सध्याच्या धकाधकीच्या जीवनात गर्भधारणा टाळण्याचे प्रमाण वाढले आहे. महिलांची नोकरी आणि जबाबदारी, होणाऱ्या मुलाचे योग्य संगोपन आदी बाबींचा विचार करूनच लोक मुलाला जन्माला कधी घालायचे याचा निर्णय घेतात. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी महिला गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात. गर्भधारणा टाळण्यापलीकडे या गोळ्यांचे दररोज सेवन केल्यास, त्यांचा शरीरातील हार्मोन्सची पातळी बदलण्यापासून ते विविध अवयव प्रणालींवर परिणाम होऊ शकतो. सध्या एका नवीन गर्भनिरोधक इंजेक्शनची चर्चा होत आहे. हे इंजेक्शन दीर्घकाळापर्यंत गर्भधारणा टाळू शकते, असे ही लस विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांचा दावा आहे. काय आहे डीआयवाय इंजेक्शन? हे इंजेक्शन किती प्रभावी? खरंच यामुळे महिलांना गर्भधारणेपासून दीर्घकालीन संरक्षण मिळू शकते का? त्याविषयी जाणून घेऊ.

गर्भनिरोधक इंजेक्शनची गरज का?

आपल्या देशात गर्भधारणा टाळण्यासाठी प्रामुख्याने कंडोम, कॉपर-टी, गर्भनिरोधक गोळ्या या तीन पद्धतींचा वापर केला जातो. अन्य काही पद्धतींचादेखील वापर केला जातो; परंतु त्या पद्धती इतक्या प्रचलित नाहीत. त्यापैकी एक पद्धत म्हणजे गर्भनिरोधक इंजेक्शन. गर्भनिरोधक इंजेक्शनचा परिणामदेखील अधिकाधिक तीन महिन्यांपर्यंत होऊ शकतो. मात्र आता गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांची दररोज गोळ्या घेण्याची किंवा शरीरासाठी घातक अशा इतर प्रक्रिया करण्याची गरज संपणार आहे.

नवीन डीआयवाय इंजेक्शन लवकरच महिलांना गर्भधारणेपासून दीर्घकालीन संरक्षण देऊ शकणार असल्याची माहिती आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)च्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेली ही लस गर्भनिरोधकात बदल घडवून आणू शकते. अनेकांना दररोज गोळी घेणे किंवा गर्भनिरोधक रोपण करणे व्यावहारिक नसू शकते किंवा ते महागडे असू शकते. अशा लोकांसाठी हे इंजेक्शन अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांचे सांगणे आहे.

नेचर केमिकल इंजिनियरिंगमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाचे सह-लेखक डॉ. जियोव्हानी ट्रॅव्हर्सो यांनी या लसीच्या विकासाचे महत्त्व स्पष्ट केले. त्याचा संभाव्य परिणाम लक्षात घेत, हे गर्भनिरोधक तयार करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे हे इंजेक्शन स्वतः घेणे शक्य असणार आहे. त्यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नसेल. हे इंजेक्शन कसे कार्य करते, ते जाणून घेऊ.

डीआयवाय इंजेक्शन कसे कार्य करते?

गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये सूक्ष्म क्रिस्टल्स असतात. हे क्रिस्टल्स त्वचेखाली एकत्र येतात; ज्यामुळे एक रचना तयार होते जी हळूहळू हार्मोन्स सोडते आणि महिलांना गर्भधारणेसाठी अंडी सोडण्यापासून रोखते. मास जनरल ब्रिघम व एमआयटीच्या संशोधकांचा असा विश्वास आहे की, पोटात इंजेक्शन दिल्यावर ते फॉर्म्युलेशन समायोजनांवर अवलंबून असते, जे दीर्घकाळापर्यंत म्हणजे कदाचित महिने किंवा अगदी काही वर्षे गर्भधारणेपासून महिलांना संरक्षण देऊ शकते.

सध्या गर्भनिरोधक इम्प्लांट दीर्घकालीन संरक्षण प्रदान करतात; परंतु त्यांना शस्त्रक्रियेने बसवण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तीची आवश्यकता असते. दुसरीकडे गर्भनिरोधक इंजेक्शन देणे सोपे आहे; परंतु त्याचा परिणाम केवळ तीन महिने टिकू शकतो. ही नवीन स्वयं-इंजेक्शन पद्धत दोन्हीचे फायदे एकत्रित करण्याचा शास्त्रज्ञांचा उद्देश आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेची आवश्यकताही पडत नाही आणि दीर्घकालीन संरक्षणदेखील प्रदान करते.

“आमच्या विशिष्ट प्रकल्पात दीर्घकाळ चालणाऱ्या इम्प्लांटचे फायदे आणि स्वयं-प्रशासित इंजेक्शनचे फायदे एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे”, असे अभ्यासाचे सह-लेखक आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मेकॅनिकल इंजिनियरिंगचे सहायक प्राध्यापक विवियन फिग यांनी ‘न्यूज मेडिकल’च्या एका अहवालात स्पष्ट केले. फिग पुढे म्हणाले, “या लसीच्या इंजेक्शनची (जॅबची) अद्याप मानवांवर चाचणी झालेली नसली तरी शास्त्रज्ञ त्याच्या क्षमतेबद्दल आशावादी आहेत.”

त्यांचा असा विश्वास आहे की, इतर पर्याय नसलेल्या व्यक्तींसाठी हे इंजेक्शन गेम चेंजर ठरू शकते. कारण- आजही अनेक भागांत दररोज गर्भनिरोधक गोळ्या किंवा वैद्यकीय शस्त्रक्रिया हा पर्याय नसू शकतो. “आम्हाला असा अंदाज आहे की, SLIM (इंजेक्शन) महिलांसाठी उपलब्ध असलेल्या कुटुंब नियोजन पर्यायांच्या सध्याच्या संचात एक पर्याय ठरू शकते,” असे जियोव्हानी ट्रॅव्हर्सो म्हणाले.

आव्हाने कोणती?

ट्रॅव्हर्सो यांच्या मते, स्वयं-इंजेक्टेबल गर्भनिरोधक विकसित करण्यातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे ते घरी व्यक्तींना आरामात देता येईल याची खात्री करणे. “आमच्यासमोरील प्रमुख आव्हान म्हणजे लहान सुया वापरून रुग्णांना जास्तीत जास्त आराम देण्याचा मार्ग शोधणे. रुग्णांना कमी जखम किंवा रक्तस्राव व्हावा हा यामागचा आमचा हेतू असणार आहे,” असे ट्रॅव्हर्सो म्हणाले. गर्भनिरोधकाव्यतिरिक्त संशोधक हेदेखील शोधत आहेत की, डीआयवाय इंजेक्शन एचआयव्ही, क्षयरोग, स्किझोफ्रेनिया, दीर्घकालीन वेदना यांसारख्या इतर उपचारांसाठीदेखील फायद्याचे ठरू शकेल. मानवी चाचणीनंतर या इंजेक्शनचे परिणाम स्पष्ट होतील.

हे डीआयवाय इंजेक्शन कधीपर्यंत उपलब्ध होणार?

सुरुवातीच्या अचूक व आशादायी निकालांनंतर आता संशोधक मानवी चाचण्यांकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यांच्या पुढील चाचण्यांमध्ये त्वचेमध्ये स्वयं-असेंबलिंग क्रिस्टल्स किती चांगले कार्य करतात याचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांना आणखी सखोल अभ्यासाची आवश्यकता आहे. डोसिंग ऑप्टिमाइझ करून आणि शरीरात इंजेक्शन किती काळ प्रभावी राहू शकते हे ठरवून तंत्रज्ञान सुधारण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.