इस्रायल आणि हमासदरम्यान ७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या विध्वंसक युद्धामध्ये गुरुवारपासून तात्पुरता विराम घेण्याबाबत समझोता झाला आहे. त्यानुसार, हमासच्या ताब्यातील काही ओलिसांची सुटका केली जाईल आणि गाझा पट्टीतील युद्धग्रस्तांपर्यंत मदत सामग्री पोहोचवली जाईल. तसेच इस्रायल काही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल. जवळपास १५ हजार जणांचा बळी गेल्यानंतर या करारामुळे युद्धग्रस्तांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे. मात्र, हा विराम म्हणजे युद्ध संपवण्याचा निर्णय नाही असे इस्रायलने जाहीर केले आहे. या कराराचे अधिक तपशील काय आहेत ते पाहू या.
या करारातील तरतुदी काय आहेत?
इस्रायल आणि हमासदरम्यान युद्धामध्ये गुरुवारपासून चार दिवसांचा विराम घेण्याचा समझोता झाल्याचे कतारने बुधवारी जाहीर केले. या समझोत्यानुसार, हमास सुमारे २४० पैकी ५० ओलिसांची सुटका करणार आहे. तर इस्रायल १५० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे. दोन्ही बाजूंनी सुटका केल्या जाणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने मुले आणि महिलांचा समावेश असेल. विरामाच्या चार दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ओलिसांची आणि कैद्यांची सुटका केली जाईल. हमासने ओलिसांच्या पहिल्या गटाची सुटका केल्यानंतर इस्रायल पॅलेस्टिनी कैद्यांच्या पहिल्या गटाची सुटका करेल.
हेही वाचा – विश्लेषण : धारावीतील टीडीआर सक्ती का धोक्याची?
करार कसा झाला?
कतारच्या मध्यस्थीने आणि अमेरिका आणि इजिप्त यांच्याशी समन्वयाने हा करार झाला आहे. त्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने चर्चा सुरू होत्या. करार झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी कतारचे अमिर शेख तमिम बिन हमास अल थानी आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी यांचे आभार मानले. इस्रायलनेही कतार, इजिप्त आणि अमेरिकेचे आभार मानले.
या करारामुळे काय साध्य होणार आहे?
गाझामधील युद्धग्रस्त पॅलेस्टिनींना पहिल्यांदाच दिलासा मिळणार आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड महिन्यात इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमध्ये साडेपाच हजारांपेक्षा जास्त लहान मुलांसह १३ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. आता त्यामध्ये काही प्रमाणात तरी खंड पडणार आहे. हमासने ताब्यात घेतलेल्या ओलिसांच्या कुटुंबीयांसाठीही हा करार आशेचा किरण घेऊन आला आहे.
कराराविषयी काय माहिती देण्यात आली?
कराराविषयी इस्रायल, हमास आणि कतारने निरनिराळे तपशील प्रसिद्ध केले आहेत. मात्र त्यामध्ये कोणत्याही विसंगती आढळलेल्या नाहीत. हमासने सुटका केलेल्या प्रत्येक १० अतिरिक्त ओलिसांसाठी विरामाचा एकेक दिवस वाढवला जाईल असेही इस्रायलने जाहीर केले आहे. मात्र, वाढवलेल्या दिवसांमध्ये अतिरिक्त पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाईल का हे इस्रायलने स्पष्ट केलेले नाही. कतारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, इस्रायलने गाझा पट्टीत इंधन आणि अधिक मानवतावादी मदत पोहोचवण्यास मान्यता दिली आहे. सध्या गाझा पट्टीत इंधनाच्या अभावी रुग्णालयांसह अनेक मूलभूत सेवा बंद पडल्या आहेत. हमासने सांगितले की, कराराचा भाग म्हणून दररोज मानवतावादी मदत आणि इंधन घेऊन येणाऱ्या शेकडो ट्रकना गाझा पट्टीमध्ये प्रवेश दिला जाईल. इस्रायली फौजांनी विशेष लक्ष्य केलेल्या उत्तर गाझामध्येही मदतसामग्रीचा पुरवठा केला जाईल.
सुटका केले जाणारे पॅलेस्टिनी कैदी कोण आहेत?
सुटका केल्या जाणाऱ्या पॅलेस्टिनी कैद्यांची यादी इस्रायलच्या न्याय मंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केली. त्यामध्ये अनेक किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. या मुलांना २०२२ आणि २०२३ मध्ये पश्चिम किनारपट्टीत हिंसाचारादरम्यान इस्रायली सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर दगडफेक किंवा सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे यांसारखे आरोप आहेत. सुरक्षेच्या मुद्द्यावरून इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनींची एकूण संख्या जवळपास सात हजार इतकी आहे.
हेही वाचा – विश्लेषण : राज्यातील शिक्षकांचे प्रश्न केव्हा सुटणार?
करारामधून कोणत्या बाबी वगळण्यात आल्या आहेत?
हमासच्या ताब्यात २४० ओलीस आहेत, त्यापैकी केवळ ५० ओलिसांची सुटका केली जाणार आहे. उरलेल्या ओलिसांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यावरील दबाव यापुढेही कायम ठेवावा लागणार आहे. त्यासाठी आहे त्या कराराचा विस्तार करावा लागेल किंवा नवीन करार करून उर्वरित ओलिसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी पुढे सुरू ठेवाव्या लागतील. ‘हारेत्झ’ या इस्रायली वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रेड क्रॉसचे अधिकारी उरलेल्या ओलिसांची भेट घेऊन त्यांना आवश्यक औषधपुरवठा करतील. मात्र, इस्रायल सरकार किंवा हमासकडून या वृत्ताची पुष्टी करण्यात आलेली नाही. पॅलेस्टिनींच्या दृष्टिकोनातून पाहता, विस्थापित झालेल्या लाखो लोकांना परत येण्यासाठी या समझोत्यामध्ये कोणतीही तरतूद नाही.
कराराचे संभाव्य परिणाम कोणते?
हा विराम फक्त चार दिवसांचा आहे. हमासला नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केलेले पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी विरामाचा कालावधी संपताच युद्ध पुढे सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे. या विरामादरम्यान आपल्या सैन्याला पुढील युद्धाची तयारी करण्यासाठी आवश्यक वेळ मिळेल असे त्यांनी मंगळवारीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे सद्य:परिस्थितीचा अंदाज घेतल्यास, विरामाचे चार दिवस संपताच इस्रायलचा गाझा पट्टीवरील हवाई मारा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाझामधील रहिवाशांना त्यासाठी सज्ज राहावे लागेल. इस्रायली सैन्याप्रमाणेच हमासलाही विरामाचा फायदा होऊ शकतो. या काळात रणनीती आखणे, लष्करी व्यूहरचना बदलणे आणि पुन्हा संघटित होणे यासाठी हालचाली करणे त्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळू नये आणि युद्धाची व्याप्ती वाढू नये यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न सुरूच ठेवावे लागणार आहेत.
nima.patil@expressindia.com