टीव्ही असो, चित्रपट असो, मालिका असो किंवा सध्या प्रचंड गाजणाऱ्या वेगवेगळ्या वेबसिरिज असोत. या सगळ्या माध्यमांमध्ये काळानुरूप होत गेलेला बदल आणि याबरोबरच प्रेक्षकात, समाजात तसेच प्रेक्षकाच्या मानसिकतेत होणारे बदल आपण सगळ्यांनीच याची देही याची डोळा पाहिले आहेत. याच लक्षणीय बदलांविषयी सुप्रसिद्ध निर्माते आणि प्रामुख्याने एकेकाळी काही टेलिव्हिजन वाहिन्यांची धुरा सांभाळणारे नितीन वैद्य यांनी खुलासा केला आहे. नुकतंच त्यांनी थिंक बँक या युट्यूब चॅनलला दिलेल्या या मुलाखतीत याविषयी विस्तृतपणे चर्चा केली आहे. मराठी मालिकांचा दर्जा, बदलणारा प्रेक्षक, चित्रपटक्षेत्रातले बदल, ओटीटीचा सुळसुळाट याबरोबच मनोरंजनविश्वाचं अर्थकारण याबद्दल नितीन वैद्य यांनी चर्चा केली आहे. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.
या संपूर्ण मुलाखतीमध्ये नितीन वैद्य यांनी एक गोष्ट अधोरेखित केली ती म्हणजे “Change is the only constant thing”. माध्यमं कोणतीही असोत, जर तंत्रज्ञानाच्या साथीने त्यांनी बदल स्वीकारले नाहीत तर त्या सगळ्या माध्यमांचा ‘नोकिया’ होईल अशी शक्यता नितीनजी यांनी वर्तवली आहे. यामध्ये समाज माध्यमं, इलेक्ट्रॉनिक माध्यमं, वृत्तपत्र आणि त्याच्या डिजिटल आवृत्त्या, यांच्यापासून थेट ओटीटी आणि सिनेक्षेत्रदेखील आलं असं त्यांचं म्हणणं आहे.
टेलिव्हिजनवर येणाऱ्या मालिकांनी नेमकं काय द्यायला हवं?
टेलिव्हिजन आणि त्यावरील मालिका याविषयी नितीनजी यांनी सखोल माहिती दिली. एकंदरच दूरदर्शनपासून जवळजवळ २०१२ पर्यंतचा काळ हा त्यांनी फार जवळून अनुभवला असल्याने त्यांनी याबाबतीत परखड मत मांडलं आहे. त्यांच्यामते दूरदर्शन जेव्हा सुरू झालं तेव्हा ते फक्त एका ठराविक उच्च मध्यमवर्गीय समूहालाच समोर ठेऊन सुरू केलं होतं, किंबहुना त्यात काम करणारी मंडळीदेखील त्याच समूहातून आली होती. जेव्हा १९९० नंतर सॅटेलाईट चॅनल्स आली तेव्हा टेलिव्हिजनकडे सगळ्याच स्तरातील प्रेक्षकवर्ग आकर्षित झाला आणि मग त्याप्रमाणेच टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या कार्यक्रमात बदल होत गेले.
आणखी वाचा : कॅनडाच्या आणखी एका रस्त्याला ए.आर.रहमानचं नाव : खुद्द रहमानने ट्वीट करत दिली खुशखबर
याचं उदाहरण देताना नितीनजी यांनी सांगितलं की, ते झी या वाहिनीमध्ये काम करत असताना त्यांच्या टीमने २ प्रयोग प्रामुख्याने सुरू केले. त्यापैकी एक प्रयोग होता ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम. जो आजही सुरू आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून टेलिव्हिजनशी प्रत्येक स्तरातील व्यक्ती जोडली गेली. याचदरम्यान त्यांनी ‘नक्षत्रांचे देणे’ हा एक आगळा वेगळा कार्यक्रमदेखील सुरू केला होता ज्यात महाराष्ट्रातल्या २१ गीतकार आणि संगीतकारांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकण्यात आला होता. तो कार्यक्रम एका जाणकार सुशिक्षित वर्गाने उचलून धरला पण त्या कार्यक्रमाने वाहिनीला आर्थिक हातभार भार लागला नाही. त्यामुळे सध्याच्या भाषेत बोलायचं झालं तर टेलिव्हिजनवरील मालिकांनी ‘मास’ आणि ‘क्लास’ यांचा योग्य समतोल साधणं अत्यंत गरजेचं आहे.
ओटीटी आणि टेलिव्हिजन यांचं भवितव्य काय असेल?
याच मुलाखतीमध्ये नितीनजी म्हणाले की, ओटीटी हे नक्कीच भवितव्य आहे. परंतु टेलिव्हिजन आणि ओटीटी यात साधर्म्य दिसणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्यापद्धतीने टेलिव्हिजनकडे कुटूंबाने एकत्र बसून बघायचं माध्यम म्हणून बघितलं जायचं तसं ओटीटीकडे सध्यातरी बघता येणं शक्य नाही. कारण ओटीटीवर सेन्सॉरशीप त्यामानाने कमी असल्याने ओटीटीचा सरसकट सगळाच कंटेंट कुटुंबासमवेत बसून बघण्यासारखा नाही. त्यातही आता हळूहळू बदल होत आहेत. परंतु भारतातील कित्येक सर्वसामान्य लोकांसाठी आजही ओटीटी ही एक चैनीची गोष्ट आहे. त्यामुळे या मोठमोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सना याच सामान्य वर्गाला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर त्यांना टेलिव्हिजनवरील मालिका आणि ओटीटी विश्वातल्या गोष्टी यांचा योग्य मेळ साधून मगच तो कंटेंट लोकांना पुरवावा लागेल. असं नितीनजी यांनी स्पष्ट केलं आहे. आज २ कोटी लोकं ओटीटीसाठी पैसे खर्च करत आहेत, पण उर्वरित मध्यमवर्गीय लोकांनीसुद्धा त्यावर पैसे खर्च करावेत असं या ओटीटी कंपन्यांना वाटत असेल तर हा मूलभूत बदल करणं गरजेचं आहे आणि हळूहळू ते बदल होताना दिसत सुद्धा आहेत असंही ते पुढे म्हणाले.
प्रेक्षकाची खासगी आवड जपणं किती महत्वाचं?
टेलिव्हिजन होते तेव्हा घरातील सगळे सदस्य एकत्र बसून कार्यक्रम बघायचे. २०१० नंतर जी डिजिटल क्रांती भारतात आली त्यामुळे प्रत्येक प्रेक्षक वेगळा झाला स्वतंत्र झाला आणि त्यामुळे त्याच्या आवडी निवडीदेखील बदलत गेल्या असं नितीनजी यांनी स्पष्ट केलं आहे. या क्रांतिमुळे मोबाईल, स्मार्टफोन, इंटरनेट स्वस्त झालं आणि यामुळेच एकाच घरात एकाच टेलिव्हिजनवर एक कार्यक्रम बघणारी ४ माणसं आता ४ वेगवेगळ्या ठिकाणी बसून आपआपले आवडते कार्यक्रम पाहू लागली. या प्रत्येक प्रेक्षकाच्या बदलत्या आवडीकडे सध्या सगळ्याच माध्यमांनी बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं नितीनजी म्हणतात.
वृत्तपत्रांच्या डिजिटल आवृत्यांनी नेमके काय बदल करायला हवेत?
नितीनजी हे निर्मितीक्षेत्रात येण्याआधी पत्रकार होते. त्यामुळे या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल आवृत्यांविषयीसुद्धा खुलासा केला आहे. त्यांच्यामते सध्याच्या मराठी वृत्तपत्रांच्या डिजिटल आवृत्त्या या सामान्य लोकांनाही वाचवत नाहीत, त्यातल्या बातम्या आकर्षक नसतात, भाषेची अत्यंत सरमिसळ आपल्याला त्यात बघायला मिळते. त्यामुळे या मोठमोठ्या वृत्तपत्रांच्या संपादकांनी त्यांच्या या डिजिटल आवृत्यांकडे बारकाईने लक्ष घालून त्यात नेमके काय बदल करायला हवेत हे शोधून काढायला हवं. असं नितीनजी म्हणतात.
या सगळ्या बदलांचा ‘सिनेमा’वर कसा परिणाम होईल?
निर्मिती क्षेत्रात सक्रिय असल्याने नितीनजी म्हणतात की या सगळ्याचा चित्रपटांवर फारसा फरक पडणार नाही. करण चित्रपट हा सगळ्यांनी एकत्र जमून बघायची गोष्ट आहे. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट झाला तरी ‘बाहुबली’ किंवा ‘RRR’सारखे चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहताना अनुभव वेगळाच असणार आहे. याउलट चित्रपट या माध्यमाचा एक सॉफ्ट पॉवरसारखा वापर आपण करायला हवा असंही नितीनजी या मुलाखतीमध्ये म्हणाले.
आणखी वाचा : “मला महिलेच्या वेशात पाहून माझी मुलगी…” नवाजुद्दीनने सांगितली मुलीची प्रतिक्रिया
अमेरिकेत आज ५०००० स्क्रीन्स उपलब्ध आहेत, चीनमध्ये तर तब्बल ६०००० स्क्रीन्सवर चित्रपट झळकतो. त्यामानाने भारतात अजूनही स्क्रीन्सचा तुटवडा आहे. आपल्याकडे जेमतेम ८००० स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित होतो त्यापैकी ४००० स्क्रीन्स या दक्षिण भारतात आहेत. त्यामुळे चित्रपटक्षेत्रात या पायाभूत सुविधा आणखीन वाढवून त्या उत्तमरित्या कार्यरत करण्यासाठी सरकारने तसेच मनोरंजन विश्वातल्या मोठ्या लोकांनी पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले.
कोविडमुळे चित्रपट बदलला का?
याबद्दल नितीनजी म्हणतात की, कोविडमुळे चित्रपट बदलला खरा, अर्थात यात ओटीटीचादेखील तितकाच सहभाग आहे. या काळात ओटीटीमुळे दाक्षिणात्य चित्रपट घराघरात पोहोचला. परंतु सगळ्याच दक्षिणात्य चित्रपटांनी कमाल केली आहे असं नाही. आपल्या प्रेक्षकांपर्यंत तेच चित्रपट आले आहेत जे तिथे गाजले आहेत. त्यांच्याही चित्रपटसृष्टीत बरेच चित्रपट अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सरसकटपणे चित्रपटच बदलला आहे हे म्हणणं तेवढं योग्य नाही. पुढे ते म्हणतात की, गेली काही वर्षं जो एक ठराविक वर्ग मॉल्स आणि मल्टीप्लेक्समध्ये जायचा त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या बागेपेक्षा लोकं मॉलमध्ये फिरायला जाणं पसंत करत आहेत. त्यामुळे उलट चित्रपटगृहांकडे आकर्षित होणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत वाढ नक्कीच होत आहे. पण ती कोणत्याही मोठ्या स्टारसाठी नव्हे तर चित्रपटातल्या कथेसाठी, मांडणीसाठी. आज ‘फॅन्ड्री’पासून ‘जय भीम’सारख्या चित्रपटाला लोकं जो प्रतिसाद देत आहेत ती या चित्रपटाच्या बदलाची नांदीच आहे असंही नितीनजी म्हणतात.
महाराष्ट्रातले चित्रपट, मालिका, वाहिन्या, वृत्तवाहिन्या याबद्दल काय वाटतं?
याविषयी बोलताना नितीनजी म्हणाले की सध्या मराठी वाहिन्या या पुन्हा एकदा रेटींग्जच्या मायाजालात अडकल्या आहेत. यातून बाहेर पडून आपल्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडीविषयी जाणून घेऊन त्यांनी पुढील आखणी करायला हवी असं मत नितीन वैद्य यांनी यात मांडलं आहे. सध्या तसे बदल होत आहेत असंही त्यांनी यात स्पष्ट केलं. पण डिजिटल क्रांतीमध्ये महाराष्ट्र हा नेहमीच पहिल्या नंबरवर होता आणि पुढे येणाऱ्या काळातही महाराष्ट्र त्याचं स्थान अबाधित राखेल अशी आशा नितीन वैद्य यांनी या मुलाखतीच्या दरम्यान व्यक्त केली आहे.