अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये रविवारपासून पडत असलेला मुसळधार पाऊस या आठवड्याच्या अखेरीपर्यंत टिकू शकतो, असा इशारा तेथील हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे भूस्खलन, दरड कोसळणे आणि अचानक येणारे पूर या घडामोडी पुन्हा घडू शकतात, असे सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील, आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगामुळे अनेक भारतीयांच्याही दृष्टीने महत्त्वाचे राज्य असलेल्या कॅलिफोर्नियावर हे संकट का कोसळले आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. या पावसामागे ‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’ हे वातावरणीय कारण असल्याचे सांगितले जाते. या निराळ्या संकल्पनेविषयी…

कॅलिफोर्नियामध्ये किती पाऊस झाला?

कॅलिफोर्नियामध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तिथे वेगवेगळ्या भागांमध्ये १२.७ ते २५.४ सेंमी पाऊस पडला आहे. अमेरिकेच्या ‘नॅशनल वेदर सर्व्हिस’ या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १८७७नंतर कॅलिफोर्नियामध्ये नोंदवलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. हा पाऊस हवामानाशी संबंधित ‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’ या घडामोडीमुळे झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. विक्रमी पावसामुळे कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरनी आठ काउंटींमध्ये आपत्कालीन स्थिती घोषित केली. तसेच काही डोंगराळ भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले.

Rain Maharashtra, Rain in Diwali, Rain,
फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
odisha cyclone
ओडिशात १.७५ लाख एकर पिकांचे नुकसान, दाना चक्रीवादळाचा परिणाम
new method for elephants counting
विश्लेषण: हत्ती गणनेच्या नव्या पद्धतीतून अचूक संख्या समोर येईल?
pune citizens are in trouble due to bad weather Care advice from healthcare professionals
खराब हवामानामुळे पुणेकर बेजार! आरोग्यतज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला
imd predicted temperature will remain high in mumbai for the next two days
उकाडा, घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण; दिवसा ऊन, संध्याकाळच्या पावसामुळे आर्द्रतेतही वाढ
traffic on Solapur road, Fatimanagar Chowk, Signal off at Fatimanagar Chowk, pune,
पुणे : सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार? फातिमानगर चौकातील सिग्नल बंद

हेही वाचा : परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या नवीन ‘सार्वजनिक परीक्षा विधेयकात’ काय आहे?

कॅलिफोर्नियाला पावसाचा किती फटका बसला?

पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अतिशय ग्लॅमरस शहर म्हणून जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या लॉस एंजेलिसमध्ये आतापर्यंत भूस्खलनाच्या ४७५ घटना घडल्या आहेत आणि डझनावारी आस्थापनांचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय सुमारे ४०० झाडेही पडली. ताशी ११२ किलोमीटरपर्यंत वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली. काही प्रत्यक्षदर्शींनी फ्रीज आणि पियानोसारख्या जड वस्तू हवेत उडून जाताना पाहिल्याचे सांगितले. सोमवारी वीजपुरवठा खंडित होऊन सात लाखांपेक्षा जास्त लोकांना अंधारात राहावे लागले. त्यानंतर काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यात संबंधित यंत्रणांना यश आले, तरीही मंगळवारी एक लाखापेक्षा जास्त रहिवाशांना वीज मिळाली नाही. बचावकार्यासाठी अग्निशमन दलाचे एक हजार कर्मचारी तैनात करण्यात आले. पुढील काही दिवस पूर व भूस्खलनाचे संकट कायम राहण्याचा धोका आहे. खरेदीसाठी उत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या बाजारपेठांमध्ये अनेक वाहने चिखलामध्ये अडकून पडली, रस्त्यांवर पाणी साठले आणि घरे चिखलमातीच्या ढिगाऱ्यांखाली दबली गेली. मागील आठवड्यातही कॅलिफोर्नियाला ‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’चा फटका बसला होता, तो तुलनेने कमी होता. सॅन फ्रान्सिस्को या शहरामध्येही मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी घरांच्या आवारात आणि रस्त्यांवर चिखलात अडकून पडलेल्या कार हे सामान्य दृश्य होते.

‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’ म्हणजे काय?

‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’ याचा शब्दशः अर्थ वातावरणीय नदी असा होतो. हवेमधून उष्ण कटिबंधापासून ध्रुवीय प्रदेशाकडे वाहणारा बाष्पाचा अरुंद पट्टा असा त्याचा हवामानशास्त्रीय भाषेत अर्थ आहे. यामुळे आकाशात नदीसमान वाहणारा आर्द्रतेचा प्रवाह तयार होतो. त्यालाच आकाशातील नदी असेही म्हटले जाते. हे पट्टे तीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे असू शकतात. त्याची रुंदी काहीशे किलोमीटर इतकीच असते. या आर्द्र पट्ट्यांमुळे मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते. हवामानाची ही घडामोड सामान्यतः अमेरिका व कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्यांवर घडते. हवाई बेटांजवळ हवेच्या या पट्ट्यात उबदार, आर्द्र हवा मिसळते. हवाईमध्ये मोठ्या प्रमाणात अननसांची (पायनॅपल) लागवड होते. त्यामुळे तिथून उगम पावणाऱ्या या ‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’ना ‘पायनॅपल एक्सप्रेस’ असेही म्हटले जाते. नासाने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीवर कोणत्याही वेळी साधारण ११ टक्के ‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’ असतात. भारतामध्ये ही संकल्पना प्रचलित नाही, त्यामुळे ही संज्ञाही वापरली जात नाही.

हेही वाचा : युक्रेनच्या लष्करप्रमुखांनी राजीनामा का दिला? अध्यक्षांबरोबर मतभेदांचा परिणाम? की युद्ध रेंगाळल्याचा फटका?

‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’ कितपत फायदेशीर किंवा नुकसानदायक असतात?

‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’चे सामर्थ्य ‘कमकुवत ते अपवादात्मक जोरदार’ असू शकते तसेच प्रभावाच्या बाबतीत त्याचे मोजमाप ‘लाभदायक ते धोकादायक’ असे केले जाते. कॅलिफोर्नियामधील ५० टक्के वार्षिक पाऊस व बर्फवृष्टी या ‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’मुळेच होतो. जोरदार ‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’मुळे महापूर आणि भूस्खलनाच्या घटना घडतात. धोकादायक ‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’मुळे यापूर्वीही मनुष्यहानीच्या घटना घडल्या आहेत. कॅलिफोर्नियात गेल्या वर्षीच जवळपास २० जणांचा मृत्यू झाला होता. या रिव्हर आकाशात एकाच ठिकाणी थांबल्या तर त्यामुळे मुसळधार पाऊस पडतो. ज्याप्रमाणे ढग डोंगर, पर्वतांमुळे अडतात आणि पाऊस पडतो, त्याचप्रमाणे या रिव्हरमुळे डोंगराळ भागात जास्त पाऊस पडतो.

हेही वाचा : विश्लेषण: परदेशांतली मोटार सुरक्षा प्रणाली भारतीय रस्त्यांवर का नको?

‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’बद्दल हवामानतज्ज्ञ काय सांगतात?

जगातील इतर अनेक ठिकाणी उद्भवणाऱ्या हवामानविषयक संकटांना कारणीभूत होणारे हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ यामुळे ‘ॲटमॉस्फेरिक रिव्हर’ची तीव्रता वाढण्याचा इशारा हवामानशास्त्रज्ञ देत आहेत. सध्याच्याच वेगाने हवामान बदल होत राहिला तर या रिव्हर अधिक धोकादायक होतील. एल निनोसारखे घटक याला कारणीभूत नाहीत, मात्र साहाय्यक जरूर आहेत असे हवामानतज्ज्ञ डॅनियल स्वेन यांनी सांगितले आहे.

nima.patil@expressindia.com