केंद्र सरकारच्या चित्ता प्रकल्पाला अलीकडेच एक वर्ष पूर्ण झाले. दरम्यान, भारतात आणलेल्या एकूण चित्त्यांपैकी ५० टक्के चित्त्यांचे टिकून राहणे, अधिवासाची निर्मिती, कुनोत शावकांचा (बछडे) जन्म आणि स्थानिक समुदायासाठी उत्पन्नाचे स्रोत या चार मुद्द्यांवर प्रकल्पाला ५० टक्के यश मिळाल्याचा दावा केंद्राकडून केला जात आहे. मात्र, अभ्यासकांनी हे मुद्देच फेटाळून लावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकल्पाच्या यशापयशावर चर्चा सुरू झाली आहे.
चित्त्यांनी अधिवास निर्माण केला का?
कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून अनुक्रमे आठ आणि बारा चित्ते आणल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले. विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर त्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले आणि त्यानंतर काहींना मोकळ्या जंगलात सोडण्यात आले. यातील आशा, गौरव आणि शौर्य या नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांनी जंगलात तीन महिन्याहून अधिक काळ घालवला. मात्र, जुलै २०२३ पासून त्यांनाही मोकळ्या जंगलातून खुल्या पिंजऱ्यात आणण्यात आले. त्यामुळे कुनो राष्ट्रीय उद्यानात कोणत्याही चित्त्याने स्वत:चा अधिवास निर्माण केला नाही.
चित्त्यांच्या बंदिस्त मीलनाचा प्रयत्न भोवला..?
चित्ता जंगलात यशस्वीरित्या शावकांना जन्म देतो आणि चित्ता कृती आराखड्याचे देखील हेच उद्दिष्ट होते. नामिबियन मादी चित्ता सियाया उर्फ ज्वाला हिने कुनो राष्ट्रीय उद्यानात, पण बंदिस्त ठिकाणी शावकांना जन्म दिला. ती जंगलात सोडण्यास अयोग्य होती आणि त्यामुळे तिचे शावकदेखील खुल्या पिंजऱ्यातच जन्माला आले. कुनोच्या बंदिस्त प्रजननाचा प्रयत्न करण्यात आला.
हेही वाचा… विश्लेषण: दीपावलीत जळगाव सुवर्णनगरीला झळाळी का? सोन्याची उलाढाल किती होते?
मादी चित्ता दूरच्या नर चित्त्याला शोधण्याबाबत खूप चोखंदळ असते. मात्र, मादी मीलनासाठी तयार नसताना त्याठिकाणी नर चित्त्यांना प्रवेश देण्यात आला. परिणामी हा प्रयोग अयशस्वी ठरला आणि पिंडा ऊर्फ दक्षा हिचा नर चित्त्यांच्या आक्रमकतेमुळे मृत्यू झाला.
चित्त्यांच्या मृत्यूचे गांभीर्य किती?
नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या अनुक्रमे आठ आणि बारा चित्त्यांपैकी ५० टक्के चित्त्यांचे अस्तित्त्व कायम असल्याचा दावा केंद्राकडून करण्यात येत आहे. मात्र, त्याच वेळी चित्त्यांच्या मृत्यूची कारणे दुर्लक्षित करून चालणारी नाहीत. साशाचा मृत्यू किडनीच्या आजाराने झाला असला तरीही ती आधीपासूनच आजारी असल्याने तज्ज्ञांनी तिला भारतात आणण्यास नकारच दर्शवला होता, पण केंद्राने ते ऐकले नाही. ज्वाला आणि नभा या कधीच मोकळ्या जंगलात न सोडता प्रजननासाठी ठेवण्यात आल्या. मात्र, मीलनादरम्यान एकीला नर चित्त्याच्या आक्रमकतेचा शिकार व्हावे लागले. दोन चित्त्यांच्या मृत्यूसाठी त्यांना लावण्यात आलेली रेडिओ कॉलर कारणीभूत ठरली. तर तीन शावकांचा मृत्यू तीव्र निर्जलीकरणामुळे झाला.
भक्ष्याची कमतरता असतानाही चित्ते स्थलांतरित करण्याची घाई का?
भारतातील वाघांचे भक्ष्य चितळ आहे, पण हे चितळ चित्त्यांची भूक भागवू शकत नाहीत. त्यांना चिंकारासारख्या मोठ्या प्राण्यांची सवय आहे. ज्या कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांना स्थलांतरित करण्यात आले, त्या उद्यानात प्रतिचौरस किलोमीटर २० चितळ आहेत. म्हणजेच चित्त्यांच्या शिकारीसाठी पुरेसे भक्ष्य नाही. त्यामुळे शिकारीच्या शोधातील चिते बाहेर जाण्याची शक्यता असते. कुनोतील चित्त्यांनीही उद्यानाची सीमा अनेकदा ओलांडली. कुनो राष्ट्रीय उद्यानाची क्षमता १० ते १२ चित्ते राहू शकतील इतकीच असून जास्तीत जास्त येथे १५ चित्ते तेथे राहू शकतात.
प्रशिक्षणानंतरही पुन्हा प्रशिक्षणाची गरज का?
चित्ता प्रकल्पाला हिरवा कंदिल मिळाल्यानंतर कुनो राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी नामिबियात पाठवण्यात आले होते. यात त्यांना चित्त्यांना पकडण्याच्या पद्धती, चित्त्यांसाठी सापळे लावणे, चित्त्याचा संपूर्ण गट पकडणे, चित्ता पकडल्यानंतर त्यांना हाताळणे, मानवी सुरक्षा, ट्रँक्विलायझिंग बंदुकीच्या माध्यमातून त्यांना बेशुद्ध करणे, बेशुद्धीकरणाची प्रक्रिया, त्या बंदुकीत बेशुद्धीकरणासाठी टाकण्यात येणारे औषध, त्याचे प्रमाण, बेशुद्धीकरणानंतर त्यांचे व्यवस्थापन आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, चित्त्यांच्या एकापाठोपाठ एक मृत्यूनंतर पुन्हा त्यांना प्रशिक्षणासाठी नामिबियात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
तज्ज्ञांच्या सूचना का ऐकल्या नाहीत?
चित्ता प्रकल्पाच्या सुरुवातीला या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून भारतीय वन्यजीव संस्थेतील माजी तज्ज्ञ शास्त्रज्ञ डॉ. यजुवेंद्र देव झाला यांची निवड करण्यात आली. प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी ही धुरा हाती घेतली आणि यातील त्रुटी समोर आणल्या. मात्र, केंद्र तसेच मध्य प्रदेश सरकारला ते पटले नाही आणि या शास्त्रज्ञाला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. आज त्यांच्या सूचना ऐकल्या असत्या तर कदाचित हा प्रकल्प १०० नाही पण ९० टक्के यशस्वी ठरला असता अशी चर्चा आहे.
rakhi.chavhan@expressindia.com