प्रशांत केणी
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट काही दिवसांवर येऊन ठेपले असताना बंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) झालेल्या यो-यो तंदुरुस्ती चाचणीत पृथ्वी शॉ अनुत्तीर्ण झाला, तर हार्दिक पंड्या उत्तीर्ण झाला. ‘आयपीएल’मध्ये धडाकेबाज फलंदाज पृथ्वी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो, तर अष्टपैलू हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. या निमित्ताने यो-यो चाचणी कशी घेतात, त्याचे निकष काय असतात आणि हार्दिक-पृथ्वीला नेमक्या कोणत्या निकषाआधारे उत्तीर्ण-अनुत्तीर्ण ठरवण्यात आले, हे जाणून घेऊया.
क्रिकेटमधील यो-यो चाचणी कशी असते?
यो-यो चाचणी ही धावण्याच्या तंदुरुस्तीवर आधारित चाचणी आहे. ही पूर्ण प्रक्रिया सॉफ्टवेअरवर आधारित असून, वेग-स्तराच्या नोंदींआधारे निकाल दिला जातो. ज्यामध्ये खेळाडूला २० मीटर अंतरावर असलेल्या दोन शंकूंदरम्यान धावत फेरी मारणे आवश्यक असते. म्हणजेच अ, ब आणि क या तीन ठिकाणी शंकू असल्यास अ ते ब हे पाच मीटर अंतर चालल्यानंतर, ब ते क हे २० मीटर अंतर धावायचे असते. खेळाडूला ‘बीप’च्या आवाजाने सुरुवात करायची असते आणि दुसऱ्या ‘बीप’च्या आधी त्याला शंकूपर्यंत पोहोचावे लागते. तिथे पोहोचताच खेळाडू मागे परततो आणि तिसऱ्या ‘बीप’ आवाजापूर्वी एक फेरी पूर्ण करतो. मग प्रत्येक फेरीदरम्यान १० सेकंदांचा विश्रांतीचा कालावधी असतो. २३ ही वेगाच्या स्तराची (speed level) सर्वोच्च पातळी मानली जाते. खेळाडू पाचव्या स्तरापासून सुरुवात करतो, ज्यात एका फेरीचा समावेश असतो. त्यानंतर नवव्या स्तरावर एक फेरी, ११व्या स्तरावर दोन फेऱ्या, १२व्या स्तरावर तीन फेऱ्या, १३व्या स्तरावर चार फेऱ्यांचा समावेश असतो. त्यानंतर १४व्या स्तरापासून प्रत्येकी आठ फेऱ्यांचा समावेश असतो. ही प्रत्येकी फेरी ४० मीटर्स अंतराची असते. जसजसा खेळाडू पुढच्या स्तरावर जातो, प्रत्येक फेरी धावत पूर्ण करण्यासाठी उपलब्ध वेळ कमी होत जातो, ज्यामुळे पात्रता गुणसंख्या गाठणे आव्हानात्मक ठरते.
‘बीसीसीआय’कडून यो-यो चाचणी का घेतली जाते?
खेळाडू खेळ खेळण्यासाठी तंदुरुस्त आहेत का, याची चाचपणी करण्यासाठी ही चाचणी केली जाते. ‘बीसीसीआय’च्या वार्षिक करारबद्ध, दुखापतग्रस्त किंवा संभाव्य खेळाडूंसाठी ही चाचणी अनिवार्य आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा मालिकेआधी खेळाडूंची ही चाचणी केली जाते.
यो-यो चाचणी उत्तीर्ण होण्याचे ‘बीसीसीआय’चे निकष काय आहेत?
खेळाडूंना यो-यो चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी ‘बीसीसीआय’ने सध्या १६.५ पात्रता वेग स्तर निश्चित केला आहे. म्हणजेच तो खेळाडू १,१२० मीटर अंतर कापतो. खेळाडूंचा वेग आणि स्तर हा तिसरी ताकीद मिळेपर्यंत नोंदवला जातो. खेळाडू ‘बीप’ वाजण्याच्या आत फेरी पूर्ण करू शकला नाही, तर ताकीद मिळते. यापैकी तिसरी आणि अखेरची ताकीद मिळताच खेळाडू या चाचणीत अनुत्तीर्ण ठरतो.
पृथ्वी यो-यो चाचणी कसा अनुत्तीर्ण झाला, तर हार्दिक कसा उत्तीर्ण झाला?
पृथ्वी शॉ धावांसाठी झगडताना गेल्या काही महिन्यांमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्या तंदुरुस्तीचा मुद्दाही ऐरणीवर आहे, ज्यामुळे तो भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरत आहे. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आगामी ‘आयपीएल’ खेळण्यासाठी जी यो-यो चाचणी झाली, त्यात पृथ्वी अपयशी ठरला. कारण त्याला १५ हा वेग-स्तरच गाठता आला. परंतु तरीही त्याला ‘आयपीएल’ खेळता येणार आहे. हार्दिकने मात्र १७हून अधिक वेग-स्तर गाठल्याने तो ही चाचणी उत्तीर्ण झाला.
विश्लेषण : ‘मंकडिंग’ला अधिकृत अधिष्ठान; ‘एमसीसी’चे नवे नियम काय आहेत?
यो-यो चाचणीचे अन्य देशांत निकष काय आहेत?
यो-यो चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक देशांनी स्वतंत्र निकष तयार केले आहेत. ‘बीसीसीआय’चा वेगस्तर अन्य देशांपेक्षा कमी आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडने १९ हा पात्रता वेग स्तर निश्चित केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा १८.५ आहे, तर श्रीलंका आणि पाकिस्तानचा १७.४ इतका आहे.
यो-यो चाचणीचा शोध कोणी लावला?
यो-यो चाचणीचा शोध डेन्मार्कच्या डॉ. जेन्स बंग्सबो यांनी १९९०मध्ये लावला. फिजिओथेरपी आणि क्रीडा शास्त्र या विषयातील ते प्राध्यापक असून, त्यांनी फिजिओथेरपी आणि फुटबाॅल याबाबत २५हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. ते स्वत: डेन्मार्क संघाकडून खेळले होते. बंग्सबो यांनी यो-यो चाचणी सर्वप्रथम फुटबॉलपटूंवर केली. क्रिकेटमध्ये सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने ही चाचणी स्वीकारली.