अंटार्क्टिकामधल्या हिमनद्या वितळतायत ही अत्यंत काळजी वाढवणारी घटना असून पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा बातम्या वरचेवर वाचायला मिळत आहेत. हिमनद्या वितळण्याचे गंभीर असे अनेक परिणाम सांगता येतील. पण एक विशिष्ट हिमनदी अशी आहे जिचं वितळणं जगाच्या अंतास कारणीभूत ठरू शकते. एका नव्या अभ्यासानुसार अंटार्क्टिकामधली थ्वाइट्स हिमनदीच्या (Thwaites Glacier) पृष्ठभागावरून ज्या गतीनं बर्फ वितळतंय त्या गतीनं शास्त्रज्ञांना चिंतेत टाकले आहे. येत्या काही वर्षांत या हिमनदीतील बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड वाढू शकतो अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
थ्वाइट्स हिमनदीच्या वितळण्यामुळे होणाऱ्या संभाव्य हाहाकारामुळे या हिमनदीला ‘डूम्सडे ग्लेशियर’ किंवा ‘जगाचा अंत घडवू शकणारी हिमनदी’ असे संबोधले जाते. नव्या अभ्यासानुसार थ्वाइट्स हिमनदी कशीबशी तग धरून आहे आणि कधीही ती वाताहत घडवू शकते. काय आहेत याची नेमकी कारणं, जाणून घेऊयात…
थ्वाइट्स हिमनदीला ‘डूम्सडे ग्लेशियर’ का म्हणतात?
आकाराने प्रचंड मोठी असलेली थ्वाइट्स हिमनदी नेहमीच सगळ्यांच्या अभ्यासाचा विषय राहिली आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा हे राज्य जेवढं मोठं आहे किंवा अर्ध्या महाराष्ट्राइतका या नदीचा आकार आहे. गेल्या काही वर्षांपासून या हिमनदीवरील बर्फ चिंता वाटावी इतक्या वेगाने वितळत आहे, ज्यामुळे पर्यावरणातले घातक बदल आणखी वेगाने होतील अशी भीती आहे. गेली काही वर्षे थ्वाइट्स हिमनदी वितळल्यामुळे प्रतिवर्ष ५० अब्ज टनाच्या बर्फाचे पाणी महासागरांमध्ये लोटले जात आहे. हा वेग वाढत असून जागतिक समुद्राची पातळी आणखी वाढेल आणि समुद्र किनाऱ्यालगतची अनेक शहरे पाण्याखाली जायची भीती आहे.
विश्लेषण : मुंबईप्रमाणे बंगळुरूमध्येही पाणी तुंबण्याचा प्रश्न का उद्भवला? वाचा नेमकी कारणं काय?
पर्यावरणीय बदलांमुळे आत्ताच जागतिक समुद्राची पातळी वाढत असून या वाढीमध्ये ‘डूम्सडे ग्लेशियर’चा एकटीचा हिस्सा ४ टक्क्यांचा असल्याचे ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेने नमूद केले आहे. ‘कड्याच्या टोकावर गिर्यारोहक नखांच्या आधारे लटकत असेल तर कशी परिस्थिती असेल’ ही उपमा देत शास्त्रज्ञांनी थ्वाइट्स ग्लेशियर या स्थितीत असल्याचे म्हटले आहे.
नक्की काय नी कधी होण्याची भीती?
सीएनएनच्या वृत्तानुसार थ्वाइट्स ग्लेशियरच्या केवळ मुखपुष्ठावरील बर्फ वितळत नसून त्याखालील मूळापासून बर्फ वितळण्याची प्रक्रिया सुरू आहे. जवळपास स्पेनच्या आकाराचा या हिमनदीचा एक भाग तळापासून ते वरपर्यंत वितळतोय आणि वितळण्याचा वेग काही वर्षांपूर्वी अंदाज केला होता त्यापेक्षा कमालीचा जास्त आहे. भूभौतिक शास्त्रज्ञ रॉबर्ट लार्टर यांनी सीएनएनच्या मुलाखतीत सांगितले की, नजीकच्या भविष्यात म्हणजे सुमारे वर्षभरानंतर कधीही अत्यंत कमी कालावधीत प्रचंड मोठे पर्यावरणीय बदल घडण्याची शक्यता आहे.
सध्या प्रचंड मोठा पर्वतमय असा हा बर्फाचा तुकडा आपल्या जागेवरच आहे. पण सर्वांगीण वितळण्यामुळे हा तुकडा मूळ नदीपात्रापासून तुटून वेगळा निघून महासागराला मिळाला तर मात्र जागतिक समुद्र पातळी आकस्मिकपणे कमालीच्या वेगाने वाढेल. सध्याचा या हिमनदीचा वितळण्याचा वेग बघितला तर ही वेळ एका वर्षानंतर कधीही येऊ शकते आणि मुंबईसारखी भारतातलीच नाही तर जगभरातली हजारो सुमद्रकाठची शहरे, गावे जलमय होऊ शकतात. या संहारक उपद्रवमूल्यामुळेच थ्वाइट्स ग्लेशियरला डूम्सडे ग्लेशियर किंवा ‘जगाचा अंत घडवू शकणारी हिमनदी’ असे म्हणतात.