हमासचा दहशतवादी नेता याह्या सिनवार याची इस्रायली हत्या झाल्याचे १७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. इस्मायल हनिये या हमासच्या राजकीय नेत्याच्या हत्येनंतर सिनवारच हमासची सूत्रे चालवत होता. शिवाय गतवर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या काही भागांत झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार याह्या सिनवारच होता. त्याचा निःपात हा मुद्दा इस्रायली पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनी प्रतिष्ठेचा बनवला होता. पश्चिम आशियात इस्रायल-हमास संघर्षातील बडा मोहरा कामी आल्यामुळे आता युद्धविराम होण्याची शक्यता बळावली असल्याचे विश्लेषकांना वाटते.
कोण होता याह्या सिनवार?
याह्या सिनवार हा हमासच्या लष्करी आघाडीचा प्रमुख होता. पण हमासचा राजकीय नेता इस्मायल हनियेच्या हत्येनंतर म्हणजे ऑगस्टपासून तो हमासचा सर्वेसर्वा बनला होता. पॅलेस्टिनींच्या हितासाठी इस्रायलविरुद्ध वाटेल त्या थराला जाण्याची त्याची तयारी असायची. याह्याचा जन्म १९६२मध्ये गाझातील खान युनिसमध्ये एका गरीब कुटुंबात झाला. त्याच्या बालपणाविषयी फार तपशील उपलब्ध नाही, पण ते हलाखीत गेले असावे असे म्हटले जाते. पुढे याह्या गाझातील इस्लामी विद्यापीठात अरेबिक शिकला. लवकरच मूसतत्त्ववादी राजकारणाकडे ओढला गेला. १९८७मध्ये गाझा आणि पश्चिम किनारपट्टीतील इस्रायली अतिक्रमणाविरोधात पहिला पॅलेस्टिनी उठाव किंवा इन्तिफादा झाला. त्यात याह्या सिनवार सहभागी झाला होता. त्याच्यासह काही कडव्या पॅलेस्टिनी आंदोलकांनी हमास या अतिरेकी संघटनेची निर्मिती केली. इस्रायलचा सर्वनाश हे हमासचे उद्दिष्ट होते. त्यांना इस्रायलशी राजकीय वाटाघाटी करायच्या नव्हत्या. लवकरच याह्या इस्रायली आणि अमेरिकी सुरक्षा यंत्रणांमध्ये चर्चिला जाऊ लागला. त्याला दहशतवादी घोषित करण्यात आले. १९८८मध्ये चार पॅलेस्टिनींची याह्या आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इस्रायलचे खबरी असल्याच्या संशयावरून हत्या केली. त्याबद्दल इस्रायलने त्याला तुरुंगात डांबले.
इस्रायलचा ‘जवळून’ अभ्यास…
याह्या सिनवार २३ वर्षे इस्रायली तुरुंगात राहिला. त्या काळात आपल्याला इस्रायलींचा जवळून अभ्यास करता आला, असे तो नंंतर सांगत असे. तो हिब्रू शिकला. इस्रायलच्या इतिहासाचा त्याने सखोल अभ्यास केला. तुरुंगातील अनेक इस्रायली अधिकाऱ्यांशी त्याची मैत्री जमली. अशाच एका इस्रायली तुरुंग डॉक्टरमुळे त्याचे प्राण वाचले. २००४मध्ये त्याला ब्रेन ट्युमर झाल्याचे या डॉक्टरने निदर्शनास आणून दिले. त्याबद्दल या डॉक्टरचे ऋण याह्याने नंतर अनेकदा मानले. मात्र विचित्र विरोधाभास असा, की या डॉक्टरचा एक युवा नातेवाईक पुढे ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासकडून अपहृत झाला आणि पुढे तो मारला गेला. पुढे तुरुंगात याह्या प्रमुख मध्यस्थ म्हणून जबाबदारी सांभाळू लागला. २०११मध्ये इस्रायलच्या एका सैनिकाच्या सुटकेच्या बदल्यात याह्याने स्वतःसह हजारहून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका घडवून आणली. पण तो बाहेर आला, तेव्हा इस्रायलला धडा शिकवण्याचा इरादा पक्का झाला होता.
हमासमध्ये वाढता प्रभाव
२०१२मध्ये कासम ब्रिगेड्स या हमासच्या लष्करी आघाडीचा प्रतिनिधी म्हणून याह्या काम पाहू लागला. हमासच्या लष्करी सिद्धतेसाठी तो आणि लष्करी कमांडर मोहम्मद डेफ (हादेखील जुलैत गाझावर इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेला) यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली. पुढे २०१७मध्ये इस्मायल हनिये हा हमासचा नेता कतारला गेला आणि त्याने हमासच्या राजकीय आघाडीची जबाबदारी स्वीकारली. तेव्हा याह्या सिनवार हमासचा गाझातील नेता बनला. गाझामध्ये इजिप्त आणि इस्रायलने यांनी बाहेरून येणारी मदत रोखून धरली होती. त्यावेळी याह्याने वाटाघाटी करून ती अंशतः पुन्हा सुरू करवली. गाझा पट्टीतून इस्रायलमध्ये रोजगारासाठी पॅलेस्टिनी तरुणांना आवश्यक परवाने मिळवून देण्यासाठी त्याने इस्रायल सरकारशी वाटाघाटी केल्या. त्यामुळे गाझातील जनतेसाठी त्याचे महत्त्व खूपच वाढले. ‘मला माझ्या तरुणांसाठी रोजगार हवा आहे. आता युद्ध नको’ असे त्याने एकदा म्हटले होते.
हेही वाचा : ‘या’ भारतीय स्टार्टअप संस्थापकाने कर्मचाऱ्यांना केलं करोडपती, कसं केलं शक्य?
इस्रायलला बेसावध गाठले…
याह्या सिनवार मवाळ झाला असावा, अशी अटकळ त्याच्या काही वक्तव्यांमुळे इस्रायल सरकारने बांधली होती. प्रत्यक्षात तो इस्रायलवर न भूतो न भविष्यति स्वरूपाच्या हल्ल्याची तयारी करत होता. गाझा सीमेवर कोणत्या चौक्यांवर इस्रायली पहारा फार सक्त नसतो, हे त्याने हेरले. इस्रायलवर एकाच वेळी अनेक दिशांकडून हल्ले करण्यासाठी त्याने हेझबोलाचा नेता हसन नसरल्लाबरोबर चर्चा सुरू केली. इराणची मदत हमासला पुन्हा मिळावी, यासाठी त्याने इराणी नेत्यांशी संधान बांधले. इस्रायलवर मोजके पण विनाशकारी लष्करी हल्ले करून त्या देशाला जेरीस आणता येईल, असे याह्याला वाटत होते. त्याविषयी त्याचा आत्मविश्वास आणि अंदाज चुकीचा
असल्याची जाणीव त्याला हसन नसरल्लाने करून दिली. इस्रायलवर अशा प्रकारे हल्ले करण्याची नसरल्ला आणि हेझबोलाची तयारी नव्हती. पण अखेरीस याह्याच्या आग्रहापुढे नसरल्लाला नमते घ्यावे लागले. कुणाच्याही फारसे ध्यानीमनी नसताना, इस्रायली सरकार, हेर व सुरक्षा यंत्रणा यांना बेसावध गाठून हमासच्या लष्करी आघाडीने सीमेवरील इस्रायली लष्करी चौक्या, संगीत कार्यक्रमासाठी जमलेले तरुण-तरुणी, इतर सीमावर्ती भागातील वसाहती यांवर सुनियोजित हल्ले केले. जवळपास १२०० नागरिक व सुरक्षा रक्षकांना ठार केले आणि २५० नागरिकांचे अपहरण केले. इस्रायली भूमीवरील तो सर्वांत मोठा आणि विध्वंसक हल्ला ठरला.
याह्या सिनवारचा अंदाज चुकलाच…
पण याह्याचा इस्रायली प्रतिसादाबाबतचा अंदाज साफ चुकला. युद्धखोर नेतान्याहू यांनी पूर्ण ताकदीने गाझावर हल्ला चढवला. क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने आणि पायदळ व चिलखती दलाने मिळून गाझावर हल्ला चढवला. ही कारवाई आजतागायत सुरू आहे. यात ४२ हजारांहून अधिक सर्वसामान्य नागरिक ठार झाले. याह्याच्या दुःसाहसाची जबर किंमत अखेर पॅलेस्टिनींनाच चुकवावी लागली. याह्या स्वतः जवळपास वर्षभर भूमिगत बंकरमध्ये राहात होता. चिठ्ठ्या आणि निरोप्यांच्या माध्यमातून युद्धाची सूत्रे हलवत होता. अखेरीस अगदी योगायोगाने घडून आलेल्या कारवाईत अनपेक्षितरीत्या तो मारला गेला.
हेही वाचा : देशात औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील घसरण कशामुळे? ही मंदीची चाहूल मानावी का?
पुढे काय?
याह्या सिनवारच्या मृत्यूमुळे हमासकडे आता शीर्षस्थ असा नेताच उरलेला नाही. अनेक भागांमध्ये हमासचे सैनिक आणि बंडखोर लढत असले, तरी स्थानिक चकमकी असेच त्याचे स्वरूप आहे. याह्या सिनवारच्या मृत्यूची खबर मिळताच गाझातील अनेक पॅलेस्टिनींनी आनंद व्यक्त केला. कारण याह्याच्या दुःसाहसामुळेच आपल्यावर ही वेळ आली, असे त्यांचे ठाम मत आहे. नेतान्याहू यांनीदेखील हमासच्या निःपातानंतर युद्धविराम दृष्टिपथात आल्याचे सूचित केले आहे. त्यांनी हेझबोलाच्या नेत्यांनाही संपवले. लेबनॉनमधून प्रतिकार फारसा होत नाही. इराणनेही सध्या सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे गाझातर्फे कोणी वाटाघाटींसाठी पुढे आल्यास युद्धविरामाच्या दिशेने सकारात्मक पावले पडतील अशी चिन्हे आहेत.