गौरव मुठे
अमेरिकी कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर स्टॉकमध्ये फेरफार केल्याचा आरोप ठेवल्यानंतर सात महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा शोधपत्रकारांच्या ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी)’ या जागतिक संघटनेने समभागाच्या भावात अफरातफर केल्याचा तपशील मांडणारा एक अहवाल पुन्हा बाहेर आला. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना हा अहवाल आला. आरोपांसंबंधीच्या प्रकरणाची, भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांच्या चौकशीच्या आधारे आधीच न्यायालयाला अहवाल सादर केला आहे. आता पुन्हा अदानी समूहासमोर नवे संकट उभे राहिले आहे. ते संकट नेमके काय आहे, त्याचा काय परिणाम झाला हे जाणून घेऊया.
अदानी समूहाबाबत नव्याने उद्भवलेला वाद काय?
‘हिंडेनबर्ग’ अहवालातील आरोपांपाठोपाठ अदानी समूह पुन्हा वादात सापडला आहे. अदानी समूहाच्या प्रवर्तक कुटुंबीयांनी भागीदारांशी संलग्न परदेशी संस्थांद्वारे स्वत:च्या कंपन्यांच्या समभागांचे भाव फुगवण्यासाठी कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक केल्याचा आरोप शोधपत्रकारांच्या ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी)’ या जागतिक संघटनेने गुरुवारी केला. विद्यमान वर्षात जानेवारीमध्ये ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अदानी समूहावर कथित लबाडी आणि गैरप्रकाराचे आरोप केले होते. त्यामुळे समूहातील कंपन्यांच्या बाजारमूल्यास जबर फटका बसला होता. हा घाव ताजा असताना, जवळपास त्याच आरोपांना नव्याने पुष्टी देणारे दस्तावेज ‘ओसीसीआरपी’ने पटलावर आणले आहेत. जगभरात करमुक्त छावण्या (टॅक्स हेव्हन) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मॉरिशससारख्या देशांतील अनेक दस्तावेज आणि अदानी समूहातील अंतर्गत ई-मेल संदेश आणि फायलींच्या आधारे ‘ओसीसीआरपी’ने हे आरोप केले आहेत. या आरोपांना प्रसिद्धी देणारे वृत्तान्त ‘द फायनान्शियल टाइम्स’ आणि ‘द गार्डियन’ने उजेडात आणले.
‘ओसीसीआरपी’चे नेमके म्हणणे काय?
दोन वैयक्तिक गुंतवणूकदार-दुबईचे नासेर अली शाबान अली आणि तैवानचे चांग चुंग-लिंग यांचे अदानी कुटुंबाशी दीर्घकाळ व्यावसायिक संबंध असून, अदानी कुटुंबाने त्यांचा आणि याच प्रकारच्या विदेशस्थ प्रारूपाचा समूहातील कंपन्यांचे समभाग खरेदी आणि विक्रीसाठी आधीपासूनच वापर केला असल्याचा आरोप करण्यात आला. विदेशी संस्थांमार्फत गुप्त व्यवहारांमध्ये गौतम अदानी यांचा मोठा भाऊ विनोद अदानी यांनी कथितपणे बजावलेल्या प्रभावशाली भूमिकेचेही पुरावेही त्यांनी पुढे ठेवले. उपलब्ध दस्तावेजानुसार, विनोद अदानी यांच्याशी निगडित कंपन्यांमध्येही अली आणि चँग हे दोघे सक्रिय होते. त्यांनी परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांची खरेदी-विक्री केली. ‘ओसीसीआरपी’ने पुढे आणलेल्या ऑफशोअर आर्थिक नोंदींनुसार, अदानी कुटुंबाच्या सहयोगींनी गौतम अदानी यांना भारतातील सर्वांत मोठ्या आणि सर्वांत शक्तिशाली उद्योगपतींपैकी एक बनविण्यासाठी स्वत:च्याच कंपन्यांमधील समभाग अनेक वर्षे विकत घेण्याचे व्यवहार केले आहेत. अली आणि चँग या दोघांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने विनोद अदानी यांच्या कंपनीलाही गुंतवणूक सल्ल्यासाठी पैसे दिल्याची कागदपत्रेही समोर आली आहेत, असे ‘ओसीसीआरपी’ने म्हटले आहे.
कथित लबाडीच्या गुंतवणुकीने काय साधले?
कथित लबाडीच्या गुंतवणूक व्यवहारामुळे २०२२ साली संस्थापक गौतम अदानी हे १२० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त संपत्तीसह भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले होते. मात्र हिंडेनबर्गच्या अहवालातील आरोपामुळे मात्र समूहातील कंपन्यांच्या एकत्रित बाजार मूल्याला सुरुवातीला १०० अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागले होते आणि गौतम अदानी यांना जागतिक श्रीमंतांच्या यादीतील प्रमुख स्थानही गमवावे लागले होते. शिवाय ‘ओसीसीआरपी’च्या नव्याने करण्यात आलेल्या आरोपांमुळे एका सत्रात कंपनीच्या बाजारभांडवलात पुन्हा सुमारे ३६,००० कोटी रुपयांची घसरण झाली.
नेमके आरोप काय करण्यात आले आहेत?
अदानी समूहाशी संबंधित गुंतवणूकदारांनी आणि प्रवर्तकांनीच मॉरिशसस्थित कंपन्यांतून अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक केली. यामध्ये अदानी समूहातील निगडित नासीर अली शबान अली, चँग चुंग-लिंग यांचा संबंध असल्याचे अहवालात सांगितले आहे. अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांची परदेशी कंपन्यांमार्फत खरेदी-विक्री करण्यात आली आणि स्वतःच्या कंपन्यांच्या समभाग खरेदीतून भाव कृत्रिमरित्या फुगवले गेले.
यामध्ये अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांच्या कंपनीकडून दोघांना गुंतवणूक सल्ला देण्यात आल्याचा अहवालात दावा करण्यात आला आहे.
अदानी समूहाचे आरोपांबाबत म्हणणे काय?
अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘जुनेच आरोप पुन्हा वेगळ्या पद्धतीने करण्यात आले आहेत. परदेशी माध्यमांच्या एका विभागाद्वारे समर्थित, सोरोस-फंडाच्या हितसंबंधांतून पुढे आलेल्या या गटाने हिंडेनबर्ग अहवालातील मूर्खपणालाच पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे,’ असा दावा ‘अदानी’ने निवेदनाद्वारे केला आहे. ‘ताज्या आरोपातील दावे हे एका दशकापूर्वी बंद झालेल्या प्रकरणांवर आधारित आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ओव्हर इनव्हॉइसिंग, परदेशात पैसे हस्तांतरित करणे, संबंधित पक्षांकडून व्यवहार आणि विदेशी संस्थांद्वारे गुंतवणूक केल्याच्या त्या आरोपांची चौकशी पूर्ण केली आहे,’ असे निवेदनात म्हटले आहे.
‘सेबी’कडे संशयाच्या नजरेने का पहिले जात आहे?
‘ओसीसीआरपी’ने उघड केलेल्या पत्रानुसार, भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ला २०१४ च्या सुरुवातीला अदानी समूहाच्या कथित संशयास्पद समभाग गुंतवणूक व्यवहारांचे पुरावे देण्यात आले होते. परंतु, त्याकडे ‘सेबी’ने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आताचे ताजे आरोप आणि त्यासंदर्भातील दस्तावेज खरे असतील, सार्वजनिकरित्या सूचीबद्ध समभागांसाठी भारतीय भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने घालून दिलेल्या नियमांचे ते थेट उल्लंघन ठरेल. परिणामी ‘सेबी’ला अदानी समूहाबाबतचा आणखी खोलवर जाऊन तपास करणे क्रमप्राप्त ठरेल. हिंडेनबर्ग अहवालानंतर केलेल्या चौकशीमध्ये ‘सेबी’ने अदानी उद्योग समूहाला निर्दोषत्व बहाल केले होते. त्यानंतर काही दिवसांतच ‘सेबी’च्या चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला अदानी समूहाच्या मालकीच्या ‘एनडीटीव्ही’मध्ये संचालक करण्यात आले. म्हणजे आता चौकशी करणारी व्यक्तीच अदानींची नोकर आहे. यातून चौकशी कशी झाली असेल असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे.
नासीर अली शबान अली, चँग चुंग-लिंग यांचा अदानी समूहाच्या प्रवर्तकांचा संबंध आहे का?
ओसीसीआरपीच्या म्हणण्यानुसार , संयुक्त अरब अमिरातीचे अली आणि तैवानचे चांग यांनी अदानी समूहाच्या कंपन्या आणि विनोद अदानी यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये संचालक आणि भागधारक म्हणून काम केले आहे. २००७ मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दाखल केलेल्या खटल्यात चांग यांची अदानी कंपन्यांच्या तीन कंपन्यांचे संचालक म्हणून वर्णी लागली होती. अली यांचे नाव एका ट्रेडिंग फर्मशी संबंधित असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. डीआरआयच्या २०१४ च्या आणखी एका प्रकरणात, चांग आणि अली हे दोन कंपन्यांचे संचालक म्हणून नमूद केले आहेत, ज्या कंपन्या नंतर विनोद अदानी यांच्या मालकीच्या असल्याचे उघडकीस आल्याचा दावा देखील करण्यात आला. शिवाय अली आणि चँग हे अदानी समूहाच्या कंपन्यांशी दीर्घकाळ संबंधित आहेत, त्यांना इनसाइडर बनवून समभागांची किंमत वाढवण्यात आली. म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या प्रवर्तकांनी समभाग खरेदी केले. भांडवल बाजार नियमांनुसार, सूचिबद्ध कंपनीचे प्रवर्तक ७५ टक्क्यांपेक्षा जास्त समभाग घेऊ शकत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, हा समभागांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा आणि समभागां किमतींमध्ये फेरफार करण्याचा मार्ग आहे. या प्रकरणात, अली आणि चांग यांच्या भागभांडवलासह, एकूण प्रवर्तक हिस्सेदारीची मर्यादा ओलांडली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचा आरोप आहे. तसे निष्पन्न झाल्यास, तो कायद्याचा भंग असेल आणि हिंडनबर्ग अहवालातील निष्कर्षांना देखील त्यामुळे पुष्टी मिळेल.
नवीन आरोपांनांतर समभागांवर काय परिणाम झाला?
विदेशातील मुख्यतः मॉरिशससारख्या करमुक्त छावण्यांमधील संस्थांच्या माध्यमातून अदानी कुटुंबीयांनी त्यांच्याच समूहातील काही कंपन्यांच्या समभागांचे मूल्य फुगवण्यासाठी गुंतवणूक केल्याचा शोध पत्रकारांची जागतिक संघटना ‘ओसीसीआरपी’ने नव्याने केल्यांनतर, अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग धाडकन कोसळले. गुरुवारच्या सत्रात अवघ्या काही तासांत कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल त्यामुळे ३५,६०० कोटींनी गडगडले. अदानी समूहाच्या भांडवली बाजारातील नऊ सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल १०,८४,६६८ कोटी रुपयांवरून घसरून १०,४९,०४४ कोटींवर स्थिरावले. त्यात एकाच सत्रात सुमारे ३५,६२४ कोटींची घसरण झाली. मात्र शुक्रवारच्या सत्रात अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग पुन्हा सावरले आहेत.
gaurav.muthe@expressindia.com.