निमा पाटील
अमेरिकेमध्ये पुढील आठवड्यात १९ जूनला ‘जुनटीन्थ’ हा दिवस साजरा केला जाईल. या दिवसाचे काय महत्त्व आहे याबद्दल जगातील इतर राष्ट्रे आणि समुदायांना सोडाच, खुद्द अमेरिकेतील अनेक लोक अनभिज्ञ आहेत. अमेरिकेच्याच नव्हे तर आधुनिक जगाच्या इतिहासात हा दिवस महत्त्वाचा आहे. सरकारी पातळीवर दोन वर्षांपासून या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी टेक्सास, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, व्हर्जिनिया अशा राज्यांमध्ये आधीपासून जुनटीन्थ साजरा करण्यात येतो. काही लोक या दिवसाचा काळा इतिहास लक्षात ठेवून हा दिवस साजरा न करता पाळला जावा असेही आवाहन करतात. आता या जुनटीन्थनिमित्त अमेरिकी नागरिकांना वर्णभेदाच्या समस्येबद्दल अधिक माहिती दिली जावी, त्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जुनटीन्थ हा राष्ट्रीय सुटीचा दिवस आहे का?
जुनटीन्थ हा अमेरिकेत राष्ट्रीय सुटीचा दिवस आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे १६ जून २०२१ या दिवशी अमेरिकेच्या कायदेमंडळाने म्हणजेच काँग्रेसने, दरवर्षी १९ जून या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यासंबंधी विधेयक मंजूर केले. त्यापाठोपाठ अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यावर सही केली. त्यापूर्वी टेक्सास या राज्यामध्ये १९८० पासून १९ जूनला जुनटीन्थ सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ टेक्सास, न्यूयॉर्क, व्हर्जिनिया आणि वॉशिंग्टन अशा इतरही काही राज्यांमध्ये या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली. १९८३ मध्ये मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या जन्मदिनी म्हणजे १५ जूनला राष्ट्रीय सुटी घोषित करण्यात आली. त्यानंतर थेट ३८ वर्षांनी जुनटीन्थच्या दिवशी राष्ट्रीय सुटी घोषित करण्यात आली.
जुनटीन्थनिमित्त राष्ट्रीय सुटी का जाहीर करण्यात आली?
अमेरिकेत २५ मे २०२० रोजी पोलिसांनी जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाची हत्या केल्यानंतर संपूर्ण देशात मोठा आक्रोश झाला. अमेरिकेतील वर्णवर्चस्ववाद अजूनही कायम असल्याची टीका झाली. लोकशाही मूल्ये आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हक्क यासाठी जागरूक असणाऱ्या अमेरिकी नागरिकांचा सरकारवरील दबाव वाढला. त्यानंतर वर्षभरानंतर जुनटीन्थनिमित्त राष्ट्रीय सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक तोपर्यंत अनेक अमेरिकी नागरिकांना हा दिवस आणि त्यामागील इतिहास याबद्दल काहीही माहीत नव्हते.
विश्लेषण : एल निनो सक्रिय.. पावसावर काय परिणाम?
जुनटीन्थची सुरुवात कुठे झाली?
टेक्सास राज्यामध्येच १९ जून १८६६ या दिवशी जुनटीन्थ साजरा करण्यात आला. अमेरिकेतील शेवटच्या कृष्णवर्णीय व्यक्तीची गुलामगिरीतून सुटका होण्याच्या अभूतपूर्व घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त या दिवसापासून जुनटीन्थ साजरा करण्याची सुरुवात झाली. खरे तर अमेरिकेतील गुलामगिरी कायद्याने १८६३ मध्येच संपुष्टात आली होती. पण टेक्सासमधील कृष्णवर्णीय गुलामांना त्याबद्दल माहिती मिळून त्यांची सुटका होण्यासाठी १९ जून १८६५ हा दिवस उजाडावा लागला.
अमेरिकेतील गुलामगिरी कधी संपुष्टात आली?
अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांना गुलामगिरीतून मुक्त करणारा अतिशय महत्त्वाचा कायदा अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या काळात मंजूर झाला. लिंकन यांच्या इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशनने ६ डिसेंबर १८६३ पासून अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची गुलामगिरी अधिकृतपणे संपुष्टात आली. यासंबंधी सर्व संबंधितांना, म्हणजे कृष्णवर्णियांना गुलाम म्हणून फुकटात राबवून घेणाऱ्या श्वेतवर्णीयांपासून प्रत्यक्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या कृष्णवर्णीयांपर्यंत याबाबत माहिती देण्यास सांगण्यात आले. पण स्वतःचा फायदा सहजासहजी गमावण्यास तयार नसलेल्या टेक्सासमधील जमीनदार, व्यापाऱ्यांनी यासंबंधीची माहिती कोणाला कळूच दिली नाही. अखेर, युनियन मेजर जनरल गॉर्डन ग्रेंजर १९ जून १८६५ रोजी साधारण दोन हजार सैनिकांसह गल्फ कोस्ट सिटीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर गुलामांची सुटका झाली.
विश्लेषण: ‘सॉनिक बूम’शिवाय स्वनातीत विमान निर्मिती शक्य?
पहिल्यांदा जुनटीन्थ कसा साजरा करण्यात आला?
या दिवशी, टेक्सासमधील ग्लॅव्हस्टोन येथे सुटका झालेल्या कृष्णवर्णीय नागरिकांनी सामूहिक प्रार्थना केल्या आणि आध्यात्मिक गाणी गायली. नवीन कपडे घालून, चविष्ट पदार्थ खाऊन आणि एकमेकांना खिलवून त्यांनी आपला नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला. सुरुवातीची काही वर्षे गुलामगिरीचा सर्वात काळाकुट्ट इतिहास असलेल्या टेक्सासमध्ये जुनटीन्थ साजरा केला जात असे. पण पुढे काही वर्षांमध्येच त्याचे लोण इतर राज्यांमध्येही पसरले आणि त्याला वार्षिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. आता या दिवशी लोक रस्त्यावर येतात, मिरवणुका काढल्या जातात, रस्त्यावर लहानमोठे कार्यक्रम केले जातात, संगीताचे कार्यक्रम होतात, लोक विविध पदार्थ तयार करतात आणि एकमेकांना खाऊ घालतात. त्याशिवाय इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशनचे जाहीर वाचन हा या सोहळ्याचा महत्त्वाचा भाग असतो.
जुनटीन्थ हे नाव कसे पडले?
नाइन्टीनमधील टीन आणि जून हे दोन शब्द एकत्र करून जुनटीन्थ हा शब्द रूढ झाला. या दिवसाला जुनटीन्थ इंडिपेंडन्स डे, फ्रीडम डे, सेकंड इंडिपेंडन्स डे आणि इमॅन्सिपेशन डे अशा विविध नावांनी ओळखले जाते.
जुनटीन्थला सेकंड इंडिपेंडन्स डे का म्हणतात?
अमेरिकेला १७७६ मध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले खरे, पण अमेरिकेतील सर्वांनाच मुक्तता मिळाली नव्हती. केवळ श्वेतवर्णीय नागरिकांनाच स्वातंत्र्याचा आनंद उपभोगता येत होता. गुलामगिरीमध्ये खितपत पडलेल्या कृष्णवर्णीयांच्या आयुष्यात काहीही फरक पडला नव्हता. त्यांचे मालक केवळ बदलले होते. हलाखीचे जीवनमान, अपमानास्पद वागणूक आणि काबाडकष्ट तसेच होते. त्यामुळेच जुनटीन्थला कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या दृष्टीने हाच खरा स्वातंत्र्य दिन आहे.