सिद्धार्थ खांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मलेशिया फ्लाइट एमएच-३७० हे विमान ८ मार्च २०१४ रोजी क्वालालुंपूर येथून बीजिंगकडे जाण्यासाठी आकाशात झेपावले आणि ३९ मिनिटांनी रडारवरून लुप्त झाले. ते हिंदी महासागरात कुठेतरी कोसळले पण आजतागायत त्या विमानाचे अवशेष किंवा विमानातील २३९ प्रवासी व कर्मचाऱ्यांचे अवशेष सापडू शकले नाहीत. प्रवासी विमानवाहतूक इतिहासातील या दुःखद रहस्याविषयी…

शोध पुन्हा घेतला जाणार?

या विमानाचा किंवा त्याच्या अवशेषांचा नव्याने शोध घेतला जावा, याविषयी मलेशियाचे सरकार गांभीर्याने विचार करत आहे. २०१८मध्ये ज्या अमेरिकी रोबोटिक कंपनीने शोधमोहीम राबवली, त्यांनी याबाबत नव्याने प्रस्ताव सादर केला आहे. हिंद महासागराच्या दक्षिणाला विमानाचा शोध घेण्यात आला आणि त्या मोहिमेत अनेक देशांचा सहभाग होता. काही तुकडेच जवळच्या किनाऱ्यांवर वाहून आले, परंतु त्यापलीकडे काहीही सापडले नाही. मलेशियाच्या सरकारने म्हटले आहे, की नवीन पुरावा आढळल्यास शोधमोहीम पुन्हा सुरू शकते. अमेरिकी कंपनी ओश्यन इन्फिनिटीने २०१८मध्ये शेवटची शोधमोहीम राबवली. याच कंपनीने नवीन तंत्रज्ञानासह पुन्हा प्रस्ताव सादर केला आहे. पण त्यांच्याकडे पुरावा कोणता आहे, हे स्पष्ट झालेले नाही. 

हेही वाचा >>>मोदी सरकारने सुरू केलेली ADITI योजना काय? संरक्षण तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडवणार

गुडनाइट… मलेशियन थ्री सेव्हन झिरो!

क्वालालुंपूरहून मध्यरात्री १२ वाजून ४१ मिनिटांनी बोईंग-७७७ बनावटीच्या या विमानाने उड्डाण केल्यानंतर मलेशियाची हवाई सीमा ओलांडण्यापूर्वी वैमानिकाचे शेवटचे शब्द होते : गुडनाइट… मलेशियन थ्री सेव्हन झिरो! पण हे विमान  व्हिएतनामच्या हवाई हद्दीत आल्यानंतरही तसा संदेश हो चि मिन्ह विमानतळाला वैमानिकाकडून पाठवला गेला नाही. काही मिनिटांनीच म्हणजे स्थानिक वेळेनुसार मध्यरात्रीनंतर १ वाजून २१ मिनिटांनी विमानातील दूरसादक (ट्रान्सपॉण्डर) बंद पडला. या टापूतील लष्करी रडारने पहाटे २ वाजून १४ मिनिटांच्या सुमारास, विमान वळून अंदमान समुद्राकडे निघाल्याचे टिपले. त्याही रडारवरून विमान दिसेनासे झाले. पण उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार विमान त्यानंतरही जवळपास सहा तास उडत होते. हा काही विमानाचा ठरलेला मार्ग नव्हता. मग ते वळले कशासाठी? अंदमान समुद्रावरून सरळ उडत गेले असते, तर ते भारताकडे आले असते. तसे घडले नाही. त्याऐवजी ते दक्षिणेकडे वळले आणि हिंद महासागराच्या ऑस्ट्रेलियन टापूत आले. तेथे बहुधा इंधन संपल्यामुळे ते कोसळले असावे. या विमानातील संपर्कयंत्रणा निकामी करून ते उडवले गेले असावे, असा अंदाज मलेशियाच्या तपासयंत्रणांनी व्यक्त केला. अपहरण, विमानातील प्राणवायू अचानक संपणे, वीज बिघाड अशा अनेक शक्यता मांडल्या गेल्या. पण अपहरण होते, तर त्यासंबंधी काही मागणी वा खंडणी सादर झाली नाही. तांत्रिक बिघाड होता, तर कोणत्याही स्वरूपाचा संपर्क झाला नाही. हवामानाचा कोणताही अडथळा नोंदवला गेला नाही. मग विमान असे निरुद्देश कुठेतरी भरकटले कसे आणि का? हिंद महासागराच्या दक्षिणेला कुठेतरी कोसळून विमान लुप्त झाले. त्याबरोबर एक रहस्यही जन्माला आले! मलेशियाच्या तपासयंत्रणांनी २०१८मध्ये विमानतील सर्वांना ‘क्लीन चीट’ दिली, पण विमानाच्या परिचालनात बेकायदा हस्तक्षेपाची शक्यता फेटाळली नाही.

हेही वाचा >>>इस्रायलच्या शेतात केरळच्या व्यक्तीची हत्या; भारतीय तिथे काय करीत आहेत?

प्रवाशांमध्ये कोण-कोण?

२२७ प्रवाशांमध्ये पाच भारतीयांचा समावेश होता. मुंबईतील विनोद कोळेकर, चेतना कोळेकर हे जोडपे आणि त्यांचा मुलगा स्वानंद कोळेकर हे कुटुंब या विमानात होते. कोळेकरांचा दुसरा मुलगा संवेद या दीक्षान्त समारंभासाठी ते बीजिंगला निघाले होते. याशिवाय पुण्यातील क्रांती शिरसाट यादेखील विमानात होत्या. क्रांती यांचे पती उत्तर कोरियामध्ये एका स्वयंसेवी संघटनेसाठी काम करत होते. त्यांना भेटण्यासाठी क्रांती निघाल्या होत्या. चेन्नईस्थित व्यवस्थापन सल्लागार के. एस. नरेंद्रन यांच्या पत्नी चंद्रिका शर्मा या पाचव्या भारतीय प्रवासी होत्या. त्या मंगोलियात काही कामानिमित्त निघाल्या होत्या. 

इतर बहुतेक प्रवासी चीनचे होते. पण अमेरिका, इंडोनेशिया, फ्रान्स आणि रशियन प्रवासीही होते. दोन इराणी प्रवासी चोरीच्या पासपोर्टवर प्रवास करत होते. अमेरिकेतील एका टेक्नॉलॉजी कंपनीचे २० कर्मचारी होते. जेट ली या अभिनेत्याचा स्टंट-डबल, तसेच एक मलेशियन हनिमून जोडपे होते. 

शोधमोहिमा कशा प्रकारे झाल्या?  

विमान लुप्त झाल्यानंतर लगेचच डझनभर देशांच्या शोधपथकांनी काम सुरू केले. मलेशिया आणि व्हिएतनाम यांच्या दरम्यान दक्षिण चीन समुद्र, अंदमान समुद्र, ऑस्ट्रेलियाजवळ हिंद महासागर अशा विशाल भागात शोध सुरू झाला. आजवरची ही सर्वांत मोठी आणि महागडी सागरशोध मोहीम ठरली. विमाने, नौका, पाणबुड्या, हेलिकॉप्टर यांनी जवळपास १ लाख २० हजार किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. २०१५मध्ये पश्चिम हिंद महासागरात फ्रान्सच्या रियुनियन बेटाजवळ या विमानाचा एक तुकडा वाहत आला. यातून हे विमान हिंद महासागरातच कोसळले असावे हे निश्चित झाले. आणखी काही तुकडे पार आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ आढळले. परंतु बाकी काहीही सापडले नाही. जानेवारी २०१७मध्ये मोहीम आवरती घेण्यात आली. नंतर जानेवारी २०१८मध्ये अमेरिकी कंपनी ओश्यन इन्फिनिटीने ती पुन्हा सुरू केली, पण तीदेखील निष्फळ ठरली. 

हेही वाचा >>>विश्लेषण : चीनच्या जिवावर मुईझ्झू उदार? भारताने मालदीवचा नाद सोडावा का?

शोधमोहिमा निष्फळ का ठरल्या?

नेमके शोधायचे कुठे हेच निश्चित होऊ न शकल्यामुळे शोधमोहिमांची आखणी अतिशय गुंतागुंतीची, खर्चिक आणि खडतर ठरू लागली. हिंद महासागर हा जगातला तिसरा विशाल महासागर आहे. येथे अनेक भागांमध्ये हवामान प्रतिकूल असते. सरासरी खोली चार किलोमीटर इतकी प्रचंड आहे. 

पुढे काय?

विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी शोधमोहिमा सुरू ठेवण्याविषयी मलेशियाच्या सरकारवर अनेकदा दबाव आणला. मात्र, पुरावा आणि फलनिष्पत्तीची खात्री असेल तरच यापुढे मोहिमा राबवण्याचा निर्णय मलेशियाच्या सरकारने घेतला. त्यावरून प्रचंड असंतोष आहे. या रहस्याचा उलगडा पुढील दुर्घटना टाळण्यासाठी तरी झाला पाहिजे, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक संघटनेने या दुर्घटनेची गंभीर दखल घेत २०२५पासून प्रत्येक विमानात स्थाननिश्चिती उपकरण बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे उपकरण स्वयंचलित असून, मानवी प्रयत्नांनी बंद करता येणार नाही. मात्र ही योजना नवीन विमानांबाबत आहे. जुनी विमाने या उपकरणाशिवायच उडत राहतील. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the mystery of the missing malaysia flight mh370 print exp amy
Show comments