अभय नरहर जोशी

अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ने (नासा) २०१६ मध्ये ‘ऑसिरिस-रेक्स’ हे अवकाशयान प्रक्षेपित केले होते. या मोहिमेंतर्गत या अवकाशयानाने ‘बेन्नू’ या लघुग्रहावरील (ॲस्टरॉइड) सुमारे अडीचशे ग्रॅम नमुने गोळा केले आहेत. ‘नासा’ने अंतराळात प्रथमच जमा केलेले लघुग्रहावरील हे नमुने तब्बल सात वर्षांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर पोहोचले आहेत. या अवकाशयानातून पृथ्वीच्या कक्षेत सुमारे ६३ हजार मैलांवरून एका कुपीद्वारे हे नमुने पृथ्वीवर सोडले गेले. त्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया…

Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Russias Voronezh radar system
चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताला रशियाची मदत! काय आहे वोरोनेझ रडार प्रणाली?
On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!

या मोहिमेत काय झाले?

सूर्याभोवती फिरणाऱ्या महाकाय खडकासारख्या घटकांना लघुग्रह (ॲस्टरॉइड) असे म्हणतात. यांपैकी एक मीटरहून लहान आकाराच्या वस्तूंना ‘अशनी’ किंवा ‘उल्का’ (मिटिऑरॉइड) म्हणतात. ‘नासा’ने ‘बेन्नू’ या लघुग्रहावरून गोळा केलेले नमुने एका वैज्ञानिक कुपीद्वारे मिळवले आहेत. सुमारे १.२ अब्ज मैलांचा प्रवास केल्यानंतर ही कुपी पृथ्वीवर पोहोचली. ही कुपी अमेरिकेतील युटा वाळवंटात उतरवण्यात आली. हे अवकाशयान पृथ्वीच्या कक्षेजवळून जात असताना ही कुपी त्यातून सोडण्यात आली आणि हे यान पुढील मोहिमेसाठी रवाना झाले. सुमारे २७ हजार मैल प्रतितास वेगाने या कुपीने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. तिचा वेग ‘पॅराशूट’च्या साहाय्याने मंदावला. दि. २४ सप्टेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजून ५२ मिनिटांनी ही कुपी अमेरिकी संरक्षण विभागाच्या युटा चाचणी आणि प्रशिक्षण केंद्राच्या प्रतिबंधित हवाई क्षेत्रात उतरली. या कुपीत ‘बेन्नू’च्या दगडमातीचे किमान कपभर तरी नमुने असावेत, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पण कुपी उघडली गेल्यानंतरच त्याबाबत निश्चितपणे सांगता येईल. तीन वर्षांपूर्वी हे नमुने जमा करताना ते कुपीच्या झाकणात अडकले होते. याआधी केवळ जपानला असे अशनीचे नमुने आणता आले होते. काही मोहिमांतून त्यांना चमचाभर नमुने मिळाले होते.

आणखी वाचा-राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातली ‘मल्टिपल एंट्री, मल्टिपल एग्झिट’ची अंमलबजावणी आव्हानात्मक का?

ही मोहीम कशासाठी आहे?

मोहीम व्यवस्थापक सँड्रा फ्रेउंड यांनी सांगितले, की आम्ही आमच्या लक्ष्यापासून एक मीटर अंतरावर पोहोचलो होतो. बेन्नूला प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि त्याला स्पर्श करून नमुने गोळा करण्यासाठी ‘ऑसिरिस-रेक्स’चे अचूक संचलन आवश्यक होते, त्यामुळे ही संपूर्ण मोहीम राबवताना किती अचूकता राखली गेली, हे यातून दिसते. ‘नासा’ आपल्या सौरमालेत असलेल्या असंख्य लघुग्रह-अशनींपैकी काहींवरील नमुने संशोधनासाठी गोळा करण्यासाठी ‘ऑसिरिस-रेक्स’सारख्या तुलनेने कमी व्याप्ती असलेल्या मोहिमांमध्ये गुंतवणूक करत असते. त्यामुळे आपल्याला आपली सौर मालिका कशी निर्माण झाली आणि कशी विकसित झाली याबद्दलचे संकेत मिळू शकतात, असे ‘ऑसिरिस-रेक्स’ मोहिमेतील कार्यकारी प्रमुख मेलिसा मॉरिस यांनी सांगितले. एका अर्थाने स्वतःची कुळकथा (मूळ कथा) समजून घेण्यासाठीच ही मोहीम राबवली जात आहे. थोडक्यात, याद्वारे शास्त्रज्ञांना आपल्या सौरमालेच्या अतिप्राथमिक अवस्थेविषयी समजून घेण्यास मदत होईल.

विश्लेषणपूर्वीची प्रक्रिया कशी?

हे नमुने मिळवणाऱ्या पथकाने युटा वाळवंटातून ही कुपी ताब्यात घेतली. एका हेलिकॉप्टरद्वारे ते नमुने नेण्यात आले. ही कुपी उघडताना या कुपीतील ‘बॅकशेल’सारखे काही मोठे भाग काढून टाकले जातील. त्यासाठी या कुपीला तात्पुरत्या स्वरूपात एका संपूर्ण निर्जंतुक, स्वच्छ खोलीत नेले गेले. त्यानंतर ‘नायट्रोजन शुद्धीकरण’ प्रक्रिया करण्यात आली. या लघुग्रहावरून आणलेल्या नमुन्यांच्या संरक्षणासाठी ही प्रक्रिया केली जाते. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणातील घटकांपासून हे नमुने सुरक्षित राहतील. नंतर हे नमुने असलेला कुपीचा भाग टेक्सासमधील ह्युस्टन येथील ‘जॉन्सन स्पेस सेंटर’मध्ये पाठवला जाईल. जिथे हे नमुने असलेला कुपीतील डबा प्रथमच उघडला जाईल. त्यानंतर नमुन्याचे विश्लेषण करता येईल.

आणखी वाचा-विश्लेषण: विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर ‘जागण्या’च्या आशा धूसर? चंद्रयान-३ मोहीम संपुष्टात येणार?

नमुन्यांचे संशोधन कशासाठी?

‘ऑसिरिस- रेक्स’च्या प्रमुख अन्वेषक दांते एस. लॉरेटा यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला ‘ऑरगॅनिक मॉलिक्युलर केमिस्ट्री’च्या अंगाने या नमुन्यांचे संशोधन करण्यावर आमचा भर आहे. जीवशास्त्रानुसार अमिनो आम्लांद्वारे प्रथिनांची आणि न्युक्लिक आम्लांची निर्मिती होते. त्याद्वारे सजीवांची जनुके तयार होतात. त्यांची निर्मिती या लघुग्रहांवर झाली आणि ते अवकाशातून पृथ्वीवर अवतरले का, याचे संशोधन करण्यासाठी आम्हाला या नमुन्यांची मदत होईल. पृथ्वीवर जीवसृष्टीसारखे महत्त्वाचे घटक कसे निर्माण झाले, याबाबतचा व्यापकपणे स्वीकारलेला सिद्धान्त आहे. अनेकांनी या सिद्धान्ताद्वारे जीवसृष्टीच्या निर्मितीची मांडणी केली आहे. संपूर्ण जीवसृष्टी इतरत्र विकसित होऊन ती पृथ्वीवर अवतरली असे हा सिद्धान्त सांगत नाही. परंतु जीवसृष्टीचे मूलभूत घटक सेंद्रीय संयुगे (ऑरगॅनिक कंपाउंड) ही कोट्यवधी वर्षांपूर्वी लघुग्रहांनी पृथ्वीवर आणली असावीत, असे हा सिद्धान्त सांगतो. हा सिद्धान्त अनेक दशके अस्तित्वात असला, तरी प्रत्यक्ष सिद्ध करण्यासाठी अशा लघुग्रहांवरील नमुने शास्त्रज्ञांना संशोधनासाठी आवश्यक असतात.

अवकाशातील नमुनेच का हवेत?

अवकाशयानातून या लघुग्रहावर उपकरणे नेऊन अभ्यास करण्याचा पर्याय आहे. मात्र, या नमुन्यांच्या साद्यंत विश्लेषणासाठी ‘सिंक्रोट्रॉन’सारखी खूप मोठी उपकरणे लागतात. ती अवकाशयानातून तेथे नेणे शक्य नाही. दुसरा पर्याय म्हणजे पृथ्वीवर कोसळलेल्या उल्कांचा अभ्यास करणे. आतापर्यंत बहुतांश वेळा तसाच अभ्यास झाला. मात्र, ही उल्का कोसळल्यानंतर ती सौरमालेत नेमकी कुठे होती, हे संशोधकांना समजणे अवघड असते. ती नेमका कशाचा भाग होती, हेही समजू शकत नाही. तसेच ही उल्का जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते तेव्हा ती वातावरणातील-पर्यावरणीय घटकांनी प्रदूषित होऊ शकते. त्यामुळे त्यातील नमुन्यांच्या शुद्धतेबाबात साशंकता असते. या नमुन्यांतील सेंद्रीय संयुगांचा शोध घेताना शास्त्रज्ञांना हे नमुने शुद्ध रूपात अवकाशातील लघुग्रहांवरून आलेले आहेत याची खात्री असणे आवश्यक असते. लघुग्रहावरील मूळ रूपातील असे नमुने मिळवण्यासाठीच ही ‘ऑसिरिस-रेक्स’ मोहीम राबवली जात आहे.

आणखी वाचा-सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे काय बदलणार? पिकांवर काय परिणाम होणार?

याआधी असे प्रयत्न झाले होते का?

‘ऑसिरिस-रेक्स’ या अवकाश यान मोहिमेद्वारे ‘नासा’ने प्रथमच लघुग्रहावरून शुद्ध रूपातील नमुने पृथ्वीवर आणले आहेत. याद्वारे ‘नासा’ जपानची अवकाश संशोधन संस्था ‘जाक्सा’च्या पावलावर पाऊल टाकत आहे. जपानने त्यांच्या ऐतिहासिक ‘हायाबुसा’ आणि ‘हायाबुसा-२’ या अवकाशयान मोहिमांद्वारे दोन लघुग्रहांचे नमुने गोळा केले होते. पहिल्या हायाबुसा मोहिमेने अल्प नमुने गोळा केले असले, तरी दुसऱ्या मोहिमेने २०२० मध्ये ‘रायुगू’ लघुग्रहावरून सुमारे पाच ग्रॅम साहित्य आणण्यात यश मिळविले. या तुलनेत ‘ऑसिरिस- लघुग्रह ‘बेन्नू’मधून खूप जास्त प्रमाणात म्हणजे सुमारे अडीचशे ग्रॅम नमुने मिळवले आहेत. याचा अर्थ जपानने आणलेल्या अल्प नमुन्यांच्या तुलनेत त्यांचे जास्त तपशिलात वैज्ञानिक विश्लेषण करता येईल. मात्र, जपान किंवा अमेरिकेच्या या मोहिमा परस्परांच्या प्रतिस्पर्धी नसून, त्या संशोधनाच्या दृष्टीने परस्परपूरक असल्याबाबत संशोधकांत एकमत आहे.

abhay.joshi@expressindia.com

Story img Loader