भारताचा महत्त्वाकांक्षी जिनोमइंडिया प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची प्रशंसा केली. भारताच्या संशोधन क्षेत्रासाठी या प्रकल्पाचे काय महत्त्व आहे ते पाहणे आवश्यक आहे. हा प्रकल्प काय आहे? : जिनोमइंडिया प्रकल्पात १० हजार व्यक्तींचे संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण केले. जिनोम सिक्वेन्सिंग ही प्रयोगशाळेतील प्रक्रिया आहे. यामध्ये एखाद्या सजीवाच्या जिनोममधील डीएनए बेसचा क्रम निर्धारित केला जातो. याचा उपयोग व्याधीशी जोडलेल्या जिनोममधील बदल ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो. जिनोमइंडिया प्रकल्प भारताच्या लोकसंख्येच्या अद्वितीय विविधतेचे प्रतिनिधित्व करणारा जनुकीय भिन्नतेचा कॅटलॉग आहे. संशोधकांना साडेतेरा कोटींपेक्षा जास्त जनुकीय फरक आढळले असून या प्रकल्पासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने निधीपुरवठा केला. जिनोमइंडिया प्रकल्प जानेवारी २०२० मध्ये सुरू करण्यात आला. आनुवंशिक तसेच संसर्गजन्य आजारांवरील उपचार अधिक प्रगत करण्यात यामुळे मदत होऊ शकते. या प्रकल्पामुळे जनुकीय विकारांवरील संशोधनात क्रांती होईल, भारतीय स्वरूपाच्या समस्यांवर भारतीय उपाय उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ९९ वांशिक गटांमधून १०,०७४ व्यक्तींचे संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण करण्यात आले. संशोधनासाठी १९ हजारांपेक्षा जास्त रक्ताचे नमुने संकलित करून ‘जिनोमइंडिया बायोबँके’मध्ये साठवण्यात आले. या प्रकल्पाची माहिती ‘इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर’कडे (आयबीडीसी) उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा