-अभय नरहर जोशी

‘स्मार्ट मोबाइल फोन’ ही आधुनिक युगातील मूलभूत गरज झाली आहे. बहुसंख्यांना ‘स्मार्टफोन’ हे जणू सहावे ज्ञानेंद्रियच वाटते. जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला हा ‘स्मार्टफोन’ मुलांना नेमका कोणत्या वयात वापरण्यास द्यावा, याबद्दल जगभरात द्विधावस्था आहे. पालकांसाठी हा ‘यक्षप्रश्न’ आहे. काहींना हा ‘स्मार्ट फोन’ अभिशाप देणारा ‘पँडोरा बॉक्स’ वाटतो, तर काहींना विविध इच्छापूर्ती करणारा ‘अल्लाउद्दिनचा दिवा’! बालवयात हा ‘स्मार्ट फोन’ वापरायला मिळणे शाप की वरदान?, यावर युरोप व अमेरिकेतील तज्ज्ञांनी अभ्यासांतून निरीक्षणे नोंदवली आहेत, त्याविषयी…

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? इर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून…
**Why does the Earth appear flat despite being round?**
Why Earth Looks Flat:पृथ्वी गोल असूनही ती सपाट कशामुळे दिसते?
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
Tandoori chicken
Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?

अभ्यासात कोणते निष्कर्ष निघाले?

लहान व किशोरवयीन मुलांवर ‘स्मार्ट फोन’ व समाजमाध्यमांच्या दीर्घकालीन दुष्परिणामांविषयी अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या अभ्यासात ‘स्मार्ट फोन’ वापरातील जोखीम व लाभाच्या बाबी शोधल्या गेल्या आहेत. मात्र, मुलांसाठी समाजमाध्यमे व ‘स्मार्ट फोन’चा वापर हा हानिकारकच असतो, असे सरसकट निष्कर्ष काढण्यायोग्य व्यापक पुरावे या अभ्यासात सापडले नाहीत. बहुतांंश अभ्यासाचा भर हा लहान मुलांऐवजी पौगंडावस्थेतील मुला-मुलींवर होता. त्यातील निष्कर्षांनुसार या वयोगटात काही विकासात्मक टप्प्यांवर मुलांवर याच्या नकारात्मक परिणामांची शक्यता असते. मुले ‘स्मार्ट फोन’ वापरण्यायोग्य झाली आहेत किंवा नाही व फोन मिळाल्यानंतर त्यांनी काय करावे, याबाबत काही कळीच्या मुद्द्यांबाबत तज्ज्ञांचे एकमत आहे.

आकडेवारी काय सांगते?

ब्रिटनमधील संपर्कक्षेत्राची नियंत्रक संस्था ‘ऑफ्कॉम’च्या आकडेवारीनुसार ब्रिटनमध्ये ९ ते ११ वर्षे वयापासून ‘स्मार्ट फोन’ वापरणाऱ्या मुलांचे प्रमाण ४४ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांवर पोहोचले आहे. अमेरिकेत ९ ते ११ वयोगटातील मुलांच्या ३७ टक्के पालकांनी त्यांच्या मुलांकडे स्वत:चा स्मार्ट मोबाइल फोन असल्याचे सांगितले. युरोपातील १९ देशांत ९ ते १६ वर्षे वयोगटातील ८० टक्के मुले ‘स्मार्टफोन’ वापरतात व जवळपास दररोज ‘ऑनलाइन’ असतात. वय जसजसे वाढत जाते, तसतसे ९० टक्के मुले ‘स्मार्टफोन’ वापरू लागतात. युरोपातील अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार जन्मापासून आठ वर्षे वयोगटातील मुलांत ‘ऑनलाईन’ जोखमींबद्दल समज नसते. ‘स्मार्ट फोन’द्वारे वापरल्या जाणाऱ्या समाजमाध्यमांमुळे मोठ्या गटातील मुलांवर नेमके कोणते दुष्परिणाम होतात, याबाबत ठोस पुरावे मिळाले नाहीत. दीर्घकालीन प्रभाव समजून घेण्यासाठी ‘स्मार्ट फोन’ हे अजूनही तुलनेने नवीन तंत्रज्ञान आहे. मात्र, या अभ्यासातील ताज्या निष्कर्षांमुळे विविध वयोगटांवरील त्याच्या प्रभावाचे महत्त्वाचे पैलू उघड होत आहेत.

मानसिक स्वास्थ्याशी संबंध आहे का?

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या मानसशास्त्राच्या प्राध्यापिका कँडिस ओजर्स यांनी मुलांच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बाल किंवा किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याच्या संबंधाबाबतच्या अभ्यासांचे विश्लेषण केले. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर व मुलांच्या मानसिक स्वास्थ्याचा थेट संबंध त्यांना आढळला नाही. ‘स्मार्ट फोन’ अथवा समाजमाध्यमांच्या वापराने होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल असलेला सार्वत्रिक गैरसमज आणि या विश्लेषणाच्या निष्कर्षात तफावत आढळल्याचे ओजर्स यांनी सांगितले. बहुतेक अभ्यासांत समाजमाध्यमे व मानसिक आरोग्याचा थेट संबंध आढळला नाही. त्याचे सकारात्मक-नकारात्मक परिणाम अत्यल्प दिसले. केंब्रिज विद्यापीठाच्या प्रयोगशील मानसशास्त्रज्ञ ॲमी ओर्बेन यांनीही याला दुजोरा देताना नमूद केले, की नकारात्मक परिणाम फारच कमी दिसले. ‘स्मार्टफोन’ व समाजमाध्यमांच्या वापरामुळे स्वास्थ्य हरपते की या दोहोंना प्रभावित करणारे अन्य घटक आहेत, हे स्पष्ट होऊ शकले नाही. ठोस निष्कर्ष निघू शकले नाहीत.

‘जगाच्या खिडकी’चे फायदेही आहेत का?

अनेक मुले-तरुणांसाठी ‘स्मार्ट फोन’ म्हणजे जणू जीवनरेखा झाली आहे. तर अपंगांसाठी ‘स्मार्ट फोन’ ही जगाची खिडकी झाली आहे. समाजमाध्यमांद्वारे जोडले गेल्याने मुख्य प्रवाहात असल्याची भावना निर्माण होते. आपल्या आरोग्याच्या प्रश्नांची काही प्रमाणात उत्तरे त्याद्वारे मिळतात. ओजर्स यांच्या मते मुले ‘स्मार्ट फोन’चा वापर आपल्या मित्रांसह कुटुंबियांशी सातत्याने संपर्कासाठीच करतात. आपले मूल ‘स्मार्ट फोन’च्या भूलभुलैयात हरवून एकलकोंंडे होऊन आपल्या हाताबाहेर जाईल, ही जोखीम काही मुलांबाबतीत शक्य आहे. परंतु बहुसंख्य मुले ‘स्मार्ट फोन’मुळे प्रियजन, आप्तांच्या संपर्कात राहतात. आपले अनुभव परस्परांना वाटून (शेअरिंग) ते सह-अनुभूतीचा आनंद घेऊ शकतात.

‘स्मार्ट फोन’ने आत्मविश्वास वाढतो का?

‘स्मार्ट फोन’च्या वापरामुळे मुले घराबाहेर पडत नाहीत, असा आक्षेप असतो. मात्र, डेन्मार्कमध्ये ११ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या अभ्यासात असे दिसले, की ‘स्मार्ट फोन’मुळे मुले बाहेर आत्मविश्वासाने वावरू शकतात. अनोळखी ठिकाणी वाटाड्या म्हणून ‘स्मार्ट फोन’चा त्यांना मोठा उपयोग होतो. त्यामुळे पालकही आपले मूल सुरक्षित असल्याचे समजल्याने निर्धास्त राहू शकतात. या अभ्यासात अनेक मुलांनी सांगितले, की ‘स्मार्ट फोन’च्या साहाय्याने संगीत ऐकत बाहेर फिरताना आनंद अधिक द्विगुणित होतो, तसेच पालक व मित्रांच्या संपर्कात राहता येते. अर्थात, समवयस्कांशी सतत संपर्कात राहण्यात जोखीमही असतेच. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनाॉमिक्स’च्या सामाजिक मानसशास्त्राच्या प्राध्यापिका व ‘पेरेंटिंग फॉर डिजिटल फ्युचर’च्या लेखिका सोनिया लिव्हिंग्स्टन यांनी सांगितले, की तरुणांच्या अपुऱ्या राहणाऱ्या गरजांची पूर्तता ‘स्मार्ट फोन’मुळे होते. मात्र, समाजमाध्यमांवर फारच यशस्वी व लोकप्रिय लोक आहेत व आपण त्यांच्या तुलनेने खूप मागे असल्याचा न्यूनगंड वाटून काही जणांवरील दबावही वाढतो. ‘स्मार्ट फोन’अभावी आपल्याला बहुसंख्यांप्रमाणे अद्ययावत ज्ञानापासून वंचित राहू, अशी भीतीही त्यांना सतत वाटते.

अतिवापराचे दुष्परिणाम काय आहेत?

या वर्षाच्या प्रारंभी ओर्बेन व सहकाऱ्यांनी यासंदर्भात ‘विंडोज ऑफ डेव्हलपमेंटल सेन्सिटिव्हिटी’ हा संशोधन अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार पौगंडावस्थेतील ठरावीक वयात ‘स्मार्ट फोन’च्या वापरामुळे नंतरच्या काळात जीवनातील सुख-समाधान घटते. या संशोधनात दहा ते २१ वर्षे वयोगटातील १७ हजार जणांचे निरीक्षण करून त्याचे विश्लेषण केले गेले. त्यानुसार ११ ते १३ वयोगटातील मुली व १४ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये ‘स्मार्ट फोन’ व समाजमाध्यमांच्या अतिवापरानंतर वर्षभराने समाधानाची भावना घटते. याउलटही होते. समाजमाध्यमे व ‘स्मार्ट फोन’च्या अल्प वापरामुळे आगामी वर्षात चांगले सुख-समाधान लाभते. तसेच साधारण १९ वर्षे वयोगटातील मुलांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढते. पौगंडावस्थेत मेंदूतील बदल झपाट्याने होतात. त्यामुळे तरुणांच्या कृती व भावनांवर प्रभाव पडतो व ते सामाजिक संबंध-प्रतिष्ठेबाबत संवेदनशील बनतात. मात्र, वाढत्या वयासह ‘स्मार्ट फोन’ व समाजमाध्यमांच्या अतिवापराचे दुष्परिणामाचे भान मुलांना येते.

पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते का?

या सर्व अभ्यासांतून असा निष्कर्ष निघतो, की ‘स्मार्ट फोन’ मुलांना कधी द्यावा व तो कसा वापरावा याबाबत पालकांचीच भूमिका व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. कोणत्या वयात ‘स्मार्ट फोन’ द्यावा, हा निर्णय सर्वस्वी पालकांनी तारतम्याने घ्यावयाचा आहे. मात्र, तसे करताना मुलांवर विश्वास टाकावा. मोकळेपणाने संवाद साधावा. सुसंवादातून व ‘स्मार्ट फोन’चे फायदे-तोटे त्यांना नीट समजावून सांगावेत. प्रसंगी त्यांच्याशी फोनवरील खेळही खेळावेत. परंतु त्याच्या आहारी जाण्याचे दुष्परिणाम विशद करावेत. ‘स्मार्ट फोन’मध्ये भरमसाट ‘उपयोजने’ (ॲप)न घेता उपयोगाची ‘ॲप’ घेण्यास सांगावे. फोनचा वापर कधी करायचा व कधी थांबवायचा याचे दैनंदिन नियम आखून अमलात आणावेत. रात्री झोपताना फोन जवळ ठेवू देऊ नये. मात्र, पालकांचे वागणेही तसे सुसंगत हवे. मुले आपल्या पालकांचा आदर्श घेत असतात. बहुसंख्य मुले पालकांचा फोन हाताळतात. त्यामुळे आपल्या फोनमध्ये काय ‘कंटेट’ ठेवायचा याचे भान पालकांनी राखावे.