What is Hajj and Umrah : बॉलिवुड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) UAE त्याचा आगामी चित्रपट ‘डंकी’चं शूटिंग झाल्यानंतर उमराह करण्यासाठी सौदी अरबमधील मक्का येथे पोहचला. शाहरुखचा उमराह करतानाचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे. यात शाहरुख पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. शाहरुख उमराह करण्यासाठी मक्काला गेल्यानंतर उमराह काय आहे? मुस्लीम धर्मात प्रसिद्ध असलेल्या हजपेक्षा तो काय वेगळा आहे, हज आणि उमराहमध्ये नेमका फरक काय? असे अनेक प्रश्नांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. याचाच हा आढावा…
उमराह काय आहे?
मक्कामधील हरम शरीफ यांच्या यात्रेला उमराह म्हटलं जातं. अरबी भाषेत उमराहचा अर्थ ‘लोकसंख्या असलेल्या ठिकाणाचं दर्शन’. ही एक धार्मिक यात्रा आहे. मुस्लीम समाजात आपल्या गुन्ह्यांची/चुकांची माफी मागण्याची संधी उमराहमध्ये मिळते. मुस्लीम समाजात असं मानलं जातं की, उमराह केल्यानंतर संबंधित व्यक्ती त्याच्या पापातून मुक्त होते.
हज किंवा उमराह करणारे श्रद्धाळू काबाच्या चारही दिशांनी प्रदक्षिणा मारतात. काबाचं महत्त्व म्हणजे जगभरातील मुस्लीम काबा ज्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून पाचवेळा नमाज पठण करतात. जे मुस्लीम तवाफ आणि सईची प्रक्रिया पूर्ण करतात त्यांची उमराह पूर्ण झाली असं मानलं जातं.
हज आणि उमराहमध्ये काय फरक?
उमराह आणि हजमध्ये फरक आहे. इस्लाममध्ये उमराह ‘सुन्नत’ आहे आणि हज प्रत्येक मुस्लीम व्यक्तीचं कर्तव्य आहे. एखाद्या मुस्लीम व्यक्तीवर कोणतंही कर्ज, उधारी अथवा जबाबदाऱ्या शिल्लक राहिल्या नसतील तर त्या व्यक्तीने एकदा हज करणे गरजेचे असते. मात्र, उमराहबाबत अशी कोणतीही अट नाही. संबंधित व्यक्तीच्या इच्छेनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार ती व्यक्ती उमराह करू शकते.
हेही वाचा : विश्लेषण : महिलांना मशिदीत प्रवेशास बंदी घालता येते का? कुराण आणि संविधान काय सांगतं?
हज केवळ बकरी इदसारख्या विशिष्ट दिवशीच करता येते. मात्र, उमराह कोणत्याही महिन्यात करता येते. उमराह काही तासांमध्ये होणारा धार्मिक विधी आहे. मात्र, हज ही अनेक दिवस लागणारी प्रक्रिया आहे.