– भक्ती बिसुरे
संशोधनाच्या क्षेत्रातील एका महत्त्वाच्या दीर्घकालीन प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचा संबंध थेट तुमच्या आमच्या, प्रत्येकाच्या – म्हणजे खरे तर मानवाच्या जगण्याशी आहे. या संशोधन प्रकल्पाचा पहिला मसुदा पूर्ण होऊन तब्बल दोन दशकांहून अधिक काळ उलटल्यानंतर आता हे संशोधन पूर्ण झाल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. मानवाचा जनुकीय नकाशा पूर्ण करण्याचा हा प्रकल्प आहे. ‘ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट’ म्हणून तो जगभरामध्ये ज्ञात आहे. हे संशोधन नैतिकतेच्या मुद्यावर किती योग्य, याविषयही जगभरात भरपूर चर्चा झाली. त्यामुळेच हा प्रकल्प नक्की काय आहे, मानवजातीसाठी त्याचे महत्त्व काय, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट आहे तरी काय?
ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संशोधन प्रकल्प आहे. मानवाच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या डीएनए तयार करणाऱ्या प्राथमिक जनुकीय जोड्या शोधण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला. मानवी जिनोम भौतिक आणि कार्यात्मक दृष्टिकोनातून ओळखणे, त्यांचा नकाशा तयार करणे आणि त्यांचे क्रमनिर्धारण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन संशोधन केलेला हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. १९८४ मध्ये अमेरिकन सरकारने ही कल्पना उचलून धरली. १९९० मध्ये या प्रकल्पावर प्रत्यक्ष संशोधन सुरु झाले. एप्रिल २००३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले, मात्र त्यावेळी केवळ ८५ टक्के जनुकांवर हे संशोधन अवलंबून होते. मे २०२१ मध्ये हे संशोधन ‘कम्प्लिट जिनोम’ या पातळीपर्यंत पोहोचले. या संशोधनात समाविष्ट नसलेले वाय क्रोमोसोम हे जानेवारी २०२२ मध्ये अंतर्भूत करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीचा जिनोम हा एकमेवाद्वितीय असतो. मानवाचा जनुकीय नकाशा तयार करण्यासाठी अत्यंत कमी संख्येच्या व्यक्तींचे जनुकीय क्रमनिर्धारण केले जाते. त्यावर प्रत्येक गुणसूत्राचा अनुक्रम निश्चित केला जातो. मानवी जनुक हे अनेक तुकड्यातुकड्यांतून साकारलेल्या नक्षीप्रमाणे असून, कोणत्याही एका व्यक्तीच्या जनुकांचे प्रतिनिधित्व करत नाही. मानवी जिनोमचा बहुसंख्य भाग हा समस्त मानवजातीत समानच असल्याचे या संशोधनावरुन समोर येते. अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स, जर्मनी आणि चीन यांच्या सहभागातून हा प्रकल्प साकारला आहे.
संशोधन दीर्घकालीन कशामुळे?
या प्रकल्पावर १९९० मध्ये सुरु झालेले संशोधन २००३ मध्ये पूर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले. मात्र, त्या संशोधनात केवळ ८५ टक्के जनुक नमुन्यांचा समावेश होता. दरम्यानच्या काळातील उपलब्ध तंत्रज्ञान हे संशोधन पूर्ण करण्यासाठी पुरेसे नसल्याने त्यात अडथळे होते. २०२१ मध्ये हे संशोधन कम्प्लिट जिनोम पातळीपर्यंत पोहोचले. अमेरिकन शास्त्रज्ञांनी नुकतेच त्या संदर्भात सहा शोधनिबंध ‘सायन्स’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केले असून त्यामुळे हे संशोधन पूर्णत्वास गेल्याचे अनुमान काढण्यात येत आहे.
या संशोधनाचा प्रत्यक्ष उपयोग काय याचे आकलन होण्यास आणखी काही जावा लागेल. मानवाचा विकास, वय वाढणे, कर्करोग, उत्क्रांती, स्थलांतर यांसारख्या घडामोडींबाबतचे आकलन होण्यास या संशोधनामुळे मदतच होणार आहे.
जनुकीय नकाशा कशासाठी?
मानवाचा जनुकीय नकाशा तयार करणे ही दीर्घकालीन संशोधनातून आकारास आलेली एक मोठी घटना आहे. ती खर्चिकही आहे. त्यामुळे साहजिकच असा जनुकीय नकाशा कशासाठी हवा असा प्रश्न उपस्थित होतो. जनुकीय नकाशामुळे मानवाच्या उत्क्रांतीतील अनेक महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकणे शक्य होणार आहे. मानवाने अनेक संसर्ग आणि शारीरिक व्याधी यांचा सामना कसा केला, शरीरात आलेली विषद्रव्ये शरीर कसे बाहेर टाकते, मानवी मेंदू त्याला इतर सजीवांपासून वेगळे कसे ठरवतो, प्रत्येक व्यक्ती वेगळी कशी ठरते या व अशा अनेक प्रश्नांचा उलगडा या जनुकीय नकाशातून होण्याची शक्यता आहे. केवळ माणूस आणि इतर सजीव अशी तुलनाच नव्हे तर आपण एक व्यक्ती म्हणून कसे घडतो याचीही उकल या जनुकीय नकाशाच्या संशोधनातून होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. मानवाबद्दल अज्ञात असलेल्या अनेक गोष्टी मानवाच्या जनुकीय नकाशातून उलगडण्याची शक्यता स्पष्टपणे दिसत असल्याचे या संशोधनातील सहभागी शास्त्रज्ञ सांगतात.
संशोधनासाठी नमुने कसे घेतले?
या संशोधनासाठी कोणाचे वैद्यकीय नमुने घेतले आहेत याची माहिती संशोधकांनाही नाही. मोठ्या मानवी समूहातून हे नमुने संकलित करण्यात आले. त्यासाठी महिलांचे रक्त आणि पुरुषांच्या वीर्याचे नमुने संकलित करण्यात आले. त्यातील काहींवर प्रक्रिया करण्यात आली. दोन पुरुष आणि दोन महिलांच्या रक्तातील पांढऱ्या पेशींचा वापरही करण्यात आला. या नमुन्यांना गुप्त नाव (कोड नेम) देण्यात आले. नायजेरिया, जपान, चीन, फ्रान्स, पश्चिम आणि उत्तर युरोप तसेच अमेरिकन रहिवाशांचे नमुने यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट आहेत.
हे संशोधन किती नैतिक, किती अनैतिक?
संशोधनाच्या प्राथमिक टप्प्यावर यातून निघणारे निष्कर्ष मानवजातीत दरी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. जनुकीय माहितीतून संभाव्य आजारांबाबत मिळणारी माहिती नागरिकांना विमा संरक्षण मिळवून देण्यास अडचण येईल अशी भीती व्यक्त करण्यात आली. त्यावर उपाय म्हणून हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी अॅण्ड अकाउंटेबिलिटी ॲक्ट सारख्या स्वतंत्र कायद्याची निर्मितीही अमेरिकेत करण्यात आली. वैज्ञानिक, वैद्यकीय आणि औषध निर्मितीतील विकासासाठी हा महत्त्वाचा आणि आवश्यक प्रकल्प असल्याचे अधोरेखित करुन तो पूर्णत्वाकडे नेण्यात आला. संभाव्य रोगांची शक्यता ओळखणे, त्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न आणि संशोधन करणे आणि वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवेसाठी येणाऱ्या डॉक्टरांच्या अभ्यास आणि माहितीसाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरणार असल्याचे संशोधकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.