महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका धावपटूने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला घडवले. सीमेवर रक्षण करतानाची जबाबदारी असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदानावरील कामगिरी, त्याने नेहमीच देशाचा विचार केला. हा गुणी धावपटू म्हणजे अविनाश मुकुंद साबळे. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विक्रमी वेळ नोंदवताना अविनाशने भारतासाठी ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धा प्रकारातील अविनाशची ही कामगिरी किती महत्त्वाची ठरते याचा आढावा.
अविनाशने आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणता इतिहास रचला?
अविनाशने आशियाई क्रीडा स्पर्धेतील ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. ही कामगिरी करणारा तो पहिला पुरुष भारतीय धावपटू ठरला. तसेच त्याने इराणच्या हुसेन केहानीचा (८ मिनिटे आणि २२.७९ सेकंद) विक्रम मोडीत काढला. अविनाशने ३००० मीटरचे अंतर ८ मिनिटे आणि १९.५० सेकंदांत पूर्ण करत स्पर्धा विक्रम रचला.
अविनाशच्या कारकिर्दीला कशी सुरुवात झाली?
बीड जिल्ह्यातील मांडवा गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अविनाशला शाळेत जाण्यासाठी रोजचा ६ किमी प्रवास करायला लागायचा. अशाच परिस्थितीत इयत्ता चौथीत असताना क्रीडाशिक्षक बाबासाहेब तावरे यांनी अविनाशला १ किमी शर्यतीत सहभागी होण्यास सांगितले. अविनाशने ही शर्यत जिंकली. इथून त्याने धावण्याचे धडे घ्यायला सुरुवात केली. औरंगाबादमध्ये क्रीडा प्रबोधिनीत त्याने स्वतःला घडवले. तीन वर्षांनी पुन्हा बीडला आल्यावर तो लष्करात ५ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला आणि आंतर सर्व्हिस क्रॉसकंट्री शर्यतीत २०१५ मध्ये त्याने सहभाग घेतला. त्याची कारकीर्द इथूनच सुरू झाली.
अविनाशमधील गुणवत्तेला कसे पैलू पडले?
लष्करी सेवेत असताना माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अमरीश कुमार यांनी अविनाशमधील गुण हरले. त्याच्याकडून कठोर मेहनत करून घेतली. अमरीश यांच्या मार्गदर्शनाखाली दीड वर्षात अविनाशने इतकी प्रगती केली की चेन्नई राष्ट्रीय स्पर्धेत स्टीपलचेस शर्यतीत पहिले विजेतेपद मिळवले. वेग आणि ताकद यात अमरीश यांनी अविनाशला तयार केले. मानसिकदृष्ट्या अविनाशला कणखर बनवत आपण कोणत्याही परिस्थितीत जिंकू शकतो याचा आत्मविश्वास दिला. अमरीश यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश घडला आणि या शर्यतीमधील गोपाळ सैनीचा विक्रम आता लवकरच मोडला जाणार याचे संकेत मिळाले. अविनाशने २०१८ मध्ये ते भाकीत पूर्ण केले आणि प्रचंड उकाड्यात भुवनेश्वर येथील स्पर्धेत ३७ वर्षांपूर्वीचा सैनीचा राष्ट्रीय विक्रम मोडला. मग त्याने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर अविनाशने तब्बल नऊ वेळा राष्ट्रीय विक्रमात सुधारणा केली.
अविनाशची गुणवैशिष्ट्ये काय?
प्रशिक्षक अमरीश यांनी अविनाशला घडवले यात शंकाच नाही, पण त्याची जिद्द आणि कठोर मेहनत घेण्याची त्याची सवय तितकीच महत्त्वाची होती. सीमेचे रक्षण करताना कधी सियाचिनच्या थंडीत, तर कधी राजस्थानच्या कमालीच्या उष्णतेत त्याने आपली कर्तव्यनिष्ठा दाखवून दिली. त्यामुळेच कठोर मेहनतीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून अविनाशकडे बघितले जाते. अविनाशचे लष्करातील प्रशिक्षक अमरीश कुमार, पहिले परदेशी प्रशिक्षक निकोलाय आणि सध्याचे स्कॉट सिमन्स या प्रत्येकाने अविनाशच्या कठोर मेहनतीचे कौतुक केले आहे.
हेही वाचा – विश्लेषण : मध्य प्रदेशात भाजपचे ज्येष्ठ नेते रिंगणात; शिवराजसिंह चौहान अस्वस्थ?
अविनाश कधी खऱ्या अर्थाने नावारूपाला आला?
एकामागोमाग एक असा नऊ वेळा अविनाशने आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. स्टीपलचेस प्रकारातील राष्ट्रीय पातळीवर त्याची मक्तेदारी निर्माण झाली. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून तो झळकत नव्हता. गेल्या वर्षी मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अविनाशने रौप्यपदक जिंकले. या एकाच क्षणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अविनाशचा बोलबोला झाला. याचे मुख्य कारण म्हणजे १९९० पासून या स्पर्धा प्रकारात असलेली केनियन धावपटूंची मक्तेदारी अविनाशने मोडून काढली. शारीरिक क्षमता पणाला लागणाऱ्या या शर्यतीत आफ्रिकेचे धावपटू आघाडीवर असतात. आफ्रिकन धावपटूंना आपणही हरवू शकतो हे अविनाशने दाखवून दिले.
अविनाशकडून आता काय अपेक्षा बाळगल्या जातील?
राष्ट्रकुल पाठोपाठ आता आशियाई क्रीडा स्पर्धेतही अविनाशने सुवर्णपदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपली ओळख ठळक केली आहे. मात्र, अजूनही स्टीपलचेस शर्यत आठ मिनिटांच्या आत धावण्याचे अविनाशला आकर्षण आहे. आता आशियाई विक्रमाने त्याची त्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असे म्हणायला वाव आहे. जागतिक स्पर्धेतील अपयश त्याने आशियाई स्पर्धेत खोडून काढले. आता पुढील टप्प्यावर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा येईल. हा टप्पा अविनाशच्या कारकिर्दीसाठी सर्वांत महत्त्वाचा ठरू शकेल.