पाकिस्तानमध्ये उद्या (ता. ८ फेब्रुवारी) निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. कारण याच निवडणुकीनंतर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान कोण असणार हे ठरवले जाईल. आर्थिक संकट, अतिरेकी संघटनांकडून मिळालेल्या धमक्या आणि इम्रान खान यांच्यावरील कारवाईदरम्यान ही निवडणूक पार पडेल. महत्त्वाचे म्हणजे इम्रान खान यांच्यावरील कारवाईनंतर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे बिलावल भुट्टो-झरदारी यांच्यातच खरी लढत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाकिस्तानमधील निवडणुकीची पद्धत नेमकी कशी आहे? त्यासाठी पाकिस्तान निवडणूक आयोगाने कशी तयारी केली आहे? आणि पाकिस्तानमध्ये होणारी निवडणूक भारतातील निवडणुकीपेक्षा वेगळी कशी? याविषयी जाणून घेऊया.
हेही वाचा – व्हिडीओ कॉल, पोलीस असल्याची बतावणी; ऑनलाइन फसवणुकीसाठी नवी पद्धत; काय काळजी घ्याल? वाचा….
पाकिस्तान हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जगातील पाचवा देश आहे. पाकिस्तानची एकूण लोकसंख्या २४१ दशलक्ष आहे. यातील साधारण १२८ दशलक्ष हे नोंदणीकृत मतदार आहेत. यामध्ये ६९ दशलक्ष पुरुष मतदार, तर ५९ दशलक्ष महिला मतदार आहेत. मतदारांचे प्रमाण लक्षणीय असले तरी येथे प्रत्यक्ष मतदानाचे प्रमाण कमी आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१८ साली झालेल्या निवडणुकीत पाकिस्तानमध्ये ५२ टक्के मतदान झाले होते, तर १९७१ साली येथे सर्वाधिक ६१ टक्के मतदान झाले होते.
८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली असून सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल. हे मतदान दुपारी ५ पर्यंत चालेल. एकीकडे पाकिस्तानमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना ही निवडणूक शांतपणे पार पडावी, यासाठी मोठ्या प्रमाणात सैन्यदेखील तैनात करण्यात आले आहे. तसेच या निवडणुकीचे वृत्तांकन करण्यासाठी विदेशातील पत्रकारही पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान, ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री प्रचारांच्या तोफा थंडावल्या असून उमेदवारांना आता मतदारांची केवळ वैयक्तिक भेट घेता येईल. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात २६० मतपत्रिकादेखील वितरित करण्यात आल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील निवडणुकीत फरक काय?
यंदाचं वर्ष भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांसाठी निवडणुकीचं वर्ष असणार आहे. पाकिस्तानमध्ये या महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक होईल, तर भारतात एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील निवडणूक पद्धतीत मोठा फरक आहे.
हेही वाचा – नवाज शरीफ यांना लष्कराची पसंती? इम्रान खान यांना का डावललं जातंय? पाकिस्तानच्या निवडणुकीत काय घडतेय? वाचा….
दोन्ही देशांतील निवडणुकांमधील पहिला मुख्य फरक म्हणजे, भारतात संसद आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या घेतल्या जातात, तर पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील निवडणुका म्हणजे संसद आणि प्रांतांमधील विधानसभेच्या निवडणुका या एकाचवेळी घेतल्या जातात. यावेळी पांढऱ्या रंगाची मतपेटी ही संसदेच्या उमेदवारांसाठी, तर हिरव्या रंगाची मतपेटी ही विधानसभेच्या उमेदवारांसाठी असते. याचाच अर्थ पाकिस्तानमध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच वेळी निवडले जातात.
भारत आणि पाकिस्तानच्या निवडणुकांमधील दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे, मतदान यंत्रांचा वापर. भारतात ९० च्या दशकात ईव्हीएम प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात झाली, तर पाकिस्तानध्ये मतदानासाठी अजूनही मतपत्रिकांचा वापर केला जातो. खरं तर इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांनी निवडणुकीत ईव्हीएम प्रणालीचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, विरोधकांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.
याशिवाय भारत आणि पाकिस्तानच्या निवडणुकांमधील तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे, निकाल जाहीर होण्याची वेळ. भारतात मतदान झाल्यानंतर मतपेटीला सील लाऊन या मतपेट्या जिल्हा मुख्यालयात पाठवल्या जातात. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी मतमोजणी होते; तर पाकिस्तानमध्ये मतदानाच्या दिवशीच निकाल जाहीर केला जातो. मतदान संपल्याच्या एका तासानंतरच मतमोजणीला सुरुवात केली जाते.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानुसार यंदा पाकिस्तानमध्ये २६६ जागांसाठी निवडणूक पार पडेल. यापैकी ७० जागा या महिला आणि गैरमुस्लिमांसाठी राखीव असतील. शिवाय या निवडणुकीत एकूण ५१२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हणजेच प्रत्येक मतदारसंघात सरासरी १९ उमेदवार उभे आहेत. यातील ४८०६ म्हणजेच साधारण ९४ टक्के उमेदवार हे पुरुष आहेत, तर फक्त ३१२ उमेदवार या महिला आहेत. या निवडणुकीत दोन त्रितीयपंथीदेखील उभे राहिले आहेत.
हेही वाचा – विश्लेषण : संविधानात ‘समान नागरी कायद्या’चा समावेश कसा झाला? त्याबाबत डॉ. आंबेडकरांची भूमिका काय होती?
या निवडणुकीत उभे राहिलेले एकूण ५१२१ उमेदवार हे १६७ पक्षांपैकी कोणत्या तरी पक्षांचे सदस्य आहेत किंवा ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण ९० हजार ५८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. यातील १७ हजार ५०० मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आहेत, तर ३२ हजार ५०८ मतदान केंद्र हे संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले आहे. उर्वरित ४२ हजार ५०० मतदान केंद्र हे सामान्य श्रेणीतील असल्याचे पाकिस्तान निवडणूक आयोगाने सांगितलेले आहे.