इंद्रायणी नार्वेकर
पाच वर्षांपूर्वी गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळला. तेव्हापासून सुरू झालेले गोखले पुलाचे कवित्व आजतागायत सुरू आहे. या पुलावरून एमएसआरडीसी, रेल्वे आणि मुंबई महापालिका या तीन प्राधिकरणांच्या वादात सर्वसामान्य नागरिकांचे गेल्या काही वर्षांपासून हाल सुरू आहेत.
पुलाची दुरुस्ती का हाती घेण्यात आली?
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले पूल हा पश्चिम उपनगरातील महत्त्वाचा पूल आहे. पाच वर्षांपूर्वी पावसाळ्यात ३ जुलै २०१८ रोजी अंधेरी स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या गोखले पुलाचा भाग ट्रॅकवर पडून मोठी दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत दोन जण दगावले होते तर पश्चिम रेल्वेची वाहतूकही एक दिवस बंद ठेवावी लागली होती. गोखले पूल किती जीर्ण झाला होता हे उघडकीस आले होते. त्यावेळीही पुलाच्या देखभालीची जबाबदारी कोणाची यावरून रेल्वे आणि पालिका प्रशासन यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यावेळी पुलाचा रेल्वे ट्रॅकवरील भाग रेल्वे प्रशासनाने दुरुस्त केला आणि तो पादचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आला होता. नंतर या पुलाच्या उताराच्या भागाची पुनर्बांधणी पालिकेने हाती घेतली होती. मात्र पुनर्बांधणीचे कामही रखडले होते. त्यातच रेल्वे हद्दीतील पूलही धोकादायक झाल्याचा निर्वाळा पालिकेच्या सल्लागाराने दिला होता. त्यामुळे हा संपूर्ण पुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा >>>विश्लेषण : चीनच्या जिवावर मुईझ्झू उदार? भारताने मालदीवचा नाद सोडावा का?
रेल्वेवरील रुळांवरील पूल पालिका का बांधते आहे?
गोखले पूल हा रेल्वे रुळांवरून जाणारा आहे. या पुलाच्या जबाबदारीवरून आधीच रेल्वे आणि पालिका यांच्यात अनेक वाद झाले आहेत. रेल्वे रुळांवरील पुलाची बांधणी किंवा दुरुस्ती ही रेल्वेतर्फे केली जाते तर उताराचा भाग पालिका बांधते. त्यानुसार रेल्वेच्या हद्दीतील बांधकाम रेल्वेतर्फे करण्यात येणार होते व पालिकेच्या हद्दीतील काम पालिकेतर्फे केले जाणार होते. मात्र रेल्वेच्या हद्दीतील कामही रेल्वेने पालिकेवर सोपवले.
रेल्वे आणि पालिका यांच्यात वाद कशावरून?
गोखले पुलाच्या दुर्घटनेपासून या पुलाबाबत रेल्वे आणि पालिका यांच्यात वाद सुरू आहेत. देखभालीची जबाबदारी कोणाची यावरून आधी वाद होता. मग पूल कोणी पाडायचा, कोणी बांधायचा यावरून खल सुरू होता. मात्र या संपूर्ण विषयात रेल्वेने सगळी जबाबदारी पालिकेवर टाकली. गोखले पुलाच्या खालून मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे रूळ जातात. धीम्या व जलद गतीचे मार्ग तसेच सीएसटी ते गोरेगावपर्यंतच्या हार्बर मार्गाचे दोन रुळही या पुलाखालून जातात. यासंपूर्ण भागावर रेल्वेचे नियंत्रण असते. रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या उच्च क्षमतेच्या विद्युत वाहिन्या, इतर तांत्रिक घटक यांची केवळ रेल्वेच्या यंत्रणेला माहीत असते. त्यामुळे हे काम पश्चिम रेल्वेनेच करावे अशी पालिकेची भूमिका होती. अखेर पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे हा पूल पाडण्यात आला. त्याकरीता रेल्वेतर्फे निविदा मागवण्यात आली. मात्र या पाडकामाचा खर्च पालिकेने उचलला.
हेही वाचा >>>मोदी सरकारने सुरू केलेली ADITI योजना काय? संरक्षण तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडवणार
पुलाच्या बांधणीतील आव्हाने कोणती?
गोखले पुलाची एक बाजू फेब्रुवारी महिन्यात सुरू केली तेव्हा गोखले पूल म्हणजे इंजिनिअरिंग मार्वल असल्याचे गौरवोद्गार पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी काढले होते. पालिकेच्या अभियंत्यांना या कामाचा अनुभव नसताना या पुलाच्या कामाबाबत अनेक प्रयोग, अनेक विक्रमही करण्यात आले. रेल्वे हद्दीतील पुलाच्या तुळईचे (गर्डर) काम अन्यत्र करण्यात आले. तुळईचे भाग तयार करून ते जागेवर आणून जोडले गेले. सुमारे १,३०० टन वजनाच्या पहिल्या गर्डरची प्रकल्पस्थळी सुमारे २५ मीटर उंचीवर सुट्या भागांची जोडणी करून हा गर्डर तयार झाला. त्याला रेल्वे रूळ मार्गावर १०० मीटर अंतर पुढे नेणे, त्यानंतर उत्तरेला सुमारे साडेतेरा मीटर सरकवणे आणि नंतर सुमारे साडेसात मीटर अंतर खाली आणणे, ही अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानाची कामे पार पाडण्यात आली. गर्डरचे वजन, त्याला स्थापन करण्याचे अंतर, रेल्वे प्रशासनाशी अचूक समन्वय साधणे आणि वेळापत्रकाप्रमाणे कामे पार पाडणे ही कसरत पार पाडावी लागली.
पुलाची एक बाजू सुरू झाल्यानंतर आता वाद काय?
गोखले पुलाची एक बाजू सुरू झालेली असली तरी आता एक नवीनच समस्या उद्भवली आहे. अंधेरी पश्चिम दिशेला असलेल्या सी. डी. बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी आता नवीन बांधकामामुळे वरखाली झाली आहे, तसेच त्यात अंतर पडले आहे. ही पातळी समतल करण्यासाठी व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. तज्ज्ञांच्या अहवालानंतरच हे काम केले जाणार आहे. या दोन्ही पुलामध्ये सुमारे दोन मीटर अंतराचा फरक पडला आहे. या दोन पुलांना अशा स्थितीत उतार बांधून जोडणे शक्य नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गोखले पूलावरून सीडी बर्फीवाला पुलाचा वापर करण्यासाठी अजून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाट बघावी लागणार आहे.
हेही वाचा >>>इस्रायलच्या शेतात केरळच्या व्यक्तीची हत्या; भारतीय तिथे काय करीत आहेत?
हे काम आधीच का केले नाही?
बर्फीवाला उड्डाणपूल हा गोपाळ कृष्ण गोखले पुलाला जोडण्यासाठी स्वामी विवेकानंद मार्ग आणि जुहू येथून अंधेरी स्थानकाच्या दिशेने जाणारा मार्ग येथे दुरुस्ती किंवा अद्ययावतीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. गोखले पुलाच्या कामासोबतच जोडणीचे काम हाती घेतल्यास हे दोन्ही मार्ग बंद करावे लागतील. परिणामी स्वामी विवेकानंद मार्ग आणि बर्फीवाला मार्ग येथे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. म्हणून दुसऱ्या टप्प्यातील कामासोबतच दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
ढिसाळ नियोजनात चूक नक्की कोणाची?
रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या सर्व पुलांची उंची वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे रेल्वेवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या सर्व उड्डाणपुलांची उंची वाढवण्यात येणार आहे. जुना गोखले पूल हा सुमारे ५.७ मीटर उंचीचा होता. तर आताचा पूल हा ८.४ मीटर उंचीवर आहे. उंची २.७ मीटरने वाढल्यामुळे हे अंतर पडले आहे. आता या गोंधळाशी काही संबंध नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. तर बर्फीवाला पूल हा एमएसआरडीसी प्राधिकरणाने बांधून पालिकेकडे हस्तांतरित केला आहे. मात्र या पुलाबाबतची माहिती पालिकेकडे दिलेली नाही. तसेच हा पूल जोडण्याची जबाबदारीही घेतलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा जबाबदार कोण हा वाद सुरू झाला आहे.