पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात पाच महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी सिंधू जलकराराला स्थगिती देण्याच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात झालेल्या कोणत्याही युद्धाच्या वेळीही हा करार अमलात होता. यावरून त्याचे महत्त्व लक्षात येईल. करार स्थगित करण्याचे पाकिस्तानवर काय परिणाम होतील हा जसा प्रश्न आहे तसाच भारताला त्यामुळे कितपत फायदा होईल हा मुद्दाही उपस्थित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

सिंधू जलवाटप करार काय आहे?

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू जलकरारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांच्या जल वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सिंधू आणि तिच्या पाच उपनद्यांचा समावेश आहे. पूर्वेकडील रावी, बियास आणि सतलज या तीन नद्यांचे पाणी भारताला मिळते. तर पश्चिमेकडील सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचे पाणी पाकिस्तानच्या वाट्याला जाते. जागतिक बँकेच्या मते, या करारामुळे सिंधू नदी स्रोताच्या निष्पक्ष आणि सहकार्यात्मक व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला गेला आहे. पाच उपनद्यांसह सिंधू नदीचे पाणी दोन्ही देशांसाठी कृषी, पिण्याचे पाणी आणि उद्योगासाठी आवश्यक आहे.

कराराची वैशिष्ट्ये

या करारासाठी जागतिक बँकेने मध्यस्थी केली होती. जगातील सर्वात जास्त टिकलेल्या जलवाटप करारांपैकी एक म्हणून सिंधू जलकराराकडे पाहिले जाते. आकडेवारीत सांगायचे तर या करारानुसार भारताच्या वाट्याला २० टक्के पाणी येते, म्हणजे वर्षाला साधारण ३३ दशलक्ष एकर फूट (एमएएफ) किंवा ४१ अब्ज घनमीटर (बीसीएम). तर पाकिस्तानला ८० टक्के म्हणजे १३५ एमएएफ किंवा ९९ बीसीएम पाणी मिळते. मात्र दोन्ही देशांना शेती आणि जलविद्युत प्रकल्पांसारख्या गैर-उपभोग उद्दिष्टांसाठी एकमेकांच्या वाट्याच्या पाण्याचा मर्यादित वापर करता येतो. मात्र, भारत हे पाणी रोखू शकत नाही किंवा त्याचा प्रवाह लक्षणीयरित्या बदलू शकत नाही.

कराराची गरज का निर्माण झाली?

सिंधू नदी तिबेटमध्ये उगम पावते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. भारत, पाकिस्तानबरोबरच अफगाणिस्तान व चीनच्या काही भागांमध्येदेखील ही नदी वाहते. मात्र फाळणीनंतर नदीच्या पाणीवाटपावरून दोन्ही देशांदरम्यान वाद निर्माण झाला. १९४८मध्ये भारताने सिंधू नदीचा प्रवाह तात्पुरता थांबवला, त्यानंतर पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित केला. त्यावर संयुक्त राष्ट्रांनी त्रयस्थ पक्षाच्या मध्यस्थीची शिफारस केली. त्यानुसार, जागतिक बँकेने ती भूमिका बजावली.

सिंधू नदीचे पाकिस्तानसाठी महत्त्व

सिंचन, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाकिस्तान मोठ्या प्रमाणात सिंधूवर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा वाटा २३ टक्के आहे आणि तेथील ६८ टक्के जनता उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे. सिंधूच्या पाण्यावर पाकिस्तानची शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळे त्यांची अन्नसुरक्षा याच नदीवर विसंबून असल्याचे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

सिंधूचे पाणी अडवल्यास काय होईल?

सिंधूच्या पाण्याचा पुरवठा खंडित किंवा विस्कळीत झाल्यास पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर आणि परिणामी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील. विशेषतः ग्रामीण नागरिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसेल. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अपुरे पीक, अन्नधान्याचा तुटवडा आणि ग्रामीण पाकिस्तानात आर्थिक अस्थैर्य हे परिणाम संभावतात. आताच पाकिस्तानसमोर झपाट्याने खाली जाणारी भूजल पातळी, शेतजमिनीचे क्षारीकरण आणि पाणी साठवण्याची मर्यादित क्षमता अशा समस्या आहेत. त्यातच सिंधूचे पाणी आटल्यास त्यांच्यासमोरील संकट अधिक तीव्र होईल.

भारताच्या निर्णयाचा अर्थ काय?

सिंधू नदीसाठी भारताचे माजी आयुक्त पी. के. सक्सेना यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, आता भारत पाणी प्रवाहाविषयीची आकडेवारी पाकिस्तानला देणे तातडीने थांबवू शकतो. सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वापरावर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. तसेच सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडील नद्यांवरही भारत धरणासारखे जलसाठे उभारू शकतो. त्याशिवाय,जम्मू आणि काश्मीरमध्ये झेलम नदीची उपनदी असलेल्या किशनगंगावरील किशनगंगा एचपी आणि चिनाबवरील रॅटल एचपी या दोन जलविद्युत प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांना भेटी भारत थांबवू शकतो, असेही सक्सेना यांनी सांगितले.

एकतर्फी करारबंदी अशक्य

महत्त्वाची बाब म्हणजे भारत किंवा पाकिस्तानला कायद्याने एकतर्फी निर्णय घेऊन करार रद्द करता येणार नाही. कराराला अंतिम मुदत नाही आणि त्यामध्ये कोणतेही बदल करायचे असतील तर त्यासाठी दोन्ही देशांची संमती आवश्यक आहे. करार एकतर्फी रद्द करता येत नसला तरी दोन्ही देशांना त्याविषयी त्रयस्थ पक्षाकडे आणि परिणामतः लवादाकडे तक्रार उपस्थित करण्याची मुभा आहे.

भारताचा निर्णय केवळ दबावतंत्र?

सिंधू जलकरार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय म्हणजे तातडीने पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी अडवणे असा होत नाही. भारताला सिंधूचे सर्व पाणी अडवणे किंवा त्याचा प्रवाह वळवणे शक्य नाही. त्यासाठी आवश्यक साठवण क्षमता आणि पायाभूत सुविधा भारताकडे नाहीत. अशा सुविधा उभारायच्या असल्यास त्यासाठी काही वर्षे लागतील. सद्यःस्थितीत भारत पाकिस्तानचे पाणी जास्तीत जास्त ५ ते १० टक्के कमी करू शकतो. त्यामुळे सध्या तरी सिंधू जलकराराला स्थगिती देणे हा केवळ भारताच्या दबावतंत्राचा भाग आहे असे मानण्यास जागा आहे.

nima.patil@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the indus waters treaty will a moratorium achieve india objectives print exp amy