राखी चव्हाण
ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्प हा एकमेव आहे, ज्या ठिकाणी एकूण १६ पैकी दहा वाघ काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ आहेत. या व्याघ्रप्रकल्पाला त्याच्या आनुवांशिक रचनेमुळे एक वेगळे ‘कन्झर्वेशन क्लस्टर’ म्हणून ओळखले जाते. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी अलीकडेच याची अधिकृतपणे माहिती दिली. त्यामुळे भारतातील या एकमेव व्याघ्रप्रकल्पातील या काळ्या वाघांविषयीची उत्कंठा आणखी वाढली आहे.
सिमिलीपालमध्ये ‘मेलेनिस्टिक’ वाघाची पहिली नोंद केव्हा?
१९९३ साली एका आदिवासी तरुणाने स्वसंरक्षणासाठी एका ‘मेलेनिस्टिक’ वाघिणीला ठार मारल्याची नोंद आहे. त्यानंतर २००७ पर्यंत हे वाघ अधिकृतपणे व्याघ्रप्रकल्पात सापडले नाहीत. कागदोपत्री तसा शोध घेण्याचा खूप प्रयत्न झाला. ओडिशामधील सिमिलीपालच्या आत या वाघांना पाहिल्याची नोंद १९९३ मध्येच झाली होती. २१ जुलै १९९३ रोजी पोदागड गावातील सालकू या लहान मुलाने स्वसंरक्षणार्थ या वाघिणीला बाण मारून ठार केले. यानंतर २००७ मध्ये अधिकृतपणे या व्याघ्रप्रकल्पात ‘मेलेनिस्टिक’ वाघ आढळला. त्यावेळी कॅमेरा ट्रॅपमध्ये तीन काळ्या वाघांचे छायाचित्र कैद झाले. त्यानंतर वाघांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले.
हेही वाचा >>>विश्लेषण : खाद्यतेलाची मुक्तद्वार आयात का?
‘मेलॅनिस्टिक’ म्हणजे काय?
मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य सजीवांच्या त्वचेचा, केसांचा रंग ठरवण्यास कारणीभूत असते. ‘मेलॅनिन’चाच एक प्रकार म्हणजे ‘युमेलॅनीन’. प्राण्यांमध्ये ‘युमेलॅनीन’ हे रंगद्रव्य त्यांच्या काळ्या रंगाच्या त्वचेसाठी कारणीभूत ठरते. ‘इनब्रीडिंग’ म्हणजेच जवळच्या नात्यातील प्राण्यापासून होणारी प्रजोत्पत्ती. ह्या साऱ्या गोष्टींचा परिणाम म्हणून दाट काळ्या रंगाचे पट्टे असलेल्या या वाघांची निर्मिती झाली आहे. कातडीचा रंग त्वचेतील ‘मेलॅनिन’ या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. या द्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास, कातडी काळी किंवा गडद रंगाची होते. मात्र, या रंगबदलामुळे वाघाच्या वर्तणुकीत किंवा स्वभावात काहीच फरक पडत नाही.
‘मेलेनिस्टिक’ वाघांना धोका कोणता?
भौगोलिक भिन्नतेमुळे आनुवांशिकदृष्ट्या संबंधित प्रजाती सिमलीपालमध्ये अनेक पिढ्यांपासून एकमेकांशी प्रजनन करत आहेत. व्याघ्र संवर्धनावर याचा विपरित परिणाम होतो. कारण असे वेगळे आणि जन्मजात काळे असणारे वाघ अल्प कालावधीत नामशेष होण्याची दाट शक्यता असते. २०१८ च्या व्याघ्रगणनेच्या अहवालानुसार काळ्या पट्टेदार वाघांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. जगातील ७० टक्के काळ्या वाघांची संख्या ओडिशात आहे. या वाघांना शिकारीचा धोकादेखील जास्त असतो.
हेही वाचा >>>सौदी अरेबियावरील शस्त्रास्त्र बंदी शिथिल करण्यास अमेरिका का तयार आहे?
संशोधन काय म्हणते?
बंगळुरूच्या ‘नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस’मधील (एनसीबीएस) वैज्ञानिक उमा रामकृष्णन आणि त्यांचा विद्यार्थी विनय सागर यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. या वाघांचा रंग एका विशिष्ट जनुकातील उत्परिवर्तनामुळे उद्भवतो. जनुकांमधील ‘सिंगल म्युटेशन’ म्हणजेच एका बदलामुळे वाघाच्या अंगावरील काळे पट्टे रुंद होत जातात आणि कधी-कधी असे पट्टे एकमेकांमध्ये मिसळून तो पूर्ण काळाही होतो. या काळ्या रंगाला ‘स्युडोमेलेनिस्टिक’ किंवा खोटा रंग म्हणतात. सिमिलीपाल अभयारण्याचे असे काळे वाघ हे वाघांच्या उत्पत्तीपासूनच अतिशय कमी संख्येने आहेत. तसेच ते इतर कोणत्याही ठिकाणी आढळलेले नाहीत.
संशोधनातील काही ठळक निष्कर्ष काय?
सिमिलीपालमधील सुमारे ६० वाघांच्या डीएनएमधील ‘टॅकटेप’ नावाच्या जनुकात बदल झाला आहे, असे बंगळुरूच्या राष्ट्रीय जैवविज्ञान केंद्रातील संशोधक डॉ. उमा रामकृष्णन आणि त्यांचा सहकारी संशोधक विनय सागर यांनी म्हटले आहे. या व्याघ्रप्रकल्पात काळपट दिसणाऱ्या वाघांचे प्रमाण साधारण ३० टक्के आहे. काळपट वाघ जन्माला येण्यासाठी आई आणि वडील या दोघांकडून येणाऱ्या डीएनएमधील ‘टॅकटेप’ जनुकात हा बदल असावा लागतो. संशोधकांनी सिमिलीपालबाहेरील जवळजवळ ४०० वाघांचे डीएनए तपासले. इतर जंगलामधील एकाही वाघाच्या डीएनएमध्ये त्यांना हा बदल आढळला नाही. सिमिलीपालमधील ३० टक्के वाघ काळपट असले तरी इथल्या जुन्या नोंदीत अशा वाघाची नोंद तुरळकच आढळते. त्यामुळे बऱ्याच वर्षात या जंगलात शेजारील इतर जंगलातून वाघ आल्याची किंवा येथील वाघ इतर जंगलात गेल्याची शक्यता खूप कमी आहे.
प्राणीसंग्रहालयातील ‘मेलेनिस्टिक’ वाघ कुठले?
भारतीय प्राणीसंग्रहालयात जन्म झालेल्या सर्व मेलेनिस्टिक वाघांचा ‘नंदनकानन’ अभयारण्यातील वाघांशी संबंध आहे. जुलै २०१४ मध्ये पहिल्या ‘मेलेनिस्टिक’ वाघाचा जन्म प्राणीसंग्रहालयात झाल्यानंतर नंदनकानन अधिकाऱ्यांनी प्रजननाचे नियमन सुरू केले. रांची, चेन्नई आणि इंदूर येथील प्राणीसंग्रहालयात असलेल्या ‘मेलेनिस्टिक’ वाघांचा जनुकीय पूल नंदनकानन प्राणी उद्यान, प्राणीसंग्रहालयाशी जोडलेला आहे. आता नंदनकाननमध्ये कृष्ण, बासू आणि स्पंदन असे तीन ‘मेलेनिस्टिक’ वाघ आहेत.
rakhi.chavhan@expressindia.com