या चार खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा, तर हार्दिकला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. हार्दिकला जो आर्थिक मोबदला अपेक्षित होता, तो देणे मुंबईला शक्य नसल्याची त्या वेळी चर्चा होती. त्यानंतर गुजरातने १५ कोटी रुपये देत हार्दिकला करारबद्ध केले आणि त्याची कर्णधारपदीही निवड केली. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने पदार्पणाच्या म्हणजेच २०२२च्या हंगामात जेतेपद पटकावले, तर २०२३च्या हंगामात गुजरातला अंतिम सामन्यात चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला. या दोन हंगामांत गुजरातचा संघ साखळी फेरीअंती गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिला. मात्र, या यशानंतरही हार्दिक आणि गुजरात संघाने एकमेकाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.
हार्दिकला परत मिळवण्यासाठी मुंबईने कशा प्रकारे हालचाली केल्या?
गुजरात संघाने हार्दिकला १५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्यामुळे त्याला परत मिळवायचे झाल्यास मुंबईला तितकीच रक्कम गुजरातला द्यावी लागणार होती. मात्र, प्रत्यक्षात मुंबईकडे केवळ २५ लाख रुपयेच शिल्लक होते. त्यानंतर रविवारी (२६ नोव्हेंबर) मुंबईने जोफ्रा आर्चरसह ११ खेळाडूंना करारमुक्त केल्याने त्यांना १५.२५ कोटी रुपये उपलब्ध झाले. यातील १५ कोटी रुपये एकट्या हार्दिकसाठी मोजल्यास आगामी लिलावात खेळाडू खरेदीसाठी मुंबईकडे फारच कमी पैसे शिल्लक राहिले असते. यावर तोडगा म्हणून मुंबईने कॅमरुन ग्रीनला बंगळूरु संघाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. गेल्या खेळाडू लिलावात मुंबईने ग्रीनला तब्बल १७.५० कोटी रुपयांत खरेदी केले होते. आता बंगळूरुकडून इतकीच रक्कम मिळाल्याने मुंबईला आगामी लिलावात खेळाडू खरेदी करण्यासाठी १७.७५ कोटी रुपये उपलब्ध असणार आहेत.
‘आयपीएल’मध्ये ‘ट्रेड’ ही संकल्पना नक्की काय आहे?
अमेरिकन क्रीडा स्पर्धांमध्ये ‘ट्रेड’ ही संकल्पना पूर्वीपासूनच राबवली जात आहे. एखाद्या संघाला दुसऱ्या एखाद्या संघातील खेळाडू हवा असल्यास, त्याच्या मोबदल्यात त्या संघाला आपला खेळाडू किंवा पैसे द्यावे लागतात; परंतु यासाठी दोन्ही संघांना, तसेच हे संघ खेळत असलेल्या लीगला तो व्यवहार मान्य असणे गरजेचे असते. ‘आयपीएल’मध्येही ‘ट्रेड’ची संकल्पना राबवली जात आहे. खेळाडू लिलावप्रकियेच्या सात दिवसांआधीपर्यंत संघांना खेळाडूंना ‘ट्रेड’ करण्याची मुभा असते. तसेच लिलावाच्या एका दिवसानंतर ते नव्या हंगामाला सुरुवात होण्याच्या ३० दिवस आधीपर्यंत खेळाडूंना ‘ट्रेड’ करता येते; परंतु लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूला त्याच वर्षी दुसऱ्या संघात पाठवण्याची परवानगी नसते.
हेही वाचा : भारतीय कामगारांची गरज असलेल्या तैवानवर चीनची कुरघोडी; निर्भया प्रकरणावरून भारताची बदनामी
‘ट्रेड’ची प्रक्रिया कशा प्रकारे चालते?
ही प्रक्रिया दोन पद्धतीने चालते. एक म्हणजे खेळाडू एका संघाकडून दुसऱ्या संघाकडे जातो आणि त्याच्या जुन्या संघाला त्या खेळाडूला मिळणारी रक्कम लिलावासाठी उपलब्ध होते. याचे उदाहरण म्हणजे हार्दिक मुंबई संघात गेल्याने आता गुजरातला त्याला मिळणारी १५ कोटी ही रक्कम लिलावात वापरण्यासाठी उपलब्ध असेल. दुसरी पद्धत म्हणजे दोन संघ खेळाडूंची अदलाबदल करतात. याचे उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी देवदत्त पडिक्कल आणि आवेश खान यांची अदलाबदल केली. गेल्या हंगामात राजस्थानकडून खेळलेला पडिक्कल आता लखनऊकडून खेळेल, तर लखनऊकडून खेळलेला आवेश आगामी हंगामात राजस्थानचे प्रतिनिधित्व करेल. तसेच फुटबॉलप्रमाणे इथेही ‘ट्रान्सफर फी’ असते. म्हणजेच हार्दिकच्या मोबदल्यात मुंबईच्या संघाला गुजरातला काही रक्कम द्यावी लागेल. याबाबतची माहिती ते ‘बीसीसीआय’ला देतील. यातून खेळाडूलाही काही हिस्सा मिळतो. अशा प्रकारे ही सर्व प्रक्रिया राबवली जाते.