उपग्रह वाहून नेणाऱ्या इस्रोच्या सर्वात लहान प्रक्षेपकाचे SSLV-D3 चे तिसरे आणि अंतिम प्रायोगिक उड्डाण आज शुक्रवारी सकाळी यशस्वी झाले. SSLV ने आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरिकोटा इथल्या इस्रोच्या अवकाश तळावरुन सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली. कागदावर आकडेमोड केल्याप्रमाणे तंतोतंत मी मोहीम पार पडली. अवघ्या १६ मिनिटात SSLV-D3 ने दोन उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. यामुळे कमी वजनाचे उपग्रह वाहून नेण्यासाठी SSLV ( Small Satellite Launch Vehicle) चा व्यावसायिक वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आजचे SSLV-D3 उड्डाण का महत्त्वाचे होते?

कोणताही नवा प्रक्षेपण – रॉकेट नियमित वापराकरिता सज्ज होण्याआधी त्याची प्रायोगिक उड्डाणे होतात. याआधी SSLV ची दोन उड्डाणे झाली. त्यापैकी पहिले अयशस्वी झाले होते, शेवटच्या क्षणी उपग्रह वेगळे होतांना दिशा चुकली होती. तर दुसरे उड्डाण यशस्वी झाले होते. आजच्या तिसऱ्या मोहीमेच्या (SSLV-D3) यशामुळे SSLV चा व्यावसायिक वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. SSLV मधील सर्व उपकरणांच्या कामागिरीवर आजच्या मोहीमेमुळे शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आजची मोहीम महत्त्वाची होती. आता हे तंत्रज्ञान भविष्यात खाजगी अवकाश संस्थांकडे दिले जाईल आणि उपग्रह प्रक्षेपण मोहीमा जोमाने पुढे सुरु रहातील अशी अपेक्षा आहे.

SSLV नेमकं कसं आहे ?

इस्रोकडे PSLV, GSLV MK2, GSLV MK3 असे तीन विविध रॉकेट – उपग्रह प्रक्षेपक आहेत. यांचे वजन अनुक्रमे सुमारे ३०० टन, ४२० टन आणि ६४० टन एवढं आहे. या तिन्ही प्रक्षेपकांमध्ये दोन टन ते सहा टन वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. हे प्रक्षेपक उड्डाणासाठी सज्ज करण्यासाठी किमान ४५ दिवसांचा अवधी आणि तंत्रज्ञान-अभियंता यांची फौज लागते. या तुलनेच SSLV चा आकार आणि वजन एकदम लहान आहे. SSLV हा प्रक्षेपक ३४ मीटर उंच, २ मीटर व्यासाचा आणि अवघ्या १२० टन वजनाचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रक्षेपक फक्त ७ ते १० कर्मचारी-तंत्रज्ञ-अभियंता उड्डाणासाठी सज्ज करु शकतात तेही अवघ्या सात दिवसात. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत मोहीम पार पाडणे शक्य होणार आहे.

SSLV मुळे काय होणार ?

जगात earth observation satellite ची मागणी वाढत आहे. या प्रकारातील उपग्रहांचे वजन हे ५०० किलोग्रॅमपर्यंत असते. या उपग्रहांच्या माध्यमातून पृथ्वीची सुस्पष्ट छायाचित्र काढता येतात ज्याचा बहुरंगी वापर करता येतो. तसंच microsatellite, minisatellite, nanosatellite चा वापर विविध शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था यांच्याकडून केला जात आहे. या उपग्रहांचे वजन हे १०० ग्रॅमपासून १०० किलोपर्यंत असते. तेव्हा अशा लहान उपग्रहांचे मोठं मार्केट जगात उपलब्ध आहे. हे लहान उपग्रह आता इस्रोला SSLV च्या माध्यमातून ५०० किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करता येणार आहे. यासाठी PSLV, GSLV Mk2, GSLV MK3 अशा मोठ्या प्रक्षेपकाची आवश्यकता नाही.

इस्रोला काय फायदा होणार?

जगात कृत्रिम उपग्रहांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. साधारण एक किलो वजन अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी २० हजार डॉलर्सपेक्षा जास्त पैसे आकारले जातात. तेव्हा जगाच्या या मार्केट रेट पेक्षा कमी किंमतीत उपग्रह प्रक्षेपणाची भारताची क्षमता आहे. SSLV मुळे हे साध्य होण्यास आणखी मदत होणार आहे. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची विश्वासहर्ता जगात मोठी आहे. प्रक्षेपकाच्या ताफ्यात आता SSLV ची भर पडल्याने आता अधिकाधिक देश कमी वजनाचे उपग्रह प्रक्षेपीत करण्यासाठी भारताकडे येतील, यामुळे देशाला परकीय चलन मिळण्यास हातभार लागेल अशी आशा आहे.