संजय जाधव
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि युनिसेफच्या ताज्या अहवालात ‘वॉश’ उपायांवर भर देण्यात आला आहे. या साध्या सोप्या उपायांमुळे कोट्यवधी लोकांचा जीव वाचवण्यासोबत अब्जावधी डॉलरचा खर्च कमी होईल, असा संघटनेचा दावा आहे. वॉश म्हणजे वॉटर, सॅनिटेशन आणि हायजीन (पाणी, साफसफाई आणि व्यक्तिगत स्वच्छता). आरोग्य केंद्रांमध्ये वॉशच्या उपायांचा वापर केल्यास जीवघेणा संसर्ग रोखण्यासोबत आणि सध्या वाढत चाललेला प्रतिजैविक प्रतिरोध कमी होण्यास मदत होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे. सर्व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात यामुळे यश मिळू शकते, असा दावा केला जात आहे.
आरोग्य सुविधांचे दुखणे काय?
जगभरात मध्यम व अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये दर वर्षी सुमारे ८० लाख लोकांचा मृत्यू निकृष्ट दर्जाच्या आरोग्य सुविधांमुळे होतो. तसेच, खराब आरोग्य सुविधांमुळे नागरिक आजारी पडणे आणि त्यांचा मृत्यू होणे यातून दर वर्षी सुमारे सहा लाख कोटी डॉलरचे आर्थिक नुकसान होते. दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी पाणी, सफाई, व्यक्तिगत स्वच्छता, कचरा आणि वीज या गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आरोग्य सुविधांमध्ये हात धुण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था तयार करणे, पिण्यासाठी पाणी ठेवणे, वारंवार सफाई, स्वच्छतागृहांची नियमित देखभाल, नियमितपणे पाणीपुरवठा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या अतिशय साध्या गोष्टी असूनही त्या नसल्याने आरोग्य सुविधांचा दर्जा ढासळत आहे. याच जोडीला आरोग्य कर्मचाऱ्यांचे वर्तन आणि रुग्णांचा सन्मान या दोन बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. दुर्दैवाने या साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य सुविधांचा दर्जा ढासळत आहे.
आर्थिक तरतूद किती करावी लागणार?
जगातील मागास देशांमध्ये वॉश उपायांचा वापर करावयाचा झाल्यास त्याचा सरासरी खर्च अतिशय कमी असणार आहे. तो दर वर्षी प्रतिव्यक्ती सुमारे दोन रुपये अथवा सध्याच्या आरोग्य खर्चाच्या केवळ सहा टक्के असेल. खर्च कमी असण्यासोबत त्यातून होणारे फायदे मोठे आहेत. भविष्यातील महासाथी, तापमान बदल आणि भूराजकीय अस्थिरता ही संकटे जगासमोर आहेत. यामुळे आरोग्य सुविधांमध्ये गुंतवणूक ही सध्या आवश्यक बनली आहे. असे असतानाही केवळ १२ टक्के देशांकडूनच आरोग्य सुविधांमध्ये वॉशसाठी आवश्यक निधीपैकी ७५ टक्क्यांहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
नेमक्या समस्या काय आहेत?
प्रसूतिवेळी माता आणि मुलावर वॉशसह वीजसेवेचा मोठा परिणाम होतो. या गोष्टी नसल्यास दोन्हींच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तब्बल एक कोटीहून अधिक महिला व मुलींनी वॉश सेवांना प्राधान्य देण्याचे मत नोंदवले आहे. प्रतिबंध करता येईल, अशा आजारांमुळे पाच वर्षांचे होण्याआधीच सुमारे ५० लाख मुलांचा मृत्यू होतो. हे अतिशय धक्कादायक वास्तव आहे. हे मृत्यू रोखता येणे शक्य आहे. केवळ हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी आणि साबण यांसारख्या दोन साध्या गोष्टींचा वापर केल्यासही चित्र बदलू शकते. व्यक्तिगत स्वच्छता आणि सफाई या गोष्टींमध्ये सुधारणा झाल्यास हे मृत्यू कमी होऊ शकतात.
बालमृत्यू रोखण्यास मदत होणार का?
आफ्रिका उपखंडात ४३ टक्के नवजात बालकांचा मृत्यू होतो. तिथे केवळ निम्म्याच आरोग्य सुविधांमध्ये पाण्याची सुविधा आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी शाश्वत विकास उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. परंतु, ते गाठणे सध्या तरी दृष्टिपथात नाही. यासाठी वॉश उपाय अतिशय महत्त्वाचे ठरतील. त्यासाठी काही देशांनी पावले उचलली आहेत. त्याचे परिणाम आगामी काळात दिसून येतील. असे असले, तरी अशा देशांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढल्यास आगामी काळात आरोग्य सुविधेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली पाहायला मिळेल.
डब्ल्यूएचओकडून कोणती पावले?
डब्ल्यूएचओ आणि युनिसेफकडून वॉश उपायांचा अंगीकार जास्तीत जास्त देशांनी करावा, यासाठी प्रयत्न केले जात आहे. आरोग्य नियोजनात कचरा व्यवस्थापन आणि वीज सेवांचा समावेश करायला हवा. आरोग्य कर्मचाऱ्यांना वॉशचा वापर आणि देखभालीसाठी सक्षम करणे आणि स्वच्छतेच्या उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, यासाठी पावले उचलली जात आहेत. याबाबत संघटनेने तीसहून अधिक देशांची परिषद घेतली. त्यात आरोग्य सुविधांमध्ये कचरा व्यवस्थापन आणि वीज सुविधा यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. या देशांनी यासाठी पुढाकार घ्यावा, या दृष्टीने संघटनेकडून प्रयत्न सुरू आहेत.
sanjay.jadhav@expressindia.com