सोशल मीडियावर वापरकर्त्यांचे अकाऊंट ‘शॅडो बॅन’ केले आहेत की नाही? हे जाणून घेण्यासाठी ट्विटर आणि इन्स्टाग्रामकडून आता नवीन अपडेट आणण्याची घोषणा केली आहे. ‘शॅडो बॅन’ ही संकल्पना नवीन नसली तरी दोन दिग्गज कंपन्यांनी अशा प्रकारे नवीन अपडेट आणण्याची घोषणा केल्याने संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील काही अकाऊंट्सवर ‘शॅडो बॅन’ केल्याची पुष्टी केली जात आहे.
‘द फ्री प्रेस’च्या संस्थापक बारी वेइस यांनी ‘शॅडो बॅन’बाबत ट्विटरवर आरोप केले आहेत. इलॉन मस्क यांच्या कंपनीने नापसंद असलेले ट्वीट्स ट्रेंडिंग होण्यापासून रोखण्यासाठी काही खात्यांना ‘शॅडो बॅन’ केलं आहे, असा आरोप वेइस यांनी केला. त्यामुळे ‘शॅडो बॅन’ म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. या लेखातून आपण ‘शॅडो बॅन’ संकल्पनेचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
‘शॅडो बॅन’ म्हणजे काय?
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, ‘शॅडो बॅन’ म्हणजे वापरकर्त्याला कोणतीही पूर्वसूचना किंवा कल्पना न देता त्याची पोस्ट जास्त लोकांपर्यंत पोहचण्यापासून रोखणे. त्यासाठी संबंधित वापरकर्त्याच्या प्रोफाइलला अंशतः ब्लॉक करणे किंवा ब्लॅकलिस्ट करणे होय. यामुळे संबंधित खात्यावरून केलेली पोस्ट व्हायरल होण्यावर किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यावर काही प्रमाणात निर्बंध येतात. म्हणजेच तुमचे फॉलोअर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या पोस्ट पाहू शकत नाहीत.
या समस्येचा पाठपुरावा करण्यासाठी इलॉन मस्क यांनी ट्विटरचं नवीन अपडेट आणण्याची घोषणा केली आहे. या नवीन अपडेटमुळे ट्विटरवर “ट्रू अकाऊंट स्टेटस” (True Account Status) दिसणार आहे, या नवीन फीचरसाठी कंपनीकडून सॉफ्टवेअर अपडेटवर काम केलं जात आहे. त्यामुळे आपलं अकाऊंट ‘शॅडो बॅन’ केलं आहे की नाही? याची माहिती वापरकर्त्यांना मिळणार आहे. तसेच अशा प्रकारची बंदी का घालण्यात आली आहे? याची कारणही वापरकर्त्यांना कळू शकणार आहे. इंस्टाग्रामनेदेखील अशाच प्रकारचे अपडेट आणण्याचं जाहीर केलं आहे. पण त्यांनी आपल्या घोषणेत ‘शॅडो बॅन’चा थेट उल्लेख करणं टाळलं आहे.
ही घोषणा का महत्त्वाची आहे?
इन्स्टाग्रामने अद्याप ‘शॅडो बॅन’बाबत कोणतीही थेट भूमिका घेतली नाही. ते सावधपणे पावलं टाकताना दिसत आहेत. पण ट्विटरने तांत्रिकदृष्ट्या मान्य केलं आहे की, काही वापरकर्त्यांवर ‘शॅडो बॅन’ करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ट्विटरने यापूर्वी २०१८ मध्ये शॅडो-बॅनिंगचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते.
त्यावेळी, ट्विटरच्या तत्कालीन धोरण विभागाच्या प्रमुख विजया गड्डे यांनी ‘शॅडो बॅनिंग’चे आरोप फेटाळून लावले होते. विजया गड्डे यांना अलीकडेच इलॉन मस्क यांनी कंपनीतून डच्चू दिला आहे. विजया गड्डे यांनी ब्लॉग पोस्ट शेअर करत लिहिलं, “आम्ही कुणालाही ‘शॅडो बॅन’ करत नाही. तुम्ही फॉलो करत असलेल्या खात्यांवरील ट्वीट कधीही पाहू शकता. आम्ही राजकीय विचारधारा किंवा मतांच्या आधारे कुणाच्याही खात्याला ‘शॅडो बॅन’ करत नाही. “
ट्विटर आता ‘शॅडो बॅन’बाबत भाष्य का करत आहे?
याची दोन प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे ट्विटर हे प्लॅटफॉर्म अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचं प्रमुख केंद्र बनवायचे आहे, असं इलॉन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे. पण जर ट्विटरकडून खरोखरच वापरकर्त्यांचे आवाज आणि मते दडपली जात असतील तर त्यांचं विधान आणि कृती यामध्ये विरोधाभास आहे.
‘द फ्री प्रेस’च्या बारी वेइस यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक ट्विटर थ्रेड पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी ट्विटरकडून काही खात्यांवर ‘शॅडो बॅन’ कसं केलं जातं? याबाबत गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर ‘ट्विटर शॅडो बॅन’ प्रकरण उजेडात आलं. वेइस यांनी एका ट्विटमध्ये लिहिलं की, “नवीन ट्विटर फाइल्सच्या तपासणीत असं आढळून आलं आहे की, ट्विटरचे कर्माचारी नापसंत ट्वीट ट्रेंड होण्यापासून रोखण्यासाठी ब्लॅकलिस्ट तयार करतात. यामुळे संबंधित ट्विटर खात्यांची व्हायरल होण्याची क्षमता मर्यादित केली जाते. हे सर्व गुप्तपणे आणि वापरकर्त्यांना कोणतीही कल्पना न देता केली जाते.”
‘विझिबिलीटी फिल्टरिंग’ काय आहे?
बारी वेइस यांनी पुढे असाही दावा केला की, ट्विटरचे अधिकारी आणि कर्मचारी ‘शॅडो बॅन’ करण्यासाठी “विझिबिलीटी फिल्टरिंग” (Visibility Filtering) किंवा “VF” चा वापर करतात. तथापि, ट्विटरच्या माजी कर्मचारी साची यांनी ट्वीट करत सांगितलं की, एखाद्याच्या टाइमलाइनवरून मजकूर लपवण्यासाठी ‘VF’चा वापर केला जातो. हे टूल वापरकर्त्यांसाठी आधीपासूनच उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
तुमच्यावर शॅडो बॅन आहे का? ते तुम्ही तपासू शकता का?
ट्विटर आणि इन्स्टाग्रामने अद्याप त्यांच्या आगामी ‘टूल्स’ आणि मार्गदर्शक तत्त्वांबद्दल अधिकचा तपशील दिला नाही. पण तुमच्या खात्यावर अशा प्रकारची कारवाई झाली आहे की नाही? हे तपासण्यासाठी तुम्ही काही ‘थर्ड पार्टी टूल्स’चा वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही ‘Shadow ban yuzurisa’ या विनामूल्य संकेतस्थळाचा वापर करून करू शकता.