दिवसेंदिवस भारतात घोटाळ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. घोटाळेबाज, लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन तर्क वितर्क लावत असतात. सध्या हायबॉक्स गुंतवणूक घोटाळा चर्चेत आहे, कारण या घोटाळ्याप्रकरणी कॉमेडीयन भारती सिंग आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवला दिल्ली पोलिसांनी समन्स बजावले आहे. या घोटाळ्यात भारतीयांनी एकत्रितपणे १००० कोटी रुपये गमावल्याचा अंदाज आहे. सोशल मीडिया आणि यूट्यूबवरील लोकप्रिय सेलिब्रिटींनी या ॲपचा प्रचार केल्यामुळे त्यांना तपासासाठी बोलावण्यात आले आहे. काय आहे हा घोटाळा? या घोटाळ्यात भारती यांनी १००० कोटी रुपये कसे गमावले? या घोटाळ्यात प्रसिद्ध कलाकारांची नावे कशी आली? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हायबॉक्स गुंतवणूक घोटाळ्याचा तपास इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (आयएफएसओ) युनिटद्वारे केला जात आहे. ही सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करणारी दिल्ली पोलिसांची विशेष शाखा आहे. ही शाखा या घोटाळ्यात डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपे आणि ईझबझच्या भूमिकेचादेखील शोध घेत आहे, ज्यावर कथित घोटाळेबाजांकडून ऑपरेट केलेल्या व्यापारी खात्यांची नोंद आहे. या तपासासाठी पोलिसांना प्राप्त झालेल्या शेकडो तक्रारी एकत्रित करण्यात आल्या आहेत.

हायबॉक्स मोबाइल ॲप घोटाळा काय आहे?

हायबॉक्स मोबाइल ॲपवर अत्यंत उच्च परताव्याच्या आश्वासनासह पीडितांना ॲपद्वारे पैसे गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले गेले. सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना वचन दिलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली गेली, त्यामुळे अनेक लोक आकर्षित झाले. काही काळानंतर गुंतवणूकदारांना परतावा मिळणे बंद झाले आणि हायबॉक्स मोबाइल ॲपच्या मागे असलेली टोळीही फरार झाली. पोलिस उपायुक्त (आयएफएसओ युनिट) हेमंत तिवारी यांनी कथित घोटाळ्यात कशी फसवणूक करण्यात आली, त्याविषयी माहिती दिली. “कथित घोटाळेबाजांनी पीडितांना सोशल मीडिया आणि यूट्यूबर्सच्या मदतीने आमिष दाखवले आणि त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूकदारांना प्रतिदिन एक टक्का ते पाच टक्के आणि ३० ते ९० टक्के मासिक परताव्याची हमी देण्यात आली होती. “३०,००० हून अधिक लोकांनी त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे हायबॉक्स ॲपमध्ये गुंतवले. परंतु, ॲपने गुंतवणूकदारांना परतावा देणे बंद केले आहे आणि नोएडामधील त्यांचे कार्यालय बंद केल्यानंतर कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला,” असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : दोन लाखांच्या बॅगवरून सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु चर्चेत; कोण आहेत जया किशोरी? ही बॅग गाईच्या कातड्यापासून तयार झाली आहे का?

कथित घोटाळा कधी उघडकीस आला?

१६ ऑगस्ट रोजी पोलिसांना आयएफएसओ युनिटमधील २९ व्यक्तींकडून तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांनी सांगितले की, त्यांना एक टक्के ते पाच टक्के दररोज परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. “सर्व तक्रारकर्त्यांनी एक गोष्ट नमूद केली की, त्यांनी हायबॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांना असे आढळले की, अनेक सोशल मीडिया प्रभावक आणि यूट्यूब वापरकर्त्यांनी ॲपचा प्रचार केला. त्यात सौरव जोशी, अभिषेक मल्हान ऊर्फ ​​फुकरा इन्सान, पुरव झा, एल्विश यादव, भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, लक्ष्य चौधरी, आदर्श सिंग, अमित ऊर्फ ​​क्रेझी एक्सवायझेड आणि दिलराज सिंह रावत यांचा समावेश होता,” असे पोलिस उपायुक्त तिवारी यांनी सांगितले.

तक्रारींची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवला आणि त्यानंतर असे आढळले की, उत्तर दिल्लीच्या सायबर पोलिस ठाण्यामध्ये अशीच एक तक्रार नोंदवण्यात आली होती, जिथे नऊ जणांनी अशाच प्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. “तपासादरम्यान दिल्लीतील ईशान्य भागात ३० तक्रारी, दिल्लीच्या इतर भागांतून ३५ तक्रारी आणि शाहदरा जिल्ह्यात २४ तक्रारी ‘आयएफएसओ’कडे हस्तांतरित करण्यात आल्या आणि त्या सर्व नोंदणीकृत ‘एफआयआर’मध्ये एकत्रित करण्यात आल्या. या तक्रारींव्यतिरिक्त राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीपीआर) वर समान पद्धतीच्या ४८८ तक्रारींचाही समावेश करण्यात आला,” असे त्यांनी सांगितले.

तपासात काय आढळले?

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आणि त्यात गुंतलेल्या बँक खात्यांचा तपशील गोळा केल्यानंतर असे आढळून आले की, इझबझ आणि फोनपे पैसे हस्तांतरित करण्यासाठी वापरले जात होते. “तपास करणार्‍या टीमला चार खाती ओळखता आली; ज्यांचा वापर फसवणूक केलेल्या रकमेसाठी करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर जे. शिवराम नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली. लिंक केलेल्या बँक खात्यांचा तपास केल्यावर असे आढळून आले की, या खात्यांमध्ये १८ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत”, असे तिवारी यांनी सांगितले. तिवारी यांनी सांगितले की, पीडितांनी गुंतवलेले १८ कोटी रुपये सुत्रुल्ला एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेडच्या चार खात्यांमध्ये जमा केले आहेत. ही खाती जे. शिवराम यांच्या नावाने नोंदणीकृत आहेत, जे फर्मचे संचालक आहेत. तिवारी यांनी सांगितले की, चेन्नईच्या न्यू वॉशरमनपेट येथील अवूर मुथिया स्ट्रीट येथील कार्यालयाची जागा शिवराम यांनी सुत्रुल्ला एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने भाड्याने दिली होती.

हेही वाचा : फटाक्यांचा धूर फुप्फुस आणि हृदयासाठी किती घातक? फटाक्यांमधील हानिकारक घटक कोणते?

तपासाची सद्यस्थिती काय आहे?

सध्या परदेशात असलेल्या हायबॉक्सच्या संचालकांविरोधात लुक आउट परिपत्रक जारी करण्यात आले आहे. तिवारी म्हणाले की, इझबझ आणि फोनपेच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. अनेक यूट्यूबर्स आणि सोशल मीडियावरील सेलिब्रिटींना तपासात सामील होण्यास सांगितले आहे, अशी माहितीही तिवारी यांनी दिली.