भारताचा महत्त्वाकांक्षी जिनोमइंडिया प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची प्रशंसा केली. भारताच्या संशोधन क्षेत्रासाठी या प्रकल्पाचे काय महत्त्व आहे ते पाहणे आवश्यक आहे. हा प्रकल्प काय आहे? : जिनोमइंडिया प्रकल्पात १० हजार व्यक्तींचे संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण केले. जिनोम सिक्वेन्सिंग ही प्रयोगशाळेतील प्रक्रिया आहे. यामध्ये एखाद्या सजीवाच्या जिनोममधील डीएनए बेसचा क्रम निर्धारित केला जातो. याचा उपयोग व्याधीशी जोडलेल्या जिनोममधील बदल ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो. जिनोमइंडिया प्रकल्प भारताच्या लोकसंख्येच्या अद्वितीय विविधतेचे प्रतिनिधित्व करणारा जनुकीय भिन्नतेचा कॅटलॉग आहे. संशोधकांना साडेतेरा कोटींपेक्षा जास्त जनुकीय फरक आढळले असून या प्रकल्पासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने निधीपुरवठा केला. जिनोमइंडिया प्रकल्प जानेवारी २०२० मध्ये सुरू करण्यात आला. आनुवंशिक तसेच संसर्गजन्य आजारांवरील उपचार अधिक प्रगत करण्यात यामुळे मदत होऊ शकते. या प्रकल्पामुळे जनुकीय विकारांवरील संशोधनात क्रांती होईल, भारतीय स्वरूपाच्या समस्यांवर भारतीय उपाय उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ९९ वांशिक गटांमधून १०,०७४ व्यक्तींचे संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण करण्यात आले. संशोधनासाठी १९ हजारांपेक्षा जास्त रक्ताचे नमुने संकलित करून ‘जिनोमइंडिया बायोबँके’मध्ये साठवण्यात आले. या प्रकल्पाची माहिती ‘इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर’कडे (आयबीडीसी) उपलब्ध आहे.
हेही वाचा >>> लॉस एंजेलिसमध्ये आग विझवण्यासाठी ‘पिंक पावडर’चा वापर कसा केला? पर्यावरणासाठी हे किती घातक?
संशोधनादरम्यान काय आढळले?
बंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या (आयआयएससी) नेतृत्वाखाली देशभरातील २० पेक्षा जास्त संस्थांमधील संशोधक आणि शास्त्रज्ञांना १३.५ कोटींपेक्षा जास्त जनुकीय फरक आढळले. या फरकांमध्ये मुख्यत: एकाच डीएनए घटकामधील लहानशा बदलांचा समावेश होता. या डीएनए घटकाला ‘न्युक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम’ किंवा ‘एसएनव्ही’ असे म्हणतात. ‘एसएनव्ही’मधील लहान बदलांबरोबरच डीएनए क्रमात बारीकशी भर पडणे किंवा वगळणे जाणे हेही या जनुकीय फरकांना कारणीभूत होते. कमी संख्येने या फरकांमध्ये एकाधिक भिन्नतांचा समावेश आहे. विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्यात संशोधकांनी ५,७५० नमुन्यांचे विश्लेषण केले. त्याद्वारे त्यांनी भारतीयांच्या जिनोमिक रचनेचे अद्वितीय पैलू उघड केले. त्यामध्ये भारतीय लोकसंख्या किंवा एखाद्या प्रदेशातील विशिष्ट गटांच्या काही दुर्मीळ भिन्नताही आढळल्या. त्यातून लोकसंख्येचा अद्वितीय इतिहास आणि विविधता दिसून आली.
हेही वाचा >>> बिनिल टी.बी कोण होता? तो रशियन सैन्यात कसा भरती झाला होता?
फायदा कोणकोणत्या क्षेत्रांना?
या प्रकल्पामध्ये एरवी दुर्मीळ असलेल्या परंतु विशिष्ट लोकसंख्येत अधिक सामान्य असलेल्या २.७० कोटी आनुवंशिक भिन्नता आढळल्या. त्यापैकी ७० लाख भिन्नता पूर्णपणे नवीन आहेत आणि जागतिक डेटाबेसमध्ये त्यांची नोंद नाही. जिनोमइंडिया प्रकल्पाद्वारे निर्माण झालेल्या डेटाबेसमुळे अचूक औषधे आणि नावीन्यपूर्ण औषधे विकसित करण्यास चालना मिळणार आहे, तसेच ‘राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन अभियाना’सारख्या सरकारी कल्याणकारी योजनांसाठीही साहाय्यभूत ठरणार आहेत. या उपक्रमाने भारतीय लोकसंख्येच्या जनुकीय बदलांची एक व्यापक सूची तयार केली आहे. थेट आर्थिक फायदा म्हणजे यामुळे जैवअर्थव्यवस्थेला आधार मिळाला. २०१४ मध्ये ही अर्थव्यवस्था १० अब्ज डॉलर होती, ती आता १५० अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे.
यापुढले काम काय?
‘आयआयएससी’चे प्रा. व्ही नरहरी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या कानाकोपऱ्यातून २० हजार जिनोम नमुने संकलित करण्यात आले आहेत. त्यासाठी ‘आयआयएसईआर’ पुणे, ‘एम्स’ जोधपूर, ‘ब्रिक-आयएलएस’ भुवनेश्वर आणि ‘एमझेडयू’, ऐझॉल यांसारख्या नऊ संस्थांची मदत घेण्यात आली होती. यापैकी १० हजार नमुन्यांचे संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंग अद्याप पूर्ण व्हायचे आहे. ते पूर्ण झाल्यावर हा डेटाबेस अधिक विस्तृत होणार आहे.
आंतरराष्ट्रीय अभ्यासापेक्षा वेगळा का?
‘सीएसआयआर- आयजीआयबी’चे शास्त्रज्ञ डॉ. मोहम्मद फारुक यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पामुळे मिळणाऱ्या लोकसंख्या-विशिष्ट जिनोमिक डेटाचा फायदा अचूक निदान, जोखमीचा अंदाज आणि ‘फार्माकोजिनोमिक्स’ यासारखे लाभ होतील. ‘फार्माकोजिनोमिक्स’ याचा अर्थ एखाद्या व्यक्तीचे डीएनए विशिष्ट औषधांना कशा प्रकारे प्रतिसाद देते याचा अभ्यास. अनेक जनुकीय रूपे (व्हेरिएंट) औषधाचा परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम यावर प्रभाव टाकतात. सध्याच्या आंतरराष्ट्रीय डेटाबेसमध्ये ही माहिती आढळत नाही. यातून औषधांच्या इष्टतम परिणामासाठी स्थानिक पातळीवरील जिनोमिक संदर्भांची गरज ठळक करण्यात आली आहे.
nima.patil @expressindia. com