ज्ञानेश भुरे

जगात सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वाधिक खेळला जाणारा फुटबॉल सातत्याने कात टाकत आहे. आता ‘ऑफ साइड’बाबत एक वेगळा नियम प्रस्तावित करण्यात आला आहे. शिखर संघटना ‘फिफा’ आगामी हंगामात स्वीडन आणि इटलीमधील स्पर्धेत हा नियम प्रायोगिक तत्त्वावर राबवणार आहे. काय आहे हा नेमका नवा नियम बघूयात….

नवा नियम प्रस्तावित करणारे आर्सेन वेंगर कोण आहेत ?

फ्रान्सने जे काही गुणी फुटबॉलपटू आणि पुढे प्रशिक्षक फुटबॉल विश्वाला दिले त्यापैकी आवर्जून उल्लेख करावा असे आर्सेन वेंगर… बचावपटू म्हणून त्यांनी खेळायला सुरुवात केली. पण, खेळाडूपेक्षा व्यवस्थापक म्हणूनच ते सर्वाधिक यशस्वी ठरले. इंग्लिश प्रीमियर लीगमधील आर्सेनल संघाचे सर्वाधिक काळ व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले. आर्सेनलच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. वेंगर १९९६ ते २०१८ असे सर्वाधिक काळ आर्सेनलचे व्यवस्थापक होते. आता वेंगर ‘फिफा’च्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल विकास समितीचे प्रमुख आहेत. वेंगर यांनी ६० मिनिटांचे सामने आणि दर दोन वर्षांनी विश्वचषक स्पर्धा असे वेगळे प्रस्ताव यापूर्वी मांडले होते. मात्र, त्यात ‘फिफा’ने फारसा रस दाखवला नाही. मात्र, त्यांनी दिलेला ‘ऑफ साइड’मधील बदलाचा प्रस्ताव संघटनेने मनावर घेतला आहे.

ऑफ साइडचा प्रचलित नियम काय आहे?

आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना मंडळाच्या (आयएफएबी) नियम क्रमांक ११.१ अ नुसार जेव्हा खेळाडूंचे डोके, शरीर किंवा पाय यांचा कोणताही भाग गोल पोस्टच्या सर्वात जवळच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या पुढे असेल, तर खेळाडू ‘ऑफ साइड’ ठरवला जातो. नियम ११.१ ब नुसार जेव्हा खेळाडूचे डोके, शरीर किंवा पाय यापैकी कुठलाही भाग बॉल आणि प्रतिस्पर्धी संघाच्या अखेरच्या बचावपटूच्या (गोलरक्षक वगळून) जवळ असतात तेव्हा खेळाडू ऑफ साइड ठरवला जातो.

‘ऑफ साइड’ नियमातील प्रस्तावित बदल काय?

फुटबॉल सामन्यावर परिणाम करणारा ‘ऑफ साइड’चा हा महत्त्वपूर्ण नियम आहे. अनेकदा या नियमावरून वाद उद्भवतात. ‘ऑफ साइड’च्या प्रचलित नियमांचा अभ्यास करून वेंगर यांनी ‘फिफा’ला काही बदल सुचविले आहेत. नव्या नियमानुसार जेव्हा खेळाडूचे संपूर्ण शरीर अखेरच्या बचावपटूच्या पुढे असेल, तेव्हाच तो खेळाडू ‘ऑफ साइड’ ठरवला जाईल.

नियम बदलण्याची आवश्यकता का वाटते?

‘ऑफ साइड’चा निर्णय नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. यावर तोडगा म्हणून २०१८ मध्ये तिसऱ्या पंचाची (वार) मदत घेतली जाऊ लागली. यामध्ये मैदानावरील विविध कॅमेऱ्यांमधून तो क्षण तपासला जातो. सुरुवातीला ही पद्धत पंचांना मदत करणारी वाटली. पण, या प्रणालीच्या अचूकतेबाबत शंका घेण्यात येऊ लागल्या. अनेक निर्णयांत विरोधाभासी घटना घडल्याचे निदर्शनास येऊ लागले. २०१९ मध्ये लिव्हरपूलच्या रबर्टो फिर्मिनोचा ॲस्टन व्हिलाविरुद्धचा गोल केवळ त्याचा हात पुढे असल्याने नाकारण्यात आला. पुढे २०२१ मध्ये पंच प्रमुख माईक रिले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही समस्या टाळण्यासाठी जाड रेषा वापरण्यावर सहमती दर्शवली. २०२२ कतार विश्वचषक स्पर्धेत मैदानातील कॅमेऱ्यांबरोबर ‘हॉक आय’ या अत्याधुनिक तंत्राचा यासाठी वापर करण्यात आला. यासाठी फुटबॉलमध्ये एक सेन्सर बसवून त्यातून माहिती संकलित करून निर्णय दिला जाऊ लागला. ‘ऑफ साइड’चा निर्णय घेण्यासाठी पंचांना विविध कोनांतून रिप्ले बघण्याची गरज उरली नाही. या अत्याधुनिक तंत्राचा वापर केल्यानंतरही काही उणिवा पुढे आल्या. विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लॉटोरो मार्टिनेझचा गोल वादग्रस्तरीत्या नाकारला गेला. त्यामुळे गट साखळीत अर्जेंटिनाला सौदी अरेबियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. तंत्राने मार्टिनेझचा खांदा आणि एक बाजू पुढे असल्याचे दाखवले. पण, जवळून निरीक्षण केले असता शरीराची एक बाजू खूप दूर असल्याचे दिसून आले. या सगळ्याचा विचार करून नियम अधिक सुसंगत करण्यासाठी वेंगरच्या नव्या नियमाची चाचणी घेण्याचे ठरले.

बदलाच्या अंमलबजावणीचे ‘फिफा’चे नियोजन काय?

‘ऑफ साइड’ ही अशी एक संकल्पना आहे की ज्यामुळे गोल करण्याच्या आनंदावर एका झटक्यात विरजण पडते. हा नियम सोडला तर अन्य नियमांत चुकीच्या निर्णयाचे प्रमाण खूप कमी आहे. वेंगर यांनी सुचविलेल्या बदलामुळे खांदा किंवा पायाच्या पुढील भागाने (चवड्याने) गोल झाल्यास तो नाकारला जाणार नाही. विशेष म्हणजे ‘फिफा’चे अध्यक्ष इन्फॅनटिनो यांनी वेंगर यांचा ऑफ साइड नियमातील बदलाचा प्रस्ताव उचलून धरला आहे. इन्फॅनटिनो स्वतः यामध्ये लक्ष घालत आहेत. ‘फिफा’ला फुटबॉल अधिक आक्रमक व्हायला हवा आहे. आतापर्यंत फुटबॉलच्या १३५ वर्षांच्या इतिहासात ‘ऑफ साइड’ नियमात केवळ दोनदा बदल झाले आहेत. आता पुन्हा एकदा बदल करण्याचा प्रस्ताव आला आहे. ‘फिफा’ने संबंधित व्यक्ती आणि संघांशी याबाबत चर्चा केली असून, पुढील आठवड्यात इटली आणि स्वीडनमध्ये होणाऱ्या स्पर्धेत याची चाचणी घेतली जाणार आहे.