जोडप्यांमध्ये नवनवीन ट्रेंड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘लिव्हिंग अपार्ट टुगेदर’ नावाच्या ट्रेंडची सध्या चर्चा सुरू आहे. जोडप्यांमध्ये हा ट्रेंड वाढताना दिसत आहे. या ट्रेंडनुसार दोन लोक एकमेकांशी लग्न करतात, एकमेकांमध्ये प्रेमही असतं; परंतु ते एकत्र न राहता वेगवेगळे राहतात. या ट्रेंडनुसार नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी जोडपी हा पर्याय निवडत असल्याचे समोर आले आहे. काय आहे ‘लिव्हिंग अपार्ट टुगेदर’ ट्रेंड? जोडप्यांमध्ये हा ट्रेंड वाढण्याची कारणे काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘लिव्हिंग अपार्ट टुगेदर’ ट्रेंड काय आहे?
लिव्हिंग अपार्ट टुगेदर (LAT) हा ट्रेंड पश्चिमेकडील देशांमध्ये वाढत आहे आणि हा विवाहित जोडप्यांमध्ये वाढणारा ट्रेंड आहे. नात्यासह स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी जाणूनबुजून एकत्र न राहण्याचा पर्याय जोडपी निवडतात. या ट्रेंडमुळे घरातील कामे, झोप आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाला हवा असलेला स्वतःचा स्पेस आणि वेळेचे नियोजन, यावरून होणारा संघर्ष टाळण्यासाठी लोक एका नात्यात असूनदेखील एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेत आहेत.
‘लिव्हिंग अपार्ट टुगेदर’ जीवनशैलीचा अवलंब ६० वर्षांपेक्षा जास्त लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत असल्याचे समोर आले आहे, असे समुपदेशन मानसशास्त्रज्ञ आणि रिलेशनशिप्स ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्सच्या सीईओ एलिझाबेथ शॉ यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले. त्या म्हणाल्या, “ज्या लोकांना नात्याचा भरपूर अनुभव आहे किंवा जीवनाचा अनुभव आहे, त्यांचे असे म्हणणे आहे की, मी या व्यक्तीवर खरोखर प्रेम करू शकतो; परंतु मला यापुढे पारंपरिक नातेसंबंध आणि त्यातून येणारे सर्व परिणाम, जसे की काळजी वाटणे, मालमत्तेची गुंतागुंत, आर्थिक वाटणी करणे या गोष्टी नको आहेत. त्यामुळे हे सर्व साध्य करण्यासाठी या जोडप्यांना शारीरिक पद्धतीने विभक्त होण्याची गरज वाटणे हे एक वास्तव आहे.
‘लिव्हिंग अपार्ट टुगेदर’ ट्रेंड नक्की कसे कार्य करते?
या जीवनशैलीचे पालन करणाऱ्या जोडप्यांसाठी परिपूर्ण नातेसंबंध टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे; परंतु, त्यातल्या त्यात त्यांना स्वतःसाठी वेळही हवा आहे. आजकाल अनेक तरुण मंडळी लग्न आणि पालकत्वाला उशीर करीत आहेत. त्याचप्रमाणे काही जण वैवाहिक जीवनाकडे वळायचे की नाही, याचादेखील विचार करू लागले आहेत. जी तरुण मंडळी आपल्या आयुष्याची २० किंवा ३० वर्षे अविवाहित आणि स्वतंत्रपणे जगली आहेत, त्यांच्यासाठी सहवासाशी जुळवून घेणे आव्हानात्मक असू शकते.
लॉस एंजेलिसमधील मानसशास्त्रज्ञ व नातेसंबंध तज्ज्ञ शेरी सिम्स ॲलन यांनी ब्राइड्स मॅगझिनला सांगितले की, मला हा एक संभाव्य वाढणारा ट्रेंड वाटतो. अशी जोडपी एकाच इमारतीत, एकाच गृहसंकुलात किंवा अगदी वेगवेगळ्या शहरात राहतात; फक्त फरक एवढाच असतो की, ते एकाच छताखाली राहत नाहीत. एकत्र वेळ कसा घालवायचा, एकमेकांना कधी भेटायचे, एकत्र बाहेर कधी जायचे किंवा एकत्र प्रवास कधी करायचा, यासाठी दिवस ठरवला जातो किंवा विशिष्ट दिवस जसे की शनिवार व रविवार बाजूला ठेवला जातो. एकंदरीत ते या गोष्टीदेखील नियोजनानुसार करतात. ही जोडपी विभक्त तर होतात; परंतु त्यांच्यात वचनबद्धता आणि मुक्त संवाद कायम राहतो.
हा ट्रेंड ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’सारखा आहे का?
दोन्ही प्रकारांत म्हणजेच ‘लिव्हिंग अपार्ट टुगेदर’ ट्रेंड मध्ये आणि ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’मध्ये जोडपी एकमेकांपासून वेगळी राहतात. असे असले तरी दोन्ही प्रकार भिन्न आहेत. ब्राइड्स मॅगझिननुसार, ‘लिव्हिंग अपार्ट टुगेदर’ ट्रेंड फॉलो करणारे जोडपे वेगळे राहण्याचा पर्याय मुद्दाम निवडतात, या व्यवस्थेमुळे त्यांचे नाते मजबूत होते, असा विश्वास त्यांना असतो. परंतु, ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’मध्ये सामान्यत: जोडपी काम, शिक्षण किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे एकमेकांपासून दूर राहतात. वेगळे राहण्याचा पर्याय ते स्वतः निवडत नाहीत. परिणामी, ते एकमेकांना फार क्वचित भेटत आणि एकमेकांच्या दैनंदिन जीवनात कमी समाकलित होतात. ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’चा अनेकदा जोडप्यांच्या नात्यावर परिणाम होतो आणि काही प्रकरणांमध्ये दुरावाही निर्माण होतो.
वृद्ध जोडप्यांना ‘लिव्हिंग अपार्ट टुगेदर’ ट्रेंडचा फायदा होत आहे का?
अभ्यास असे सूचित करतात की, वैवाहिक संबंध तोडल्यास मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जी जोडपी वेगळे राहणे पसंत करतात, त्यांच्या नातेसंबंधाच्या व्याख्येनुसार त्यांना सतत एकत्र राहण्यापेक्षा स्वतःसाठी वेळ देणेदेखील तितकेच महत्त्वाचे वाटते. ज्या व्यक्तींना स्वातंत्र्य आणि स्पष्ट नातेसंबंधांची मर्यादा महत्त्वाची वाटते, त्यांच्यासाठी हा ट्रेंड फायदेशीर ठरू शकतो. डिसेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या ब्रिटनच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, ‘लिव्हिंग अपार्ट टुगेदर’ नातेसंबंधातील वृद्ध जोडप्यांनी अविवाहित राहणाऱ्यांपेक्षा चांगले मानसिक आरोग्य अनुभवले.
जोडप्यांना एकाच नात्यात राहूनही वेगळे का राहायचेय?
तरुण जोडपीही या ट्रेंडकडे वळत आहेत. या ट्रेंडमुळे बऱ्याच जणांना नात्याला देणारा वेळ आणि स्वतःला देण्यात येणारा वेळ यात समतोल राखता येतो. त्यामुळे जोडीदारांना स्वतःसाठी वेळ, स्वतःच्या आवडी-निवडी जपणे आणि तरीही वादविवाद न करता, एकमेकांबरोबर एका गोड नात्यात राहता येते.
१. वैयक्तिक विकास : वेगळे राहणे स्वातंत्र्य आणि वैयक्तिक आनंदाला प्रोत्साहन देऊ शकते. सहवासाचे विचलन नसल्याने जोडीदार त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आणि स्वयंविकासावर लक्ष केंद्रित करू शकतात.
२. नात्यातील आनंद कायम ठेवणे : जोडीदारांना स्वतःची जागा मिळाल्याने त्यांच्यातील एकमेकांविषयीचा आणि नात्यातील आनंद कायम राहतो. त्यामुळे एकमेकांबरोबर आयुष्याच्या एका चक्रात न अडकता, नात्यातील नावीन्य आणि प्रेम कायम राहू शकते.
३. व्यावसायिक मागण्या : करिअरच्या जबाबदाऱ्यांमुळे जोडप्यांना त्यांच्या व्यावसायिक आकांक्षांशी तडजोड न करता, त्यांचे नाते टिकवून ठेवता येते. त्यामुळेही तरुण जोडपी या ट्रेंडकडे वळत आहेत.
४. स्वत:चा शोध घेण्याची संधी : या ट्रेंडमुळे व्यक्तींना नातेसंबंधाबाहेर त्यांच्या स्वत:च्या आवडी आणि ओळख शोधण्याचे स्वातंत्र्य मिळते. तसेच वैयक्तिक विकासामुळे भागीदारी मजबूत होते.
हा ट्रेंड का वाढतोय?
हा ट्रेंड जोडप्यांना त्यांचे स्वातंत्र्य जपून जवळीक राखण्यास सक्षम करतो आणि या ट्रेंडच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये अनेक घटकांचे योगदान आहे. ‘लिव्हिंग अपार्ट टुगेदर’ निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वायत्ततेची इच्छा. अनेक व्यक्ती त्यांचा वैयक्तिक वेळ आणि नित्यक्रम यांना प्राधान्य देतात. सहसा एखाद्या व्यक्तीच्या सहवासामुळे त्यात व्यत्यय येऊ शकतो. या ट्रेंडमध्ये करिअरच्या वचनबद्धतेचाही मोठा वाटा आहे. व्यावसायिक मागणी वाढत असताना, जोडपे त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू इच्छितात. त्यामुळेच हा ट्रेंड वाढताना दिसत आहे.