अमेरिका आपल्या शस्त्रसाठ्यात वाढ करत आहे. अमेरिकेने आपल्या नौदल शस्त्र तंत्रज्ञानामध्येही प्रगती केली आहे. अमेरिकी नौदलाने समुद्रात नुकतेच आपले महाशक्तिशाली ‘हेलिओस’ शस्त्र उतरवले असून, त्याची चाचणीही यशस्वी झाली आहे आणि त्यामुळे जगाची चिंता वाढली वाढली आहे. हेलिओस हे एक लेसर शस्त्र आहे, ज्याची अमेरिकेने आपल्या युद्धनौकेतून यशस्वीरीत्या चाचणी घेतली आहे. काय आहे अमेरिकेचे नवीन महाशक्तिशाली लेसर शस्त्र? या शस्त्राची यशस्वी चाचणी जगासाठी चिंतेचा विषय आहे का? हेलिओस शस्त्र किती शक्तिशाली आहे? त्याविषयी जाणून घेऊ…
काय आहे ‘हेलिओस लेसर वेपन’?
लॉकहीड मार्टिनने विकसित केलेल्या लेसर शास्त्राचे नाव हेलिओस लेसर सिस्टीम, असे आहे. हे शस्त्र ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी विकसित केले गेले आहे. अलीकडच्या काही वर्षांत अमेरिकेने अनेक ड्रोन हल्ले हाणून पाडले आहेत. आता ‘हेलिओस’ची यशस्वी चाचणी अमेरिकेची ताकद आणखी वाढल्याचे सूचित करते. २०२४ मध्ये ‘USS Preble (DDG-88)’वर या प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. २०२४ च्या ऑपरेशनल टेस्ट अॅण्ड इव्हॅल्युएशन विभागाच्या (DOT&E) अहवालानुसार, सेंटर फॉर काउंटर मेझर्स (CCM)ने ‘हेलिओस’ची कार्यक्षमता आणि कार्यप्रदर्शन प्रमाणित करण्यासाठी प्रतिमा आणि डेटा संकलित करून, अमेरिकी नेव्हीला पाठिंबा दिला.
अहवालात असे म्हटले आहे, “सेंटर फॉर काउंटर मेझर्सने ड्रोनविरुद्ध इंटिग्रेटेड ऑप्टिकल डॅझलरसह हेलिओसची कार्यक्षमता, कार्यप्रदर्शन व क्षमता सत्यापित करण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी USS Preble (DDG 88)वर नौदलाच्या प्रात्यक्षिकाचे समर्थन केले. सिस्टीम कार्यक्षमतेच्या मूल्यमापनास समर्थन देण्यासाठी सेंटर फॉर काउंटर मेझर्सने प्रतिमा गोळा केल्या. ‘USS Preble’ला १२ ऑक्टोबर २०२४ रोजी जपानच्या योकोसुका येथे अग्रेषित करण्यात आले होते, ते इंडो-पॅसिफिक प्रदेशात सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी सामील झाले होते. हेलिओस-सुसज्ज Preble ची तैनाती या प्रदेशात लेसर शस्त्रांचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करते. कारण- या प्रदेशात नौदलाला ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या वाढत्या धोक्यांना सतत तोंड द्यावे लागते. असे असले तरीही इंडो-पॅसिफिक प्रदेशात हेलिओसची चाचणी घेण्यात आली होती की नाही याची पुष्टी अद्याप नौदलाने केलेली नाही.
हेलिओस कशासाठी सक्षम?
लॉकहीड मार्टिनने विकसित केलेली हेलिओस ही उच्च ऊर्जा असलेली लेसर प्रणाली आहे, जी शत्रूच्या धोक्यांना दोन पद्धतींद्वारे निष्फळ करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. या प्रणालीत हार्ड किल आणि सॉफ्ट किल अशा दोन पद्धतींचा समावेश आहे. हार्ड किल पद्धत उच्च-तीव्रतेच्या लेसर बीमचा वापर करून, थेट लक्ष्य नष्ट करते; तर सॉफ्ट किल पद्धत शत्रू प्रणालीच्या इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये व्यत्यय निर्माण करते आणि त्यांना अक्षम करते. १२० ते १५० किलोवॉट्सच्या दरम्यान संभाव्य सुधारणांसह शस्त्र प्रणाली ६० किलोवॉट्सवर कार्य करते.
हेलिओस हे ‘USS Preble’च्या फॉरवर्ड पेडेस्टलवर स्थित आहे. यावर पूर्वी Mk 15 फॅलेन्क्स क्लोज-इन वेपन्स सिस्टीम (CIWS) ठेवले होते. लेसर शस्त्र प्रणाली लक्ष्यावर ऊर्जा केंद्रित करते आणि त्यामुळे ड्रोन, क्षेपणास्त्र किंवा अन्य हवाई धोक्यांना उष्ण करून ज्वलनशील करते. हेलिओस अमेरिकी नेव्हीच्या एजिस कॉम्बॅट सिस्टीममध्ये समाकलित केले गेले आहे; ज्यामुळे ते जहाजाच्या संपूर्ण संरक्षण नेटवर्कचा एक भाग म्हणून कार्य करू शकते. २०२२ मध्ये लॉकहीड मार्टिनचे कार्यकारी जीनाइन मॅथ्यू यांनी या एकत्रीकरणाचे महत्त्व सांगितले, “हेलिओसबद्दल मनोरंजक गोष्ट म्हणजे ती केवळ एक स्वतंत्र प्रणाली नाही.”
हेलिओस कशापासून बचाव करेल?
सध्या जगभरात लहान हवाई धोक्यांचे संकट वाढताना दिसत आहे. अशातच अलीकडे अमेरिकेने हेलिओसची चाचणी केली आहे. यूएस नेव्ही अशा धोक्यांचा सक्रियपणे सामना करत आहे, विशेषत: रेड सीमध्ये. या भागात अमेरिकन युद्धनौका ड्रोन संरक्षण कार्यात गुंतल्या आहेत. लेसर स्ट्रक्चरल घटकांमध्ये जलद उष्णता आणि शत्रूचे ड्रोन कमकुवत करण्याची क्षमता असल्यामुळे ड्रोनविरुद्ध ही यंत्रणा फायदेशीर ठरते. हेलिओसच्या थेट आघातामुळे शत्रूचे ड्रोन अक्षम होतात किंवा हवेत जळून खाक होतात.
लेसर शस्त्रांचे भविष्य
हेलिओस हा ऑप्टिकल डॅझलिंग इंटरडिक्टर, नेव्ही (ODIN) व हाय एनर्जी लेझर काउंटर अँटी-शिप क्रूझ मिसाईल प्रोजेक्ट (HELCAP) यांसारख्या इतर लेसर प्रणालींसह निर्देशित ऊर्जा शस्त्रे विकसित करण्याच्या यूएस नेव्हीच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे. प्रगत जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्र धोक्यांचा सामना करण्यासाठी ३०० हून अधिक किलोवॉट लेसर शस्त्र विकसित करण्याचे HELCAP चे उद्दिष्ट आहे. नौदलाच्या बजेट दस्तऐवजात HELCAP च्या उद्दिष्टांची रूपरेषा देण्यात आली आहे. “HELCAP उर्वरित तांत्रिक आव्हानांना संबोधित करून क्रॉसिंग अँटी-शिप क्रूझ मिसाइल्स (ASCM) ला पराभूत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करील.”
HELCAP आर्थिक वर्ष २०२५ मध्ये व्हाईट सँड्स मिसाईल रेंजवर चाचणी पूर्ण करण्यासाठी सज्ज असताना, त्याचा परिणाम लेसर वेपन टेस्टबेड (LWT) संबंधी भविष्यातील निर्णयांची माहिती देतील. नौदल हेलिओसला अतिरिक्त जहाजांसह समाकलित करण्याचा विचार करीत आहे, ज्यात Arleigh Burke- DDG 81, 89, 122, 124 व 127 यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त लेसर शस्त्रे क्षेपणास्त्र इंटरसेप्टर्ससाठी एक किफायतशीर पर्याय आहे, ज्याची निर्मिती करणे महाग आणि वेळखाऊ असू शकते.
हेलिओसला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार?
हेलिओसची आश्वासक क्षमता असूनही, लेसर शस्त्रास्त्रांच्या विकासासमोर वीजपुरवठ्याच्या समस्यांसह अनेक आव्हाने आहेत. कारण- लेसरकरिता जहाजांवर उच्च ऊर्जेची आवश्यकता असते. धुके, वारा व इतर हवामान घटक यांसारख्या पर्यावरणीय परिस्थितीदेखील लेसरच्या प्रभावीतेवर परिणाम करू शकतात. यूएस डिपार्टमेंट ऑफ डिपार्टमेंटने उच्च ऊर्जा लेसर संशोधनामध्ये दरवर्षी एक अब्ज डॉलर्स गुंतवले आहेत; परंतु प्रगती अपेक्षेपेक्षा कमी आहे. नौदलाने आधीच आठ ऑप्टिकल डॅझलिंग इंटरडिक्टर, नेव्ही (ODIN) लेझर डॅझलर्स तैनात केले आहेत, जे लक्ष्य पूर्णपणे नष्ट करण्याऐवजी शत्रूच्या सेन्सर्समध्ये व्यत्यय आणण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
लेसर आधारित शस्त्रे विकसित करणारी अमेरिका एकटी नाही. चीनही आपल्या लष्कराला उच्च ऊर्जा लेसर शस्त्रांसह सुसज्ज करण्यावर काम करीत आहे. याचे उदाहरण म्हणजे तंत्रज्ञानाने युक्त असलेले Type-071 Amphibious Assult Ship चे अलीकडेच समोर आलेले छायाचित्र. विश्लेषकांचा असा अंदाज आहे की, चीनचे सैन्य नजीकच्या भविष्यात त्यांच्या टाईप-075 व टाईप-055 युद्धनौकांवर ही यंत्रणा तैनात करू शकते.