लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र असलेले जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणजे डिस्नीलँड. मिकी माऊस, मिनी माऊस, डोनाल्ड डक, गुफी यासह लहानग्यांच्या अन्य आवडत्या कार्टून पात्रांना भेटण्याची, त्यांच्याबरोबर खेळण्याची, विविध राइड्सचा थरार अनुभवण्याची संधी या डिस्नीलँडमध्ये मिळते. मात्र त्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया, फ्लोरिडातील वॉल्ट डिस्नी वर्ल्ड, डिस्नीलँड पॅरिस, जपानमधील टोकियो डिस्नी रिसॉर्ट आणि चीनमधील हाँगकाँग डिस्नीलँड या थीमपार्कमध्ये जावे लागते. पण यापुढे नवी मुंबईतही डिस्नीलँडचा आनंद लुटता येणार आहे. तो कसा, याचा हा आढावा…

डिस्नीलँड आता नवी मुंबईतही…

लहानांपासून थोरांपर्यंतच्या मनोरंजनासाठी थीम पार्कची संकल्पना अमेरिकेत पुढे आली. त्या संकल्पनेतून अमेरिकेतील कॅलिफोर्नियात भव्यदिव्य असे थीम पार्क साकारण्याचा निर्णय १९५० मध्ये घेण्यात आला आणि १९५५ मध्ये डिस्नीलँड थीम पार्कचे लोकार्पण झाले. डिस्नीलँडमध्ये विविध प्रकारच्या राइड्स, मनोरंजनाच्या सुविधा, खानपान सेवा, लहान मुलांची आवडती कार्टून पात्रे असे सर्व काही आहे. आपल्या आवडत्या कार्टून पात्राला भेटता येत असल्याने, त्यांच्याबरोबर छायाचित्र काढता येत असल्याने, त्यांच्याबरोबर खेळता येत असल्याने लहानग्यांना डिस्नीलँडचे विशेष आकर्षण आहे. अशा अमेरिकेतील पहिल्या थीम पार्कचा पुढे वेळोवेळी विस्तार करण्यात आला. या थीम पार्कमध्ये अपघातांच्या घटनाही घडल्या. मात्र तरीही डिस्नीलँडचे आकर्षण काही कमी झालेले नाही. उलट अमेरिकेतील डिस्नीलँडच्या धर्तीवर पुढे जपान, चीन, पॅरिसमध्ये डिस्नीलँड थीम पार्क साकारण्यात आले असून तेथेही मोठ्या संख्येने जगभरातील पर्यटक आकर्षित होताना दिसतात. भारतातील पर्यटकांचे, लहानग्यांचेही आकर्षणाचे केंद्र परदेशातील हे डिस्नीलँड आहे. पण सर्वांनाच परदेशात जाऊन या डिस्नीलँडचा आनंद लुटणे आर्थिक आणि इतर कारणाने शक्य नाही. आता मात्र मुंबईकरांना अमेरिका, जपान, चीन वा इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही. कारण आता लवकरच नवी मुंबईतच डिस्नीलँडचा आनंद लुटता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत नवी मुंबईत डिस्नीलँडच्या धर्तीवर भव्य असे थीम पार्क उभे राहणार आहे.

एमएमआर ग्रोथ हब प्रकल्प…

देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डाॅलरपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. देशाच्या आर्थिक विकास वाढीचे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्राने देशातील चार महानगरांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या चार महानगरांमध्ये मुंबई महानगर प्रदेशाचा अर्थात एमएमआरचा समावेश आहे. त्यानुसार या ग्रोथ हबसाठी आर्थिक आराखडा तयार करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) सोपवण्यात आली आहे. त्या ग्रोथ हबमध्ये आर्थिक विकास वाढीच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रासह अनेक क्षेत्रांना चालना दिली जाणार आहे. त्यानुसार विविध क्षेत्रांतील ३० हून अधिक प्रकल्प राबवून एमएमआरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे. त्यासाठीचा आर्थिक आराखडा नुकताच एमएमआरडीएने अंतिम केला आहे. त्यातील शिफारशींची अंमलबजावणी आता संबंधित सरकारी यंत्रणांकडून केली जाणार आहे. त्यानुसार या आर्थिक विकास आराखड्यात मनोरंजन आणि पर्यटन क्षेत्रालाही प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातूनच नवी मुंबईत डिस्नीलँडच्या धर्तीवर भव्यदिव्य असे थीम पार्क उभारण्याची शिफारस एमएमआरडीएने आपल्या आर्थिक आराखड्यात केली आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र?

एमएमआर ग्रोथ हबमध्ये पर्यटन क्षेत्र विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. २०३० पर्यंत एमएमआरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी अनेक प्रकल्प एमएमआरडीएने आपल्या आर्थिक आराखड्यात प्रस्तावित केले आहे. एमएमआरला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यालगतच्या परिसराचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याचा निर्णय आराखड्याद्वारे घेण्यात आला आहे. त्यानुसार अलिबाग आणि मढ-गोराई बेटाच्या विकासाचा सविस्तर आराखडा तयार करण्याची शिफारस एमएमआरडीएच्या आराखड्यात आहे. त्याचबरोबर गोरेगाव चित्रनगर, किल्ले आणि इतर पर्यटन केंद्रांचाही आंतरराष्ट्रीय स्तरावर येत्या काळात विकास केला जाणार आहे. सध्या पर्यटन क्षेत्राद्वारे एमएमआरला १५०० कोटी डाॅलर्सचा महसूल मिळतो. तो २०३० पर्यंत थेट दोन कोटी डाॅलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट ग्रोथ हबअंतर्गत ठेवण्यात आले आहे. सध्या एमएमआरला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या ५० लाखांवरून थेट दोन कोटींवर नेण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अनेक प्रकल्प पर्यटन क्षेत्राअंतर्गत राबविण्यात येणार आहेत. त्यातील एक प्रकल्प म्हणजे नवी मुंबई थीम पार्क.

दोनशे हेक्टर जागेवर डिस्नीलँड?

एमएमआरडीएच्या आराखड्यानुसार नवी मुंबईच्या दक्षिणेला २०० हेक्टर जागेवर डिस्नीलँडच्या धर्तीवर थीम पार्क प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात रिसॉर्ट, अॅनिमेशन स्टुडिओ, राइड्स झोन, वॉटर पार्क अशा अनेक बाबींचा समावेश असेल. लहान मुलांपासून सर्व वर्गातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या मनोरंजन सुविधा तेथे विकसित केल्या जाणार आहेत. एमएमआरडीएच्या आराखड्यात थीम पार्क प्रस्तावित करण्यात आले असले तरी ते कोण विकसित करणार, कसे आणि केव्हा विकसित केले जाणार याची सविस्तर माहिती नमूद नाही. असे असले तरी आता एमएमआरडीएच्या आराखड्याची अंमलबजावणी संबंधित सरकारी यंत्रणांकडून केली जाणार आहे. त्यानुसार नवी मुंबईत हे थीम पार्क प्रकल्प असल्याने सिडकोकडून ते साकारले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, एमएमआरडीएच्या आराखड्यानुसार जमीन वाटपाचा नियोजन आराखडा तयार करून जमीन वाटप २०२५-२०२६ पर्यंत पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिस्नीलँडच्या धर्तीवरील थीम पार्क कोण आणि कसे साकारणार तसेच थीम पार्क केव्हा पर्यटकांसाठी खुले होणार हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल.

Story img Loader