आरोग्य विमा दावे प्रक्रिया अधिक जलद गतीने करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी नॅशनल हेल्थ क्लेम्स एक्स्चेंज (एनएचसीएक्स) म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य दावे मंच कार्यान्वित झाला आहे. सध्याच्या डिजिटल युगाचा विचार करून विमा दावे प्रक्रियाही या माध्यमातून डिजिटल झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाशी भागीदारीतून हा मंच विकसित केला आहे. या मंचामुळे आरोग्य विमा क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार असून, त्यातील प्रभावीपणा, पारदर्शकता वाढून गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनएचसीएक्स काम कसे करतो?

एनएचसीएक्स हा एक-खिडकी डिजिटल मंच आहे. आरोग्य विम्या दाव्याच्या माहितीची देवाणघेवाण अतिशय सुरक्षितरीत्या आणि प्रभावीपणे या मंचाच्या माध्यमातून होते. विमा कंपन्यांची यंत्रणा आणि आरोग्यसुविधा क्षेत्र यातील तंत्रज्ञानाचा दुवा हा मंच आहे. यात रुग्णाच्या विम्यासह त्याच्या आरोग्याशी निगडित अचूक तपशील असतात. त्या आधारे दाव्याचे मूल्यमापन करणे विमा कंपन्यांना सोपे जाते. विदेवरील प्रक्रिया ही सर्व कंपन्या आणि आरोग्यसुविधा यांच्या यंत्रणांशी सुसंगत असते. त्यामुळे त्यातील चुका टाळल्या जातात. या मंचाच्या माध्यमातून रुग्णालये आणि रुग्ण दावा मंजुरीची प्रक्रिया प्रत्येक टप्प्यावर तपासू शकतात.

हेही वाचा >>>विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?

आधीची पद्धत कोणती?

रुग्णालये रुग्णाला सोडताना दावा अर्ज, कागदपत्रे विमा कंपनीच्या संकेतस्थळावर अपलोड करून त्यास मंजुरी मागतात. कंपनीकडून हा अर्ज आणि कागदपत्रांची तपासणी होते. त्यानंतर कंपनी मंजूर झालेला अर्ज रुग्णालयाला पाठविते. त्यानंतर रुग्णाला घरी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. प्रत्येक विमा कंपनीचे संकेतस्थळ वेगवेगळे असल्याने त्यात अनियमितता आणि गोंधळ होत होता. याचबरोबर रुग्णालयालाही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी अतिरिक्त प्रशासकीय मनुष्यबळ नियुक्त करावे लागते. या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप जास्त असल्याने त्यात चुका होण्याचा शक्यताही अधिक असते.

आता काय फरक?

विमा दावे मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया आता मंचाच्या माध्यमातून स्वयंचलित आणि डिजिटल झाली आहे. आता सर्वप्रथम रुग्णालयाकडून रुग्णाच्या उपचार खर्चाचे देयक त्यांच्या यंत्रणेत तयार होते. त्यानंतर रुग्णालयाकडून हे देयक त्रयस्थ संस्था प्रशासकांच्या (टीपीए) उपयोजनावर पाठविले जाते. त्यानंतर हे देयक विमा कंपनीच्या आरोग्य दावा यंत्रणेत जाते. त्यानंतर दाव्यास मंजुरी दिली जाते. रुग्णाच्या कागदपत्रांची छाननी डिजिटल पद्धतीने होत असल्याने ही संपूर्ण प्रक्रिया कमी वेळेत पूर्ण होते.

प्रतीक्षा कालावधी कमी?

रुग्णालये आणि विमा कंपन्या या मंचावर माहितीची देवाणघेवाण करतात. मंचाच्या माध्यमातून एक मध्यवर्ती यंत्रणा यासाठी निर्माण झाली आहे. त्यातून दावे मंजूर होण्याची प्रक्रिया सुटसुटीत होऊन प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे. याचबरोबर अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची आणि वारंवार पाठपुरावा करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. या संपूर्ण प्रक्रियेमुळे रुग्णालयांवरील प्रशासकीय ताण कमी होत असून, रोखविरहित दावे अधिक जलद होत आहेत. सध्या मंजुरी मिळाल्यानंतर रोखविरहित दाव्यावर तीन तासांत प्रक्रिया होते. हा कालावधी आता कमी होत आहे.

हेही वाचा >>>पिझ्झा, केक आणि शीतपेयाच्या जाहिरातींवर बंदी; ‘या’ देशाने केली कारवाई, कारण काय?

विमा हप्ता कमी होणार?

एनएचसीएक्स मंचामुळे रुग्णालये आणि विमा कंपन्या यांच्या खर्चात बचत होणार आहे. विमा दाव्यांसाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ कमी होणार आहे. विमा दावे, प्रक्रिया आणि मंजुरी या तिन्ही टप्प्यांत कमीतकमी मनुष्यबळ लागणार आहे. याचबरोबर यासाठीची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा खर्च कंपनीला करावा लागणार नाही. याचबरोबर विमा दाव्यांतील गैरप्रकार कमी होणार आहेत. यामुळे विमा कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे. यातून विमा हप्ता काही प्रमाणात भविष्यात कमी होऊ शकतो, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. यामुळे अनेक कंपन्या मंचात सहभागी होत आहेत.

सर्वांनाच फायदा होणार?

आरोग्य विमा दाव्याची प्रक्रिया पारदर्शी होणार असल्याने विमाधारक अधिक बारकाईने यावर लक्ष ठेवू शकेल. याचबरोबर त्यांचे दाव्यांवर अधिक नियंत्रण राहील. एनएचसीएक्स मंचामुळे स्वयंचलित प्रक्रियेसोबत प्रमाणीकरण होणार असल्याने विमा कंपन्यांच्या कार्यपालन खर्चातही बचत होणार आहे. त्यातून या कंपन्या अधिक चांगली सेवा ग्राहकांना देऊ शकतील. आगामी काळात सर्व नागरिकांसाठी आभा क्रमांकाचा वापर केला जाणार आहे. या क्रमांकाच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास उपलब्ध असेल. रुग्णांवरील उपचारांमध्ये हे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्वांसाठी २०४७ पर्यंत विमा असे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे लक्ष्य आहे. हे लक्ष गाठण्याच्या दिशेने एनएचसीएक्स मंच हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the national health claim exchange health insurance print exp amy