सागर नरेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही महिन्यात वातावरणातील बदलामुळे अवकाळी पाऊस, तापमानात घट आणि अचानक तापमानात वाढ दिसून आली आहे. अनेक घटक तापमानावर परिणाम करत असले तरी सरासरी तापमानात विशेष बदल झालेले नाहीत. मात्र तरीही बसत असलेल्या उष्णतेच्या झळा तापमानामुळे नव्हे तर शहरी उष्णता अर्थात अर्बन हीटमुळे जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

वातावरणात बदल कशामुळे होत आहेत ?

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि विशेषतः ठाणे जिल्ह्यात उष्णतेमुळे नागरिकांची काहिली होत असल्याचे चित्र आहे. घरांपासून प्रत्येक ठिकाणी घामांच्या धारांमध्ये रहावे लागत असल्याचे चित्र आहे. तापमान चाळीशीचा आत असतानाही वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेमुळे अधिकचे तीन ते चार अंश सेल्सियस तापमान जाणवते आहे. त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो आहे. आर्द्रता आणि दमटपणा ४० टक्क्यांपर्यंत वाढल्याने अधिकची उष्णता जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यात समुद्रापासून जितके दूर जाणार तितकी तापमानात वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे समुद्रापासूर दूर असलेल्या मुरबाड आणि कर्जत तसेच बदलापूर, कल्याण, डोंबिवली भागात तापमानात वाढ दिसून येते आहे.

शहरीकरणाचा तापमानावर परिणाम झाला आहे का ?

गेल्या काही वर्षात मुंबईजवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. ठाणे, डोंबिवली, डोंबिवलीतील २७ गावे आणि परिसर, खोणी, अंबरनाथ, कल्याण, बदलापूर या शहरांमध्ये वेगाने गृहसंकुले उभी राहिली. अनेक मोकळ्या जमिनी, मैदाने यांची जागा इमारतींनी घेतली. इमारतींचा, घरांचा पुनर्विकास, रस्ते रुंदीकरण, नवे रस्ते यांमुळे जुने वृक्ष, झाडे काढण्यात आली. परिणामी मोकळ्या जागा, झाडे यांची संख्या कमी होऊन कॉंक्रिटच्या आच्छादनांचा परिसर वाढला. त्यामुळे शहरी उष्णता अर्थात अर्बन हिट वाढत असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे.

विश्लेषण: अमेरिकेच्या एका चुकीमुळे सोन्याचा भाव ६५ हजारांवर पोहोचण्याची शक्यता; वाचा स्पेशल रिपोर्ट

शहरी उष्णता अर्थात अर्बन हीट नक्की काय आहे ?

गेल्या काही वर्षात जागतिक स्तरावर शहरी उष्णता अर्थात अर्बन हीट या संकल्पनेवर चर्चा केली जाते आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शहराच्या ज्या क्षेत्रात एक ते दोन लाख लोकसंख्या वास्तव्यास होती. त्याच जागेवर आता पाच ते आठ किंवा दहा लाख लोकसंख्या विस्थापीत झाली आहे. वाढलेल्या लोकसंख्येसाठी कॉंक्रिटच्या इमारती, रस्ते उभारले गेले. मोकळ्या जागा व्यापल्या गेल्या. नैसर्गिकरित्या हवा प्रवाहित होण्याचे मार्ग अडले. परिणामी निसर्गात तयार होणारा गारवा संपला. रस्ते, कॉंक्रीटचे आच्छादन तापू लागले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवू लागली. हे शहरीकरणामुळे वाढलेले आणि जाणवत असलेले तापमान म्हणजेच शहरी उष्णता किंवा अर्बन हीट होय. गेल्या काही वर्षात या अर्बन हीट आयलँडवर अनेक ठिकाणी चर्चाही झाली आहे.

उष्णता रोखण्याचे कोणते पर्याय संपुष्टात आले ?

पूर्वी मोकळ्या जागा मोठ्या प्रमाणावर होत्या. काही शहरांमध्ये मैदाने, हिरव्या मोकळ्या जागा, पाणथळ जागा, दलदलीच्या जागा होत्या. दलदल आणि पाणथळीच्या जागांवर पाणी असल्याने येथील तापमान काही अंश कमी असायचे. सोबतच मोकळ्या जागांवर असलेले गवत, झाडे तापमान नियंत्रित करायचे. त्यामुळे उष्ण हवेचे प्रमाण कमी होत होते. मात्र अशा जागा आता नष्ट झाल्या. रस्त्यांच्या कडेला असलेली झाडे सावलीने रस्त्याचे तापमान नियंत्रित करायचे. आता रुंदीकरणात ही झाडे तोडली गेली. त्यात रस्ते कॉंक्रिटचे झाले. हे कॉंक्रिट उष्णता शोषून पुन्हा सोडते. परिणामी परिसरातील तापमानात वाढ होते. विजेच्या तारांना तुटण्यापासून वाचवण्यासाठी ऐन उन्हाळ्यात झाडे तोडली जात आहेत. सावली नसल्याने जमीन तापते आणि पर्यायाने तापमान वाढते. शेजारी शेजारी गृहसंकुलातील इमारतींमुळे वाहत्या हवेला प्रतिबंध होतो. आजही मोकळ्या जागी वाहती हवा जाणवते. ती शहरात जाणवत नाही.

वाढलेले तापमान कुठे जाणवते आहे ?

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली जवळील २७ गावे आणि परिसर येथे गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येने गृहसंकुले उभी राहिली आहेत. कॉंक्रिटच्या रस्त्यांचे जाळेही येथे तयार झाले आहे. शिळफाटा, पलावा, महापे रस्ता, काटई या भागात तापमानात मोठी वाढ पहायला मिळते आहे. तशीच स्थिती कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातही जाणवते आहे. दहा वर्षांपूर्वी या भागातील भौगोलिक स्थिती आणि आजहे नागरीकरण यातच या उष्णतेची कारणे दिसून येतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is urban heat temperature increasing in cities reasons print exp pmw