पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेत करोना संकटानंतर तेजीचे वारे आले. आता ही तेजी संपुष्टात येऊन नवीन घरांच्या विक्रीत सातत्याने घट होताना दिसून येत आहे. यातून एकंदरीत गृहनिर्माण बाजारपेठेला घरघर लागल्याचे चित्र आहे. विकासकांपासून ग्राहकापर्यंत सर्वच बाजारपेठेतील स्थितीबाबत फारसे आशावादी नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गृहनिर्माण बाजारपेठेतील घसरणीबाबत चिंता व्यक्त होत आहे. या निमित्ताने एकूणच गृहनिर्माण बाजारपेठेच्या सद्य:स्थितीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
घसरण नेमकी किती?
करोना संकटावेळी २०१९ मध्ये पुण्यातील नवीन घरांची वार्षिक विक्री ६० हजार होती. ती गेल्या वर्षी (२०२४) ९० हजारांवर गेली. गेल्या पाच वर्षांत घरांच्या विक्रीत ५० टक्के वाढ झालेली आहे. मात्र, पुण्यात यंदा जानेवारी ते मार्च तिमाहीत एकूण १६ हजार ५०० नवीन घरांची विक्री झाली. ही विक्री गेल्या वर्षी याच तिमाहीत २२ हजार ९९० होती. त्यात यंदा ३० टक्के घसरण झाली आहे. याच वेळी पुण्यातील नवीन घरांचा पुरवठा पहिल्या तिमाहीत १६ हजार ८६० आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १८ हजार ७७० होता. त्यात यंदा १० टक्के घट झाली आहे. विशेष म्हणजे, मध्यम व आलिशान घरांच्या (किंमत ४० लाख ते १.५ कोटी रुपये) पुरवठ्यात तब्बल ७९ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
नवीन प्रकल्पांना कशाचा अडसर?
गेल्या वर्षभरापासून नवीन पर्यावरण नियमांमुळे पिंपरी-चिंचवड आणि त्या भोवतालच्या भागातील मोठ्या गृहप्रकल्पांना मंजुरी मिळालेली नाही. पुणे परिसराचा विचार करता सध्या सर्वाधिक विकसित होत असलेला हा भाग आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ सरकारी अधिकाऱ्यांनी लावल्याने हे घडले. क्रेडाई, पुणेने याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व घडामोडींमुळे या भागातील मोठे, नवीन गृहप्रकल्प मंजूर झालेले नाहीत. पुण्याच्या एकूण गृहनिर्माण बाजारपेठेत या भागाचा वाटा ४५ टक्के आहे. त्यामुळे नवीन घरांचा पुरवठाही कमी झाला आहे. नवीन घरांचा पुरवठा कमी असल्याने ग्राहकांना खरेदीचे पुरेसे पर्याय सध्या उपलब्ध होत नाहीत. पुण्याचा विचार करता विक्री न झालेल्या घरांची संख्या नीचांकी आहे. याचबरोबर ७० लाख रुपयांवरील किमतीच्या घरांचे प्रकल्प वाढत आहेत आणि ७० लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांचे प्रकल्प कमी होत आहेत. त्यामुळे घरांच्या एकूण विक्रीत घट जास्त दिसत आहे, असे ‘क्रेडाई पुणे’चे माध्यम समन्वयक कपिल गांधी यांनी सांगितले.
ग्राहकांचा हात आखडता का?
गेल्या काही वर्षांत घरांच्या किमतीत सातत्याने वाढ सुरू आहे. लोखंडाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होऊनही विकासकांकडून घरांच्या किमती कमी करण्यात आलेल्या नाहीत. सध्या जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वारे आहे. त्यामुळे भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास अथवा घर खरेदी करण्यास ग्राहक धजावताना दिसत नाहीत. कारण खासगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेबाबत साशंक आहेत. अनेक कंपन्यांकडून कर्मचारी कपातीचे पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून घर खरेदी कमी झालेली दिसते. याचबरोबर व्याजदरात फारशी कपात न झाल्याने ते आकर्षक नाहीत. त्यामुळेही ग्राहक नवीन घरात गुंतवणूक करण्यास उत्सुक नाहीत, याकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणेचे अध्यक्ष विजय सागर यांनी लक्ष वेधले.
भांडवली बाजाराचा परिणाम?
घर खरेदी करणारे मध्यमवर्गीय ग्राहक मोठ्या प्रमाणात भांडवली बाजार, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात. या वर्गाकडून प्रामुख्याने ही गुंतवणूक घरखरेदीसाठी पैशांची बचत करण्याच्या उद्देशाने केली जाते. गेल्या दोन तिमाहीमध्ये भांडवली बाजारात घसरण सुरू आहे. त्यामुळे हे मध्यमवर्गीय गुंतवणूकदार सध्या तोट्यात आहेत. आपल्या गुंतवणुकीवरील परतावा पुन्हा पूर्वीच्या पातळीवर येण्याची प्रतीक्षा ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून घर खरेदी लांबणीवर टाकली जात आहे. भांडवली बाजारातील घसरणीचा हा परिणाम गृहनिर्माण बाजारपेठेवर झालेला दिसतो. याचबरोबर अनेक ग्राहक हे रिझर्व्ह बँकेकडून आणखी व्याजदर कपात होण्याची वाट पाहत आहेत. कारण सध्या हे दर उच्चांकी पातळीवर आहेत. आगामी काळात व्याजदरात कपात झाल्यास घरांना पुन्हा मागणी वाढेल, असे ‘नरेडको पुणे’चे अध्यक्ष भरत अगरवाल यांनी स्पष्ट केले.
sanjay.jadhav@expressindia.com