-भक्ती बिसुरे
मानवजातीसमोर ज्या असाध्य आजारांचे आव्हान आ वासून उभे आहे, त्यातील एक आजार म्हणजे कर्करोग. कर्करोगाचे निदान त्याच्या प्राथमिक टप्प्यात झाले तर कर्करोग बरा होतो. मात्र, निदान होण्यास झालेला विलंब हा सहसा रुग्णाला वेदनादायी आयुष्य आणि त्यानंतर मृत्यू देणारा ठरतो. या आजाराचे काही अपवादात्मक प्रकार वगळता कर्करोगावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. केमोथेरेपीसारखे उपचार हे बहुतांशवेळा वेदनादायी आणि इतर दुष्परिणाम करणारे ठरू शकतात. त्यामुळे कर्करोग झाला या विचारानेच रुग्णांचे मनोधैर्य खचते. पण नुकत्याच अमेरिकेतून आलेल्या एका सकारात्मक बातमीने कर्करोग संपूर्ण बरा होण्याची शक्यता आता दृष्टिपथात आल्याचे स्पष्ट झाले आहे. एका औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये (क्लिनिकल ट्रायल) सहभागी झालेल्या १८ रुग्णांचा कर्करोग संपूर्ण बरा झाला आहे. त्यामुळे कर्करोग बरा होणे आता दृष्टिपथात आल्याची चिन्हे आहेत.
संशोधन काय?
ग्लॅक्सोस्मिथक्लाईन या औषध कंपनीच्या आर्थिक पाठबळावर अमेरिकेत कर्करोगाच्या १८ रुग्णांवर एका औषधाची क्लिनिकल ट्रायल करण्यात आली. या १८ रुग्णांना गुदद्वाराचा कर्करोग होता. आजाराचे निदान झाल्यानंतर या रुग्णांनी केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया यांसारखे उपायही केले, मात्र कर्करोग बरा झाला नाही. उलट, शस्त्रक्रियेमुळे शरीररचनेत काही दीर्घकाळ आणि गुंतागुंतीचे बदल झाल्याने प्रकृतीच्या नव्याच तक्रारी समोर आल्या. या क्लिनिकल ट्रायलसाठी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेण्यास होकार देताना आपला आजार बरा होण्याची शक्यता जराही विचारात न घेता केवळ उपयोग झाला नाही तर पुन्हा पूर्वीच्या औषधोपचारांकडे वळण्याचा विचार या १८ रुग्णांनी केला. मेमोरिअल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरच्या डॉ. लुई दियाज यांनी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये या संशोधनाच्या निष्कर्षांवर आधारित शोधनिबंधाचे लेखन केले आहे. हा शोधनिबंध अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजीच्या तज्ज्ञांसमोर ठेवण्यात आला. कर्करोगाच्या इतिहासात प्रथमच या रुग्णांच्या शरीरातून कर्करोग समूळ नाहीसा झाल्याचे निष्कर्ष संशोधनातून प्राप्त झाले आहेत. क्लिनिकल ट्रायलचा भाग म्हणून सहा महिन्यांच्या कालावधीत दोन वेळा या रुग्णांना औषधाची मात्रा देण्यात आली. या औषधाची किंमत तब्बल ११ हजार अमेरिकन डॉलर एवढी आहे.
निष्कर्ष काय?
कर्करोग या वेदनादायी आजारावरील उपचारही अत्यंत वेदनादायी असतात. अनेकदा उपचारांदरम्यान जाणवणाऱ्या वेदना सहन केल्या तरी रुग्ण संपूर्ण कर्करोगमुक्त होत नाही. मात्र, नवीन औषधाच्या वैद्यकीय चाचणीत (क्लिनिकल ट्रायल) सहभागी झालेले १८ कर्करोग रुग्ण संपूर्ण कर्करोग मुक्त झाल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. कर्करोगाच्या इतिहासात केवळ औषधाने कर्करोग पूर्ण बरा झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. या रुग्णांनी औषध चाचणीत सहभाग घेण्यापूर्वी केमोथेरपी, रेडिएशन किंवा दैनंदिन जगण्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया हे पर्याय अवलंबले होते, मात्र त्यांच्या कर्करोगाने पुन्हा-पुन्हा डोके वर काढले होते. सदर औषध चाचणीनंतर मात्र त्यांचा कर्करोग संपूर्ण बरा झाल्याने यापुढे कोणत्याही उपचारांची गरज नसल्याचे प्रत्यक्ष तपासणी, एंडोस्कोपी, पेट स्कॅन आणि एमआरआयसारख्या सर्व तपासण्यांतून दिसून आले.
परिणाम आणि दुष्परिणाम कोणते?
औषधाची मात्रा मिळालेले सर्वच्या सर्व रुग्ण या कर्करोगातून बरे झाले आहेत. त्यामुळे भविष्यात कर्करोग बरा करणे आता आवाक्यात आल्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे तज्ज्ञांना वाटत आहे. चाचणीत सहभागी सर्व रुग्णांमध्ये कर्करोग संपूर्ण बरा होणे हे प्रथमच घडत असल्याचे संशोधकांनी आपल्या शोधनिबंधात म्हटले आहे. औषध चाचणीतील सहभागी रुग्णांना सहा महिन्यांच्या कालावधीत दोन वेळा हे औषध देण्यात आलेले हे औषध कर्करोगाच्या पेशींवरील आवरण नष्ट करत असून त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा या पेशी ओळखून नष्ट करते असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. सहभागी १८ रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णांना औषधाचे किरकोळ दुष्परिणाम (साइडइफेक्टस्) दिसले, मात्र काही रुग्णांमध्ये स्नायूंची ताकद कमी होण्यासारखे गंभीर परिणामही दिसून आले. त्यामुळे त्यांचे बोलणे, अन्न खाताना चावणे यांसारख्या हालचालींवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे. मात्र, असे परिणाम दिसलेले रुग्ण कमी आहेत, ही बाब महत्त्वाची आहे.
सामान्यांच्या आवाक्यात कधी येणार?
कर्करोग संपूर्ण बरा करणारे औषध म्हणून या चाचण्यांच्या निष्कर्षांकडे पाहिले जात असले तरी त्याची किंमत प्रचंड आहे. सदर चाचणीसाठी वापरण्यात आलेल्या औषधाची किंमत अकरा हजार अमेरिकन डॉलर एवढी असल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ती परवडणे अशक्य असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, हे औषध किंवा उपचार हा एक प्रकारचा रोगप्रतिकारशक्ती उपचार असल्याने (इम्युनोथेरपी) रुग्णांना परवडणे ही मोठी समस्या असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. त्याउलट लवकर निदान आणि उपचार झाले असता बहुतांश प्रकारचे कर्करोग आता बरे होतात आणि रुग्ण कर्करोगापूर्वीप्रमाणेच चांगले आयुष्य जगू शकतो, असेही वैद्यकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे.