अपघाती किंवा संशयास्पद वा तत्सम कारणामुळे झालेल्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पारंपारिक पद्धतीने केले जाणारे शवविच्छेदन आता आभासी पद्धतीने (व्हर्च्युअल ऑटोप्सी) करण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याद्वारे मृतदेहाची चिरफाड न करता शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याने वेळेची बचत आणि मृताच्या नातेवाईकांकडून होणारा विरोध संपुष्टात येणार आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) या तंत्रज्ञानाचा वापर केला असून आता नागपूर एम्समध्ये लवकरच ते सुरू होणार आहे.
दिल्ली एम्समधील प्रकल्प काय?
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) संयुक्त विद्यमाने काही वर्षांपूर्वी दिल्ली एम्समध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘व्हर्च्युअल ऑटोप्सी’ पद्धतीने शवविच्छेदन केले जाते. यासाठी ‘आयसीएमआर’ने अर्थसहाय्य केले आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट असलेल्या बहुतांश प्रकरणात एमआरआय, सीटी स्कॅनसह इतर यंत्रांच्या मदतीने शवविच्छेदन केले जात असल्याचे दिल्ली एम्सच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक यादव यांनी नागपूर एम्समध्ये झालेल्या राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या परिषदेत सांगितले.
हेही वाचा : विश्लेषण : ‘एफडी’ मोडण्याची वेळ मुंबई महापालिकेवर का आली? राखीव निधीचा वापर योग्य की अयोग्य?
शवविच्छेदन कशासाठी केले जाते ?
मृत्यूचे नेमके कारण जाणण्यासाठी शवविच्छेदन केले जाते. ही एक प्रकारची शस्त्रक्रियाच आहे. यासाठी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची परवानगी आवश्यक आहे. खून, अनोळखी मृतदेहासह इतर काही प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारीही शवविच्छेदनाची परवानगी देतात. शवविच्छेदना दरम्यान मृतदेहाच्या शरीरातील विविध भागाची तपासणी करून न्यायवैद्यकशास्त्र तज्ज्ञ मृत्यूची कारणे शोधण्याचा प्रयत्न करतात.
‘व्हर्च्युअल ऑटोप्सी’ म्हणजे काय?
‘व्हर्च्युअल ऑटोप्सीला’ व्हर्टोप्सीदेखील म्हणतात. या प्रक्रियेत यामध्ये सीटी स्कॅन, एमआरआयसह इतर अद्ययावत यंत्रांचा वापर केला जातो. त्यामुळे मृतदेहावर न्यायवैद्यकशास्त्र तज्ज्ञांना शस्त्रक्रिया वा चिरफाड करावी लागत नाही. त्यामुळे वेळ कमी लागतो. दिल्ली एम्समध्ये हा प्रकल्प यशस्वी ठरला असून नागपूर एम्सलाही या पद्धतीच्या शवविच्छेदनासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सूचना दिली आहे.
हेही वाचा : विश्लेषण : गोबी मंच्युरिअरनवर गोव्यातील काही शहरांमध्ये बंदी का?
नव्या तंत्रज्ञानाचा फायदा काय?
यंत्रांच्या सहाय्याने शरीराचे स्कॅनिंग करून शरीराचे विच्छेदन न करता बाह्य व अंतर्भागातील जखमांचे निरीक्षण करून मृत्यूच्या कारणांची अधिक विस्तृत व काटेकोर मीमांसा केली जाते. त्यामुळे परंपरागत शवविच्छेदनासाठी लागणारा वेळ वाचतो. शिवाय शवविच्छेदन करणाऱ्या न्यायवैद्यकशास्त्र तज्ज्ञांवरील मानसिक व शारीरिक ताणही हलका होतो.
सूक्ष्म निदानासाठी याचा फायदा होतो का?
एखाद्या व्यक्तीचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला असल्यास ‘व्हर्च्युअल ऑटोप्सी’च्या मदतीने सीटी स्कॅन वा एमआरआयकडून या व्यक्तीच्या शरीरात गोळी कोणत्या मार्गातून गेली, त्यातून कोणत्या अवयवांना इजा होऊन रक्तस्राव झाला, रक्त कुठे व किती जमा झाले आदी सूक्ष्म कारणे स्पष्ट होतात. हाडे मोडली असल्यास वा मेंदूला इजा असल्यास त्याचीही माहिती मिळते. ह्रदयविकाराने मृत्यू झाला असल्यास संबंधित मृतदेहाची सीटी एन्जिओग्राफी केली जाते. तर अपघाती मृत्यूबाबतही याच पद्धतीचे मृत्यूचे अचूक कारण शोधण्यासाठी लाभदायक आहे.
हेही वाचा : विश्लेषण: हिमालयात यंदा बर्फ कमी पडण्याची कारणे काय?
अडचणी काय येऊ शकतात?
राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या नागपूरच्या मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांत केंद्र सरकारच्या अखत्यारितील नागपूर एम्समध्ये क्षमतेच्या तुलनेत जास्त रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयांत आजही अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने सीटी स्कॅन, एमआरआय तपासणी केली जाते. परंतु बाह्यरुग्ण विभागातील रुग्णासाठी प्रतीक्षा यादी असल्याने त्यांना बराच काळ थांबावे लागते. दरम्यान या रुग्णाच्याच झटपट क्ष-किरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयांत यंत्र गरजेनुसार वाढवले जात नाही. अशा स्थितीत शवविच्छेदनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यासाठी उपलब्ध यंत्राचा प्राधान्याने वापर करावा लागेल व गरजू रुग्णांच्या तपासणीला विलंब होईल. यातून नवे वाद उद्भवण्याची शक्यता आहे.