ज्ञानवापी मशिदीच्या आतील तळघराला ‘व्यासजी का तहखाना’ का म्हणतात? वाराणसी कोर्टाने काय आदेश दिले? आणि त्यावर जिल्हा न्यायालय काय म्हणाले? वाराणसी जिल्हा न्यायालयाने बुधवारी (३१ जानेवारी) ज्ञानवापी मशीद संकुलाच्या दक्षिणेकडील तळघरात हिंदूंना पूजा करण्यास परवानगी दिली. हा हिंदूंच्या बाजूने मोठा निर्णय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आदेशात असे लिहिले आहे, “वाराणसी जिल्हाधिकाऱ्यांना वाराणसी जिल्ह्यातील पोलीस स्टेशन चौक येथील वादग्रस्त असलेल्या वस्तीवरील भूखंड क्र. ९१३० येथे काशी विश्वनाथ ट्रस्ट यांनी नियुक्त केलेल्या पुजाऱ्याकडून दक्षिणेकडच्या तळघरातील मूर्तींची पूजा आणि राजभोग करण्याचे निर्देश दिले जात आहेत. त्यासाठी सात दिवसांत लोखंडी बॅरिकेडिंग आणि इतर गोष्टींसह योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे.”

वाराणसी जिल्हा प्रशासनाने २४ जानेवारी रोजी ज्ञानवापी मशीद संकुलाचे दक्षिणेकडील तळघर ताब्यात घेतले होते. १७ जानेवारीला वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करीत हे तळघर ताब्यात घेण्यात आले. त्यात त्यांनी वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना तळघराचा रिसीव्हर म्हणून नियुक्त केले होते. आचार्य वेद व्यास पीठ मंदिराचे मुख्य पुजारी शैलेंद्र पाठक व्यास यांनी ही याचिका दाखल केली होती.

‘व्यासजी का तहखाना’ म्हणजे काय?

(छायाचित्र-इंडियन एक्स्प्रेस)

‘व्यासजी का तहखाना’ हे मशिदीच्या बॅरिकेडेड कॉम्प्लेक्सच्या दक्षिणेकडील भागात गर्भगृहाजवळील काशी विश्वनाथ संकुलाच्या आतील नंदीच्या पुतळ्यासमोर स्थित आहे. तळघरा (तहखाना)ची उंची सुमारे सात फूट आणि क्षेत्रफळ सुमारे ९०० चौरस फूट आहे. याचिकाकर्ते शैलेंद्र पाठक व्यास यांचे वकील सुभाष चतुर्वेदी यांनी सांगितले की, व्यास कुटुंबीय २०० वर्षांहून अधिक काळ तळघरामध्ये प्रार्थना आणि इतर विधी करीत होते. परंतु, डिसेंबर १९९३ मध्ये ही प्रथा बंद करण्यात आली. ते म्हणाले की, हे तळघर नंदी पुतळा आणि मशिदीच्या वुझूखानाच्या दरम्यान स्थित आहे. जिथे हिंदू याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की, न्यायालयाने अनिवार्य केलेल्या व्हिडीओग्राफिक सर्वेक्षणादरम्यान २०२२ मध्ये येथे शिवलिंग सापडले होते.

इथे पूजेला बंदी का होती?

डिसेंबर १९९३ मध्ये तळघरामध्ये व्यासजींच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे येथे होणारी प्रार्थना थांबवावी लागली, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला आहे. ४ डिसेंबर १९९३ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर कल्याण सिंग सरकार बरखास्त करण्यात आले होते. त्यादरम्यान लागू करण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीचा एक वर्षाचा कालावधी संपवून समाजवादी पक्षाच्या मुलायम सिंह यादव यांनी यूपीमध्ये सरकार स्थापन केले.

“मुलायम सिंह यादव सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली ‘व्यासजी का तहखान्या’त पूजा करण्यास मनाई केली. त्याआधी पंडित सोमनाथ व्यास यांनी येथे नियमितपणे हिंदू पूजाविधी पार पाडल्या होत्या,” असे चतुर्वेदी म्हणाले. चतुर्वेदी म्हणाले की, तहखान्यात भगवान हनुमान, गणेश, शिव आणि इतर देवतांच्या मूर्तींची पूजा केली जात होती. हिंदू कथांद्वारे उपदेश दिला जात होता. नुकत्याच झालेल्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय)च्या सर्वेक्षणादरम्यानही ‘तहखान्या’त विविध हिंदू देवतांच्या मूर्ती आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

याचिकाकर्ते कोण आहेत?

याचिकाकर्ते शैलेंद्र पाठक व्यास हे पंडित सोमनाथ व्यास यांचे नातू आहेत. शैलेंद्र सध्या वाराणसीच्या शिवपूर भागातील आचार्य वेद व्यास पीठाचे मुख्य पुजारी आहेत. त्यांच्या कुटुंबाला तहखान्यात पूजेसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे हे ठिकाण ‘व्यासजी की गड्डी’ म्हणून ओळखले जात असे. ज्ञानवापी मशिदीशी संबंधित खटल्यातील हिंदू बाजूचे वकील मदन मोहन यांनी सांगितले की, १८०९ मध्ये ब्रिटिशांच्या काळात उपासना आणि इतर धार्मिक विधींसाठी व्यास कुटुंबाला तहखाना देण्यात आला होता.

हेही वाचा : “ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर हिंदू मंदिर अस्तित्वात होते”; भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून इतिहासातील पुरावे सादर

“सोमनाथजी पुजारी होते. ते ज्ञानवापी परिसरात राहत होते. त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून तहखान्यात धार्मिक विधी करीत होते,” असे मदन मोहन म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is vyasji ka tehkhana in gyanvapi rac