गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा आयपीएलचा सामना झाला. या सामन्यादरम्यान गुजरात टायटन्स संघ ‘लॅव्हेंडर’ रंगाच्या जर्सीत झळकाल्याचे सर्वांनी पाहिले. त्यानंतर अनेक माध्यमातून त्यांनी परिधान केलेल्या ‘लॅव्हेंडर’ जर्सीवर चर्चा झाली. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने त्यांनी परिधान केलेल्या ‘लॅव्हेंडर जर्सी’ मागील उद्देश जाहीर केला होता. भारतात तसेच जगात कर्करोगासारख्या (कॅन्सर) विकाराने बळी जाणाऱ्यांची संख्या वेगात वाढते आहे. याच रोगासंबंधी जनजागृती करण्यासाठी आणि कर्करोगा विरुद्धच्या लढाईला पाठिंबा दर्शविण्यासाठी लॅव्हेंडर रंगाचा प्रतिकात्मक वापर करण्यात आलेला आहे. तसेच कर्करोगपीडित व त्यांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना दर्शविण्यासाठी आयपीएल सामन्यांदरम्यान गुजरात टायटन्सकडून या रंगाची जर्सी परिधान करण्यात आली होती. लॅव्हेंडर हा रंग सर्व प्रकार कर्करोगाच्या जनजागृतीचे प्रतिनिधित्त्व करतो. एकूण ४३ रंग वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या जनजागृती मोहिमेचे प्रतिनिधित्त्व करतात. किडनीसाठी लाल, स्तनांच्या कर्करोगासाठी गुलाबी तर त्वचेच्या कर्करोगासाठी काळा अशा वेगवेगळ्या रंगांचा वापर करण्यात येतो.
आणखी वाचा: विश्लेषण: बॅडमिंटनला ‘पूना गेम’ म्हणून का ओळखतात?
कर्करोगाची दाहकता
जागतिक स्तरावर कर्करोग किंवा कॅन्सर हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. २०२० सालामध्ये कर्करोगामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या ९.९ दशलक्ष इतकी होती. इतकेच नव्हे तर गेल्या दशकात कर्करुग्णांच्या संख्येत २६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातील आकडेवारीनुसार सध्या आपल्या देशात कर्करुग्णांची संख्या २० लाखांच्या घरात आहे. हे खरे असले तरी, प्रत्यक्षात हा आकडा तीन पट अधिक असण्याची शक्यता सर्वेक्षणातून समोर आली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे ५१ टक्के रुग्णांच्या निदानासाठी एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लागतो, तर ४६ टक्के रूग्ण उपचारांसाठी उशीर करतात. त्यामुळे प्रत्यक्ष आकडेवारीत कर्करूग्णांची संख्या कमी आढळते. २०२० सालच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार चीन व अमेरिकेनंतर कर्करुग्णांच्या संख्येत भारताचा क्रमांक लागतो.
नऊपैकी एकाला कर्करोग
केरळ, मिझोराम, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब आणि आसाम या राज्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आढळले आहे. एक लाख लोकसंख्येच्या मागे कर्करुग्णांचे प्रमाण १३० पेक्षा अधिक आहे. आयसीएमआरच्या अहवालानुसार , सध्याच्या काळात नऊ भारतीयांपैकी एकाला कर्करोग असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ६८ पुरुषांमागे एका पुरुषाला फुफ्फुसाचा कर्करोग होतो तर २९ स्त्रियांमागे एकीला स्तनाचा कर्करोग होतो. गेल्या ५० वर्षांमध्ये भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे ४५ वरून १० पर्यंत घसरले आहे. उशीरा विवाह, कमी मुले, चांगली स्वच्छता आणि लसीकरण (ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस (HPV)) यामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग्यांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु त्याच वेळी उशीरा विवाह, उशीरा मूल होणे, स्तनपान न करणे आणि उच्च प्रथिनेयुक्त आहार यामुळे स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टर सांगतात, विशेषत: शहरी भागात याचे प्रमाण अधिक दिसते. या तुलनेत तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण कमी झाले आहे. तंबाखू- धूम्रपान यांच्या प्रमाणात घट झाली तरी प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगात घट झाल्याचे आढळून येत नाही.
लॅव्हेंडर आणि कर्करोग यांचा संबंध काय?
लॅव्हेंडर फुलांचा रंग कर्करोगाच्या जनजागृतीच्या मोहिमेचे प्रतिनिधित्त्व करतो. लॅव्हेंडर फूल हे शांतता, शुद्धता, समर्पण यांचे प्रतीक मानले जाते. पूर्वीपासून कर्करोगाच्या उपचारात लॅव्हेंडर बहुतेकदा गंधोपचारासाठी वापरले जात असे. संशोधनानुसार चिंता आणि वेदना कमी करण्यासाठी तसेच झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लॅव्हेंडर लक्षणीय प्रभावी मानले जाते. कर्करोगाची गुंतागुंत कमी करण्यासाठी लॅव्हेंडर प्रभावी असल्याचे संशोधनांत सिद्ध झालेले आहे. कर्करोगाच्या गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी आरोग्य सेवा प्रदात्यांना इतर आरोग्य सेवांसोबत रुग्णांच्या उपचारामध्ये लॅव्हेंडर तेल वापरण्याची सूचना केली जाते. म्हणूनच लॅव्हेंडर रंग हा सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या जनजागृती मोहिमेत वापरण्यात येतो.
आणखी वाचा: विश्लेषण : भारतीय संस्कृतीतील मातृसत्ताक कुटुंबपद्धती !
क्रिकेट संघानी कर्करोग जनजागृतीसाठी वापरलेले रंग
२०१३ साली दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाने पाकिस्तान विरुद्ध झालेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात गुलाबी रंगाची जर्सी परिधान केली होती. गुलाबी रंग हा स्तन कर्करोगाच्या जनजागृतीच्या मोहिमेत वापरला जातो. दक्षिण आफ्रिकेनेही त्याच कारणासाठी गुलाबी रंगाची जर्सी परिधान केली होती. गुलाबी जर्सी परिधान करून जिंकलेल्या रकमेचे दान त्यानी स्तन कर्करोगाच्या उपचारासाठी दिले होते. या सामन्यानंतर तब्बल नऊ सामने त्यांनी गुलाबी रंगाच्या जर्सीत खेळले. आठ सामन्यात त्यांना विजय प्राप्त झाला होता. गुलाबी जर्सी ही दक्षिण आफ्रिकेच्या संघाची ओळखच ठरली. विशेष म्हणजे गुलाबी रंगाची जर्सी व दक्षिण आफ्रिका यांचे समीकरणच झाले आहे. १७ मार्च २०१३ (पाकिस्तान), ५ डिसेंबर २०१३ (भारत) , १८ जानेवारी २०१५ (वेस्ट इंडिज), १२ फेब्रुवारी २०१६ (इंग्लंड), ४ फेब्रुवारी २०१७ (श्रीलंका), १० फेब्रुवारी २०१८ (भारत), ४ एप्रिल २०२१ (पाकिस्तान) , २० मार्च २०२२ (बांगलादेश) इत्यादी देशांचा पराभव दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाने केला होता. भारतात राजस्थान रॉयल्स यांच्या जर्सीच्या रंगातूनही कर्करोगासंदर्भात जनजागृती निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. राजस्थान रॉयल्सने २०१८ साली ट्विटरवर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या जर्सीत गुलाबी, टील आणि बरगंडी या रंगांचा वापर करण्यात आला आहे. बरगंडी हा तोंडाच्या तसेच डोक व मान कर्करोगाच्या तर निळ्या- हिरव्याच्या मिश्रणातून तयार होणारा टील हा रंग गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या जनजागृतीचे प्रतिनिधित्त्व करतो.