ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याप्रकरणी सध्या गदारोळ सुरू आहे. या प्रकरणामुळे ससून, पोलीस आणि कारागृह पोलीस असे तीन विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांना निलंबित करून आपली जबाबदारी पार पाडल्याचे सकृतदर्शनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. याचवेळी ससूनकडून गोपनीयता या एकाच मुद्द्यावर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचबबरोबर कारागृह प्रशासनाकडून जबाबदारी झटकून पोलीस आणि ससूनकडे बोट दाखविले जात आहे. सरकारी व्यवस्थेचेच वाभाडे काढणाऱ्या ललित पाटील प्रकरणात नेमके दोषी कोण आहेत?

नेमका प्रकार काय?

ललित पाटील हा ससून रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून उपचार घेत होता. तो सुमारे १६ महिने रुग्णालयातील कैदी रुग्ण कक्ष क्रमांक १६ मध्ये होता. तिथून तो अमली पदार्थ तस्करी करीत होता. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ सापडल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर लगेचच ललित ससूनमधून पळाला. ललित हा ससूनमधून बाहेर पडल्यानंतरचे सीसीटीव्ही चित्रीकरणही समोर आले आहे. त्यात ललित हा निवांतपणे चालत, काही अंतरावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये जाताना दिसला होता. त्यामुळे साहजिकच बंदोबस्तावर असलेले पोलीस आणि ससून रुग्णालय प्रशासन यांच्याकडे बोट दाखविण्यात आले.

Freedom at Midnight
‘Freedom at Midnight’ का ठरले होते हे पुस्तक वादग्रस्त?
How Dinosaurs Took Over the Earth
Jurassic period: दहा लाख वर्षांच्या सततच्या पावसानंतर डायनासोर्सने…
neem leaves cancer cure (1)
कडुलिंबाची पाने खाऊन नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीची कॅन्सरवर मात? हे खरंच शक्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात?
mahayuti landslide victory in maharashtra vidhan sabha election 2024
महायुतीच्या महाविजयाची पाच कारणे… ‘बटेंगे..’, लाडकी बहीण, पायाभूत सुविधा, संघ आणि फडणवीस!
japan emerging sex hub
वाढत्या गरिबीमुळे ‘हे’ आशियाई शहर ठरत आहे ‘सेक्स टुरिझम हब’; कारण काय?
methanol liquor poison
विश्लेषण : लाओसमध्ये ‘मिथेनॉल’मिश्रित मद्याचे ७ परदेशी पर्यटक बळी… मिथेनॉल मद्यामध्ये सर्रास का मिसळले जाते? ते घातक कसे?
Russia Ukraine war
विश्लेषण : रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्र का डागले? पुतिन यांच्या खेळीतून अमेरिका, ‘नेटो’ला कोणता इशारा?
Air pollution air quality delhi burning of agricultural waste Uttar Pradesh, Punjab Haryana states
विश्लेषण : दिल्लीतील भीषण प्रदूषणास बाजूच्या राज्यांतील शेती कशी कारणीभूत? कृषी कचरा जाळण्याची गरज तेथील शेतकऱ्यांना भासते?

हेही वाचा – हमास-इस्रायल युद्धादरम्यान हिटलरच्या ‘ऑपरेशन बार्बरोसा’ची चर्चा; जर्मन सैनिकांच्या वेढ्यामुळे लेनिनग्राडमध्ये झाला होता लाखो लोकांचा मृत्यू!

‘व्हीआयपी’ की कैदी कक्ष?

ससून रुग्णालयात कक्ष क्रमांक १६ हा सध्या कैदी रुग्ण कक्ष आहे. पूर्वी हा कक्ष अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवरील उपचारासाठी (व्हीआयपी) होता. ससूनमध्ये ऐतिहासिक वारसा असलेल्या जुन्या इमारतीत आधी कैदी रुग्ण कक्ष होता. या इमारतीचे नूतनीकरण सुरू झाल्यानंतर दुसऱ्या इमारतीतील कक्ष क्रमांक १६ चा वापर कैदी रुग्ण कक्ष म्हणून सुरू झाला. या कक्षामध्ये स्वतंत्र खोल्या आहेत. महिनोमहिने अनेक बडे कैदी या कक्षात मुक्काम ठोकतात. कक्षात उपचार करणारे डॉक्टर, कर्मचारी आणि पोलिसांशिवाय इतर कोणाला प्रवेश नसल्यामुळे आतमध्ये काय सुरू आहे, याची कुणालाही माहिती नसते. विशेष म्हणजे, ललित पाटीलने पलायन केले त्यावेळी या कक्षात बडे कैदी अनेक महिने मुक्काम ठोकून असल्याचे समोर आले होते. हे प्रकरण अंगाशी येताच रुग्णालयात केवळ ४ कैदी ठेवून १२ कैद्यांना कारागृहात पाठविण्यात आले. त्यामुळे खरेच हे कैदी आजारी होते का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

राजकीय वळण का?

ललित पाटील प्रकरणात विरोधकांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी भुसे यांच्यासह भाजपच्या एका मंत्र्याचा यात सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ललित पाटील याचा भुसे यांनी शिवसेनेत प्रवेश घडवून आणला होता, असा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भुसेंकडे पालकमंत्रीपद असलेल्या नाशिकमध्येच ललितचा अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू होता. त्याचा भाऊ भूषण पाटील हा कारखाना चालवत होता. पोलिसांनी आता हा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. त्यामुळे ललितचे राजकीय धागेदोरे असल्याचा संशय आणखी वाढू लागला आहे.

चौकशी समितीवर आक्षेप काय?

या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाने चार जणांची चौकशी समिती नियुक्त केली. या समितीत विभागातीलच सर्व अधिकारी असल्याने ते तटस्थपणे चौकशी करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचवेळी समितीत असलेल्या काही अधिकाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे. त्यामुळे सध्या चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश समितीत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा – विश्लेषण : आरोग्य यंत्रणेत सुधारणा कठीण का?

चौकशी नेमकी कुणाची?

कैदी पलायनप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीने रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची झाडाझडती घेतली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, कक्ष क्रमांक १६ मधील कर्मचारी, शिपाई यांची समितीने कसून चौकशी केली. याचबरोबर २०२० पासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णाची माहिती समितीने मागितली आहे. तसेच, पोलिसांकडून आता गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे तपास सोपविण्यात आला आहे. कारागृह प्रशासन, पोलीस आणि ससून प्रशासन यांनी एकमेकांकडे बोट दाखवून आपण दोषी नसल्याचा दावा केला आहे. परंतु, कोणीच दोषी नसेल तर ललित पाटीलसह इतर बड्या कैद्यांच्या अनेक महिन्यांचा ससूनमधील पाहुणचार कुणामुळे झाला हा प्रश्न अनुत्तरित राहतो. कारण यातील केवळ एका विभागाला हे सगळे करणे शक्य नाही. त्यामुळे तिन्ही विभागांच्या संगनमतातून हे घडल्याचे समोर येत आहे.

sanjay.jadhav@expressindia.com