ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंच्या वार्षिक कराराची पुनर्रचना करताना निवड समितीच्या प्रस्तावानुसार वेगवान गोलंदाजांना स्वतंत्रपणे करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कशासाठी घेण्यात आला आणि या करारानुसार निवडलेल्या गोलंदाजांची वेतनश्रेणी काय असेल, याविषयी.

वेगवान गोलंदाजांसाठी स्वतंत्र करार का?

क्रिकेटपटूंना करारबद्ध करून चार गटांत वेतन श्रेणी निश्चित करण्यास सुरुवात झाल्यापासून प्रथमच ‘बीसीसीआय’ने या वेळेस वेगवान गोलंदाजांना करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत भारतात एकाहून एक सरस फिरकी गोलंदाज तयार होत होते. अलीकडच्या काळात वेगवान गोलंदाजही मागे नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवान गोलंदाजांसमोर असलेली आव्हाने लक्षात घेऊन त्याचा सामना करण्याची तयारी असावी हा यामागील एक विचार असल्याचे मानले जात आहे. सध्या देशात असलेल्या वेगवान गोलंदाजांची गुणवत्ता आणि विशेष कौशल्य, तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे निवड समितीने मध्यवर्ती कराराबरोबर वेगवान गोलंदाजांना स्वतंत्रपणे करारबद्ध करण्याचा प्रस्ताव दिला आणि तो ‘बीसीसीआय’ने स्वीकारला.

हेही वाचा >>>विश्लेषण : दिल्लीत पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस का साजरा केला जातो? या दिवसाचा ‘लाहोर ठरावा’शी संबंध काय?

नव्या करारात किती वेगवान गोलंदाज?

वेगवान गोलंदाजांच्या पहिल्या कारारामध्ये कसोटी पदार्पण केलेला आकाश दीप, देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडणारे वैशाख विजयकुमार, विद्वत कावेरप्पा आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गवसलेला उमरान मलिक आणि यश दयाल अशा पाच गोलंदाजांचा समावेश आहे.

हेच पाच गोलंदाज का?

पाच गोलंदाजांमध्ये उमरान मलिक आणि यश दयाल यांची निवड आश्चर्यकारक मानली जात आहे. मलिकने दोन वर्षांपूर्वी ‘आयपीएल’मध्ये ताशी १५० कि.मी. वेगाने गोलंदाजी केली होती. पण, गेले वर्षभर तो भारतीय संघापासून दूर आहे. यंदाच्या रणजी हंगामातही त्याने पाच सामन्यातून केवळ चार गडी बाद केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १८ सामन्यात त्याने २४ गडी बाद केले आहेत. यश दयालची निवडही आश्चर्यकारक आहे. ‘आयपीएल’मधूनच याचा शोध झाला असला तरी गेल्याच स्पर्धेत रिंकू सिंहने त्याला सलग पाच षटकार मारले होते. विशेष म्हणजे आतापर्यंत २३ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ७२ गडी बाद केले आहेत. आकाश दीपने इंग्लंडविरुद्ध यशस्वी कसोटी पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे चौथ्या कसोटीत त्याने पहिल्या डावात तीन गडी बाद करीत सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच, बंगालकडून खेळताना त्याने ३१ प्रथम श्रेणी सामन्यांत १०७ गडी बाद केले. तसेच, तो तळाला फलंदाजी करण्यासही सक्षम आहे. विद्वत आणि वैशाख हे दोघेही गेली दोन वर्षे कर्नाटकाकडून रणजी स्पर्धेत कमालीच्या सातत्याने कामगिरी करत आहेत. यंदाच्या हंगामात वैशाखने आठ सामन्यातून ३९, तर विद्वतने पाच सामन्यातून २५ गडी बाद केले आहेत.

हेही वाचा >>>विश्लेषण : भारताच्या कृषी उत्पादनावरील अनुदानावर थायलंडने प्रश्नचिन्ह का उपस्थित केले? यावर भारत सरकारचं म्हणणं काय?

किती मानधन मिळणार?

सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केवळ या पाच गोलंदाजांना करारबद्ध केले आहे. विशेष म्हणजे नव्या पुनर्रचनेत ‘बीसीसीआय’ने वेतन निश्चिती केलेली नाही. त्यामुळे गोलंदाजांच्या वेतनाविषयीदेखील कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

गेल्या काही काळात कोणत्या वेगवान गोलंदाजांचा प्रभाव?

एकेकाळी फिरकीपटूंची मक्तेदारी असलेल्या भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही काळात चांगले वेगवान गोलंदाज मिळाले आहेत. यामध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज यांचा समावेश होतो. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाल्यानंतर भारताने सलग दोनदा अंतिम फेरी गाठली आहे. तसेच, ‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्येही भारतीय संघ बाद फेरीत पोहोचला आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीने भारताकडून सर्वाधिक गडी बाद केले. तसेच, सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही बुमरा व सिराज निर्णायक ठरताना दिसत आहे. वेगवान गोलंदाजांमुळेच भारतीय संघ विदेशात जाऊनही मालिका जिंकू शकला. अशाच गोलंदाजांना सहकार्य करण्यासाठी ‘बीसीसीआय’ वेगवान गोलंदाजांची दुसरी फळी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the reason behind bcci signing fast bowlers separately print exp amy